अकर्ता पै कर्ता नाही
35.
अकर्ता पै कर्ता नाही यासी सत्ता । आपण तत्वता स्वये असे ॥१॥
ते रुप चोखाळ कृष्णनामे बिंबे । यशोदा सुलभे गीती गाय ॥२॥
व्योमाकार ठसा नभी दशदिशा । त्यामाजी आकाशा अवकाश होय ॥३॥
निवृत्ति म्हणे गुरु माझा पूर्ण ब्रह्म । उपदेश सुगम कृष्णनाम ॥४॥
अर्थ:
तो अकर्त असला तरी त्याच्या सत्ते शिवाय काही होत नाही. एकटे म्हणावे तर तो चराचरात अशांत्मक स्वरुपात जाणवतो. त्या अरुप परमात्म्याचे कृष्णस्वरुपात नाम दर्शन होते व त्याला माता यशोदा अंगाई गाते. त्या आकाशाच्या आत दशदिशेला फाकलेले चिदाकाश आहे. आकाशाने पोकळ होऊन त्या चिदाकाशाला पोटात धरले आहे.
निवृत्तिनाथ म्हणतात ब्रह्मस्वरुपाला प्राप्त असलेल्या श्री गुरु मुळे ते कृष्णनाम मला सोपे व सुलभ झाले.
