वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तेरावा तो जन्म देहे

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076158 · अभंग क्र. १६६

166.
तेरावा तो जन्म देहे वर्ते हाची ।
सांगेन तयाची मूळ कथा ॥१॥
देवगावी शाखा ‘ वासजनी’ जाण ।
लेखक प्रवीण ऐक सांगो ॥२॥
मौनस कुळीचा ब्रह्मणाचा भक्त ।
भोळा ज्ञानवंत भाग्यनिधी ॥३॥
तयाची वल्लभा जानकी ते नाम ।
माता ती उत्तम पतिव्रता ॥४॥
तयाचिये घरी कन्या मी जालीये ।
लग्न केले तये स्थळी जाण ॥५॥
गौतम कुळीचा भ्रतार पाहिला ।
अत्यंत शोभला ज्योतिषी तो ॥६॥
तयाचिये घरी ‘ शक्ती’ उपासना ।
तयाचि अंगना केली मज ॥७॥
काही एक योगे दक्षिणे कोल्हापूर ।
तेथे तो भ्रतार वास करी ॥८॥
माझी मातापिता बंधु भगिनीसी ।
तयाचे भेटीसी सर्व गेलो ॥९॥
तेथे तो ‘ जयराम’ कृष्णदास पंत ।
महिमा अदुभुत सिद्धि त्यासी ॥१०॥
तयाचे संगती क्रमोनिया काळ ।
जाला तो दयाळ कृपानिधी ॥११॥
सांगितले मज पतींचे सेवन ।
तीर्थ ते घेऊन नित्य राहे ॥१२॥
गीतेचे पठण करी मी सर्वदा ।
वेदाची मर्यादा नुल्लंघोनी ॥१३॥
वाटले भ्रतारा जावे स्वदेशासी ।
निघाले त्वरेसी कुटुंब हो ॥१४॥
आलो इंद्रायणी देहु-ग्राम स्थळा ।
कोंडाजी भेटला पंत तेथे ॥१५॥
ब्राह्मण म्हणोनी घातले भोजन ।
तेथे गर्भ जाण होता तुझा ॥१६॥
देखियेले मग तेणे कुटुंबासी ।
म्हणे या स्थळासी रहा तुम्ही ॥१७॥
आहे गरोदर तुमची स्त्री हे जाण ।
प्रसूत होवोन जावे पुढे ॥१८॥
येईल मी धान्य जे तुम्हा लागेल ।
क्रमुनिया काळ जावे स्थळा ॥१९॥
मग आम्ही राहिलो विचारोनी मनी ।
नामसंकीर्तनी काळ सरू ॥२०॥
पांडुरंग देव तुकाराम साधू ।
सर्वदा आनंदू हरिकथेचा ॥२१॥
नमस्कार करी तुकाराम यासी ।
चित्त पायापासी विठोबाच्या ॥२२॥
‘ आनंदवोवरी’ देखियेली मग ।
देव पांडुरंग तयापासी ॥२३॥
वाटले मानसी बैसावे एकांती ।
तीन अहोरात्री तये स्थळी ॥२४॥
भ्रतार क्रोधाचा पुतळा सर्वही ।
एकांत तो पाहे केवी साधे ॥२५॥
तव अकस्मात कार्याच्या उद्देशे ।
भ्रतार आवेशे पुण्या गेला ॥२६॥
पुसोनी मातेसी इंद्रायणी स्नान ।
केले पै दर्शन पांडुरंगी ॥२७॥
मनासी आवेश सत्त्वाचा लोटला ।
आनंद दाटला आसनी हो ॥२८॥
तीन अहोरात्री क्रमिल्या ते ठायी ।
आनंद तो देही थोर जाला ॥२९॥
तिसरे दिवशी तुकारामरूपे ।
मंत्र तीन सोपे सांगितले ॥३०॥
“तेरावा हा जन्म लाघलीस आता ।
पूर्वी योगपंथा सिद्ध केले ॥३१॥
आता तुज पुढे नाही जन्म-योनी ।
पतीच्या भजनी राही सुखे॥३२॥
तुझीये वो पोटी आला असे पुत्र ।
तो तुवा एकत्र जन्म तेरा॥३३॥
तोही आत्मनिष्ठ होईल ज्ञानिया ।
पुढे जन्म तया पाच होती॥३४॥
कवित्वाची शक्ती दिल्ही तुझे मुखी ।
आत्मज्ञानी निकी बुद्धी राहे”॥३५॥
बोलोनिया ऐसे जाला तौ अदृश्य ।
लाविला अंगुष्ठ भ्रुवोमध्ये॥३६॥
मग म्या बाहेरी केले गंगास्नान ।
घेतले दर्शन विठ्ठलाचे॥३७॥
पाच पदे एक आरती लिहून ।
विठ्ठला ध्याऊन समर्पिली॥३८॥
बहात्तरी वरूषे आयुष्यमर्यादा ।
आजी जाली सिद्धसनी पूर्ण॥३९॥
अंतकाळ आला आला रे सन्निध ।
सांगितला बोध जन्मा तेरा॥४०॥
सोळा प्रहर शेष राहिले ते आता ।
सावधान चित्ता करी का रे॥४१॥
अंतकाळ वेळ पाचही असावी ।
ते मना पुसावी मृत्युकाळी॥४२॥
बहेणि म्हणे तेरा जन्मांचे सर्वही ।
सांगितले काही गुरूकृपा॥४३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग