चारी वेद जयासाठी । त
2351.
चारी वेद जयासाठी । त्याचे नाम धरा कंठी ॥१॥
न करी आणीक साधन । कष्टसी का वायाविण ॥धृपद॥
अठरा पुराणांचे पोटी । नामाविण नाही गोठी ॥२॥
गीता जेणे उपदेशिली । ते ही विटेवरी माउली ॥३॥
तुका म्हणे सार धरी । वाचे हरीनाम उच्चारी ॥४॥
अर्थ :
चारही वेद ज्याचे वर्णन करण्यासाठी जन्मले आहेत त्याचेच नांव तुम्ही कंठात धारण करा. नामस्मरणासारखे सोपे साधन सोडून इतर व्यर्थ साधने करण्याच्या भानगडी म्हणजेच इतर व्यर्थ कष्ट का करत आहेस? आठराही पुराणांमध्ये केवळ नामाचे महत्त्व वर्णन केलेले आहेत इतर कोणत्याही गोष्टी सांगितलेल्या नाही. गीतेचा उपदेश ज्याने केला ती माऊली विटेवर उभी आहे. तुकाराम महाराज म्हणतात सर्व साधनांचे सार म्हणजे हरीचे नाम आहे व त्याच्यावर तु भक्ती धर आणि आपल्या वाचेणे हरिनाम उच्चार करत रहा.
