वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

प्रथमादारम्य आरंभिली

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075882 · अभंग क्र. १७७

177.
प्रथमादारम्य आरंभिली क्रिया ।
पिंडी पिंड पहा निवेदिला ॥१॥
दुसरे दिवशी द्वैत हरपले ।
अद्वैत बिंबले परब्रह्मी ॥२॥
तिसरे दिवशी त्रिगुणाची शांती ।
पिंडाची समाप्ती याचपरी ॥३॥
चवथे दिवशी चौदेहातीत ।
उघडा संकेत वोळखिला ॥४॥
पाचवे दिवशी केले पिंडदान ।
पाचही ते प्राण बोळविले ॥५॥
सहावे दिवशी षडूमी निमाल्या ।
वृत्ती स्थिरावल्या आत्मरूपी ॥६॥
सातवे दिवशी सप्तधातू अंत ।
राहे अखंडत्व अद्वयत्वे ॥७॥
आठवे दिवशी नाश अष्टभावा ।
अद्वय अनुभवा राहे सुखे ॥८॥
नवमी निवांक भक्ति नवविधा ।
सरल्या, आत्मबोधामाजी आल्या ॥९॥
दहावे दिवशी इंद्रिये दहाही ।
बोळवण देही केली त्यांची ॥१०॥
अश्मा ते उत्तरी पंचदा विषय ।
ज्ञानगंगे पाहे योग त्याचा ॥११॥
अकरावे दिवशी अकरावे मानस ।
परब्रह्मी त्यास निवेदिले ॥१२॥
वृषोत्सर्ग केला भवविरक्तीचा ।
विजनी तयाचा वास केला ॥१३॥
होम केला सर्व शेष प्राक्तनाचा ।
हेत सुतकाचा पुढे नाही ॥१४॥
सपिंडीचे कर्म बाराव्या दिवसात ।
वासनेचा प्रांत होय तव ॥१५॥
व्हावया निर्वासना बाराव्या दिवशी ।
अद्वय सरसी परब्रह्म ॥१६॥
माया अविद्येचे जाळिले बिंबले ।
असि-पदी आले ऐक्य मना ॥१७॥
सच्चिदानंद दृश्य द्रष्टा दर्शन ।
ध्येय ध्याता ध्यान विसरले ॥१८॥
त्रिपुटीचा नाश तोचि रे बारावा ।
ब्रह्मत्व या जीवा केले तेणे ॥१९॥
बिंबी प्रतिबिंब हरपले तेचि ।
बाराव्यासी हेचि साच संज्ञा ॥२०॥
सोऽहं हंस याची केली बोळवण ।
बारावा तो दिन आजी खरा ॥२१॥
उल्लंघोनी कळा चालले द्वादश ।
तेचि बारा मास श्राद्ध केले ॥२२॥
चंद्राचिया कळा सोळाचा उपरम ।
न्यूनाधिक सीमा तेचि आम्हा ॥२३॥
ज्ञान तेचि गंगा सांगे गुरू क्रिया ।
साक्षात्कार गया तेचि आम्हा ॥२४॥
करू मंगल श्राद्ध गुरूचे वचनी ।
ब्रह्मचि होऊनी ब्रह्म दावी ॥२५॥
ऐसी जाण क्रिया केली या शरीरे ।
विवेके निर्धारे आपुलिया ॥२६॥
बहेणि म्हणे आता असो देहभाव ।
आमुचा दृढभाव हाचि खरा ॥२७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग