धर्म रक्षावया अवतार
3037.
धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पाळिसी भक्तजना ॥१॥
अंबॠषीसाठी जन्म सोसियेले । दुष्ट निर्दाळिले किती एक ॥धृपद॥
धन्य तुज कृपासिंधु म्हणतील । आपुला तू बोल साच करी ॥२॥
तुका म्हणे तुज वर्णिती पुराणे । होय नारायणे दयासिंधु ॥३॥
अर्थ :
देवा तू धर्मरक्षण करण्याकरता अवतार घेतोस आणि आपल्या भक्तांचे पालनपोषण करुन दुष्टांपासून त्यांचे रक्षण करतोस. तुझ्या भक्त अंबरीश राजासाठी तू दहा जन्म सोसलेस आणि त्या दहा जन्मामध्ये कितीतरी दुष्टांचे तू निर्दालन केलेस. देवा तू कृपासिंधू आहेस आणि तू गीतेत जे वचन बोलला आहेस ते म्हणजे मी भक्तांचे रक्षण करेल व धर्माला ज्यावेळी ग्लानी येईल त्यावेळी अवतार घेईल हे तुझे बोल तू खरे करुन दाखव मग पुन्हा तुला लोक कृपासिंधू म्हणतील. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा तू दयासिंधू आहेस असे पुराणे देखील तुझे वर्णन करतात त्यामुळे तू दयासिंधू व्हावेस.
