सारासार धीर निर्गुण
36.
सारासार धीर निर्गुण परते । सादृश्य पुरते हरिनाम ॥१॥
ते हे कृष्णनाम यशोदेच्या घरी । वनी गायी चारी यमुने तटी ॥२॥
सुलभ सुभग आगमनियम । तो हा आत्माराम गोपवेषे ॥३॥
निवृत्तिचे पार गयनीचे गुज । मज मंत्रबीज उपदेशिले ॥४॥
अर्थ:
सर्व चराचर अस्थिर आहे त्यात स्थिंत्यंतर होत असते त्यात परब्रह्म फक्त स्थिर आहे. त्या सादृश्य गुणातीत परमात्म्याचे नामच परिपुर्ण आहे. तेच परब्रह्म यशोदामातेच्या घरातील गायी यमुने तीरी चारत आहे. सर्वांना अगम्य असणारा हा परमात्मा मात्र गोपाळांशी सोपा झाला व गोपवेशे धरुन त्यांच्यात वावरु लागला निवृत्तिनाथ म्हणतात सर्वा पलिकडे असणारे ते ब्रह्म नाम मंत्राच्या आधारे प्राप्त करुन घेण्याचे गुज गौप्य श्री गुरु गहिनीनाथांमुळे मला प्राप्त झाले.
