वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

अगुणाचिया समंधा गुणस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074546 · अभंग क्र. ८११

811.
अगुणाचिया समंधा गुणसंबंध करू ।
नकळे हा वेव्हारू लोकांमाजी ।
हा नाटकु विंदाणी न कळे याची करणी ।
दाटोनी अंतःकरणी रिघो पाहे ॥१॥
सर सर रे परता गुणाचिया गुणा ।
निजसुखनिधाना तूचि एकु ॥२॥
तुझ्या गुणागुणी वेधली मुनिवृंदे ।
मानसाचिया छंदे वर्तसी तूचि ।
आपुले निज सोंग भुलविले जयासी ।
अखंड मानसी जवळी आहे ॥२॥
ऐसा हा नवलावो विस्मो हा वाटला ।
भाव हा गळाला काय सांगो ।
रखुमादेविवरु विठ्ठलु हृदयी वसे ।
बाह्यअभ्यंतरी केव्हा वेगळा नव्हे रया ॥४॥

अर्थ :
परमात्मा मूळचा निर्गुण असून गुणांच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी लीला दिसतात. पण हे त्याचे करणे सामान्य लोकाच्या नजरेला दिसत नाही. हा परमात्मा मोठा नाटकी आहे. हा आपले मूळचे स्वरुप कळू न देता लोकांना कौतुक करून दाखवित आहे. आपल्या भक्तांना आपला छंद लावण्याचे हे त्याचे नाटक आहे. हा शुद्ध अंतःकरणाच्या भक्तांच्या हृदयांत घुसायला पाहातो. त्यासर्व गुणांचे गुणनिधान अशा श्रीकृष्णाला ज्ञानवान भक्त विनोदाने पलीकडे सर पलीकडे सर असे म्हणतात. पण व्यापक असल्यामुळे पलीकडे सर असे जरी भक्ताने म्हटले तरी तो पलीकडे सरकणार कसा? कारण स्वकीय निर्गुण आत्मसुखाचे निधान तूंच एक आहेस हे सर्व तुझे सगुणरुप मायावी आहे. हे आम्हास पक्के ठाऊक आहे. तुझ्या अंगातील गुणा मुळे मुनिजन वेधुन गेले आहेत. त्यांच्या मनातील छंदाप्रमाणे त्यांना तू भुलवून नित्य मनांत त्यांच्या अगदी जवळ आहेस. अशा विलक्षण सगुण स्वरुपाचा त्यांना चमत्कार वाटला काय आश्चर्य सांगावे त्यांचा अहंभाव गळून गेला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हे त्या भक्तांच्या हृदयांत वास करुन त्यांच्या कडून वेगळे कधीही होत नाही. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग