पतिव्रता धर्म ऐका गे
415.
पतिव्रता धर्म ऐका गे साजणी ।
धन्य ज्या गर्तिनी पुण्यसीळ ॥१॥
येणेचि श्रवणे मुक्ति होय जीवा ।
पतीविण देवा नाठविजे ॥२॥
आपण आपण वोळखिले जिने ।
धन्ये तेचि जाणे पतिव्रता ॥३॥
प्रपंच परमार्थ चालवी समान ।
तिनेचि गगन झेलियेले ॥४॥
कर्म तेचि ब्रह्म ब्रह्म तेचि कर्म ।
ऐसे जिने वर्म जाणितले ॥५॥
अखंड तो मनी भगवंत सर्वथा ।
तेचि पतिव्रता निकी लोकी ॥६॥
रागद्वेष मनी जाणिवेचा फुंग ।
न धरिजे संग अधर्माचा ॥७॥
इंद्रियांच्या वृत्ति विधीने सावरी ।
न दिसे अंतरी द्वैतभाव ॥८॥
साधुसंतसेवा पतीचे वचन ।
पाळी तेचि धन्य पतिव्रता ॥९॥
शांतिक्षमादया पाळी भूतकृपा ।
जाणानी स्वरूपा पतीचिया ॥१०॥
पतीचे वचन अमृतासमान ।
धन्य तिचा जन्म मातापिता ॥११॥
बहेणि म्हणे तिने जिंतिला संसार ।
वैकुंठीची थार केली तिने ॥१२॥
