औट पिठावरी निरंतर दे
426.
औट पिठावरी निरंतर देश ।
तेथ मी जगदीश असे बाई ॥१॥
त्रिकुटाचा फेरा टाकिला माघारा ।
अर्धमात्रेवरा वरी गेलो ॥२॥
अर्धनारी पुरूष एकरूप दिसे ।
तेंची ब्रह्म ऐसे जाण ॥३॥
ज्ञानदेवी शून्य नयनी देखिले ।
सर्वत्री संचले शून्य एक ॥४॥
अर्थ :
योगी पुरूष ज्याला औटपीठ म्हणतात त्याच्याहि वर परमात्म्याचे स्थान आहे. त्रिगुणात्मक मायेचा निरास करून शुद्ध ब्रह्माची अर्धमात्रा ते माझे स्वरूप आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रकृति पुरूष हे अर्धनारीनटेश्वराच्या दृष्टांताप्रमाणे ब्रह्मरूपच आहेत असे समज. त्यालाच कोणी शून्य असे म्हणतात. तेच एक सर्वत्र व्यापक असलेले शून्य मी डोळ्यांनी पाहिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
