ऐक सावधान सांगेन आणि
165.
ऐक सावधान सांगेन आणिक ।
मागील ते देख सांगितले ॥१॥
कित्येक संशय राहिले सांगता ।
त्वरा जाली चित्ता अंतकाळी ॥२॥
विवेक ते शास्त्र अनुभव अंगीचा ।
असेल तो साचा अर्थ जाणे ॥३॥
अवघेचि ते जन्म आठवती मज ।
अंतरीच गुज मृत्यु-वेळा ॥४॥
आरसियात जैसे दिसे प्रतिमुख ।
तैसे जन्म देख दिसती डोळा ॥५॥
लटिकेचि शब्द व्यवहारी मानीती ।
मूर्ख तयांप्रती बोलो नये ॥६॥
कस्तुरीचा वास घेईल काउळा ।
तरिच हे कळा कळे तया ॥७॥
तेरा जन्मांपूर्वील आठवे स्मरत ।
परी तैसा हेत नाही मज ॥८॥
मुंगीचा तो मार्ग न सापडे वाघा ।
जरी तो थोर गा जाला बहू ॥९॥
बहेणि म्हणे देव कृपा करी जेव्हा ।
सर्वही ते तेव्हा कळे मनी ॥१०॥
