नरकासुरा वधिले जेणे
511.
नरकासुरा वधिले जेणे ।
मुरुसी मर्दुनी घेतले ठाणे ।
वृत्रासुराचे हरिले जिणे ।
तारकासुरा प्राणहानी केली ॥१॥
मधु दैत्याचे सूदन ।
हिरण्याक्षाचे घेतले प्राण ।
हिरण्यकश्यपा विदारुन ।
काळयवन दग्ध केला ॥२॥
रिठासुर दाढे चाचिला ।
अघा बगासुर तो चीरिला ।
तृणासुर सहजेचि मर्दिला ।
शकट मोडिला पादघाते ॥३॥
उपटिली धेनकासुराची शिंगे ।
कंस चाणून ते वधिले रागे ।
केशियाची मोडिली टांगे ।
गोंकुळी श्रीरंगे बाळपणी ॥४॥
परशुरामे वधिला सहस्त्रार्जुन ।
एकवीस वेळा क्षत्रियांचे कंदन ।
रामे ताटिका खरदूषण ।
नासिकछेदन शूर्पनखे ॥५॥
रावण कुंभकर्ण रामे मर्दिले ।
कित्येक निशाचराते आटिले ।
ऐसे पवाडे संपादिले ।
बहु वेळा उतरिले धराभार ॥६॥
निळा म्हणे जे ते अवतारी ।
भक्त रक्षूनी दैत्या मारी ।
ऐसिया चरित्राची हारी
माळा लाविल्य कल्पादी ॥७॥
