भीष्मप्रतिज्ञा.
2241.
भीष्मप्रतिज्ञा.
मारिले ते वीर माव करि करी । मृषा ते वैखरी केली जगी ॥१॥
पण केला होता न धरी शस्त्रासी । भीष्म तो तयासी स्मरणवंत ॥२॥
महामारी धरी अर्जुन वीरासी । नये सावरासी कांही केल्या ॥३॥
अश्व ते मारिले रथ ते सारिले । घाय वरी केले वीर पार्था ॥४॥
पार्थाचे शरीर पुष्प पळसाचा । ऐसा वर्ण त्याचा जाणोनिया ॥५॥
सावध तो नाही वीर रणांगणी । विचारिले मनी जगन्नाथे ॥६॥
नाही पळ एक सावध हा वीर । बाणांचे ते भार भीष्म टाकी ॥७॥
देखोनि निदान प्रतोद ठेवून । प्रथित हो रथचक्र होते ॥८॥
घेऊनिया करी उठे लागवेगे । धांवता निजांगे देखियेले ॥९॥
कसे पितांबर सुटला तो करे । सांवरून वरे धांवतसे ॥१०॥
भीष्म म्हणे देवा माझी सत्य केली । प्रतिज्ञा हरली आपुली हो ॥११॥
जरी तुझे चित्ती असे ते मारणे । कवण तो रक्षण करील माझे ॥१२॥
येऊनि लवकरी बैसे रथावरी । खड्ग तुझ्या करी देत आहे ॥१३॥
ऐकता हा बोल झाला लज्जामान । दिले ते टाकून चक्र हाते ॥१४॥
जयजयकार झाला रणी तो भीष्माचा । पण केला साचा देवराया ॥१५॥
नामा म्हणे ऐसी भक्ताची हो चाड । आपण लबाड झाले देव ॥१६॥
