वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

येउनी जाउनी पाहे तुज

🙏 3. संत तुकाराम · ABH-080568 · अभंग क्र. ३०३८

3038.
येउनी जाउनी पाहे तुजकडे । पडिल्या साकडे नारायणा ॥१॥
आणीक कोणाचा मज नाही आधार । तुजवरी भार जीवे भावे ॥धृपद॥
निष्ठुर अथवा होई तू कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥२॥
आपुले वचन राहावे सांभाळून । तुम्हा आम्हा जाण पडिपाड ॥३॥
ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होईल तयाकडे ॥४॥
तुम्हा आम्हा तैसे नाही म्हणे तुका । होशील तू सखा जीवलगा ॥५॥

अर्थ :
हे नारायणा माझ्यावर जर संकट आले तर मी येता जाता तुझ्याकडेच पाहतो. देवा तुझ्यावाचून दुसरा कोणताही मला आधार नाही त्यामुळे तुझ्यावर माझ्या योगक्षेमाचा भार मी जीवेभावे घातला आहे. देवा तू माझ्याविषयी निष्ठूर हो अथवा कृपाळू हो मी तुला कधीही विसरणार नाही सर्वकाळ तुझेच स्मरण करत राहीन. देवा आपआपले वचन सांभाळणे हे आपआपले कर्तव्य आहे त्यामुळे भक्ती करणे हे आमचे वचन आहे तर भक्तांचे रक्षण करणे हे तुमचे वचन आहे त्यामुळे दोघानीही आपल्या वचनाचे रक्षण केले तर आपली बरोबरी होईल हे तुम्ही जाणून घ्यावे. आणि आपआपले वचनाप्रमाणे जो कोणी वागणार नाही तर त्याच्याकडे दोष येईल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या दोघामध्ये म्हणजेच तुम्हा आम्हामध्ये वचन मोडण्याचा प्रकार काही होणारच नाही आम्ही तुझी एकनिष्ठेने भक्ती करु आणि तू मग आमचा जिवलग सखा होशील.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग