तुझिया गुणासाठी लागल
812.
तुझिया गुणासाठी लागलो भजनपाठी ।
तुझी सगुण गोठी हृदयी वसे ।
मी म्हणे ते जीवन की निर्गुण चैतन्यघन ।
व्याप्य व्यापक स्थान दुजे नाही ।
विश्वाकारे जगडंबरला जो श्रुति नेति नेति म्हणोनी ठेला ।
हेंची भावे विचारी भले ।
परी दृष्टि सगुण हृदयींचि ।
हे खूण परी न विसंबे तुझिया पाया रया ॥१॥
तू एकुची एकला बाहिजु भीतरी ।
कोणा द्वैतपरी सांगो बापा ॥धृ॥
म्हणोनी परापर स्थूळसूक्ष्म विचार ।
तो तुझा सगुणची आधार मज वाटे ।
म्हणोनी ते तुझी बुंथी हेची उरो आम्हा स्थिती ।
की द्वैताद्वैत भ्रांती न लगे मना ॥२॥
ते तुझेनी सुखे पडिपाडे आणि हे मनची स्वये उजाडे ।
जेथे थोडे बहु न निवडे ऐसे जाले ।
तेथे आपुलिये अंगा विसर पडो ठेले ।
शेखी सोंगची दुणावले रया ॥३॥
या मनाची भ्रांती फेडावया तो तुझा सगुणभाव मज गोड लागे ।
पाहाते पहाणियामाजी स्वयेंची विस्तारलासी की देखणेंची तेणे होऊनी अंगे ।
त्रिपुटी सहित शून्याशून्य निमाले ॐकार मार्गही हे नचले ।
रखुमादेविवरु विठ्ठले उदारे ।
सुख भोगिजे येणे अंगे रया ॥४॥
अर्थ :
तुझ्या सगुणगुणाला भुलून तुझ्या प्राप्तीकरता भजनाच्या पाठीसी लागलो. त्यामुळे तुझ्या सगुण स्वरुपाच्या कथा सारख्या अंतःकरणांत राहतात. मी म्हणतो, निर्गुण चैतन्य हेच सगुण बनून सर्व जीवांचे जीवन आहे. त्या निर्गुण चैतन्याला व्याप्यव्यापकभाव उत्पन्न होण्याला दुसरे स्थानच नाही. ज्या श्रुति नेति नेति म्हणून थकल्या तोच विश्वाच्या आकाराने विस्तारला आहे. त्याचा मुख्यभक्तिने विचार करणे चांगले असले तरी अंतःकरणांत जी सगुण मूर्ति आहे. त्या सगुण मूर्तिच्या पायाचे चिंतन करण्यांत कधीही विसर पडू देणार नाही. एक अद्वितीय स्वरुप आत बाहेर तूंच एक आहेस द्वैताचा प्रकार कोणाला सांगावा म्हणून तो त्या निर्गुण स्वरुपाविषयी पर अपर स्थूल सूक्ष्म इत्यादि विचार असला तरी मला मात्र सगुण स्वरुपाविषयीच आदर वाटतो. म्हणून ते तुझे सगुणरूप आमच्या समाधान स्थितीला शिल्लक उरो म्हणजे झाले. याशिवाय द्वैताद्वैत विचारांची भ्रांति माझ्या मनाला नको. त्या तुझ्या सगुण स्वरुपासारखे मोठे सुख मला दुसरे आवडत नाही. त्या निर्गुणस्वरुपाच्या ठिकाणी हे स्वतः मनच उदासीन होते. ज्याठिकाणी थोडे फार असे काही निवडता येईनासे होते. असा विचार केला म्हणजे हे तुझे सगुण सोंगच मनाला फार आवडले. या मनाची भ्रांती फेडण्याकरिता तुझ्या सगुण स्वरुपाच्या ठिकाणी भाव ठेवणे मला बरे वाटते. ह्या दृश्यदृष्ट्यादि भावामध्ये स्वतः तू आपल्या स्वरुपाने विस्तार पावून सर्व जग आपल्या अंगाने तूंच झाला आहेस. ज्ञाता ज्ञान ज्ञेयादि त्रिपुटीसहवर्तमान शून्याशून्य ओंकार इत्यादि मार्ग त्यास्वरुपाच्या ठिकाणी करू शकत नाही. रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांचे उदारसुख याच विचाराच्या अंगाने भोगीत राहणे बरे असे माऊली सांगतात.
