(वारकऱ्या बरोबर पत्र
3591.
(वारकऱ्या बरोबर पत्र पाठविले व पत्रोत्तर आले नाही म्हणून तुकाराम महाराज दु:खी झाले)
आम्हा अराणूक संवसार हाती । पडिली नव्हती आजीवरी ॥१॥
पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलो सदा होतो कामे ॥धृपद॥
वोढवले ऐसे दिसते कपाळ । राहिलो सकळ आवरोनि ॥२॥
मागे पुढे काही न दिसे पाहाता । येथूनिया चिंता उपजली ॥३॥
तुका म्हणे वाट पाह्याचे कारण । येथींचिया हीन झाले भाग्य ॥४॥
अर्थ :
आम्ही आतापर्यंत संसाराच्या हातात पडलो होतो त्यामुळे आम्हाला आजपर्यंत आराम म्हणजे विश्रांती मिळालीच नाही. मी आतापर्यंत पुत्र दारा धन आणि धंदा यामध्येच गुंतलो होतो मन नेहमी कामातच गुंतलेले होते. माझ्या सर्व उपाध्या आवरल्या गेल्या आहेत त्यामुळे असे वाटते की माझे भाग्य उदयाला आले आहे. देवा मी मागे पुढे वळून पाहिले तर मला काहीच दिसले नाही त्यामुळे माझ्या चित्तामध्ये चिंता उत्पन्न झाली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझी वाट पाहाण्याचे मुख्य कारण म्हणजे मी संसारामध्ये भाग्यहीन झाले आहे त्यामुळे तुझी वाट पाहाण्यासाठी हीन झालेले भाग्यच मुख्य कारण ठरले आहे.
