मागितल्यास पसरी कर ।
3525.
मागितल्यास पसरी कर । पळता भरी वाखती ॥१॥
काय आम्ही नेणो वर्म । केला श्रम नेणता ॥धृपद॥
बोलता बरे येता रागा । कठीणा लागा मागेमागे ॥२॥
तुका म्हणे येथे बोली । असे चाली उफराटी ॥३॥
अर्थ :
देवा जे भक्त तुला दान मागतात उलट त्यांच्यापुढेच तू तुझे हात पसरवतोस आणि जे भक्त काहीही मागत नाही त्यांच्यापुढे मागे पळत जाऊन त्यांचे पोट भरण्याचे काम तू करतोस. एवढे दिवस आम्हाला तुझे हे वर्म माहितच नव्हते त्यामुळे आम्ही उगीचच व्यर्थ श्रम केला. देवा तुमच्याशी जे चांगले बोलतात त्यांचा तुम्ही रागराग करता आणि जे संत जनाबाई सारखे कठोर शब्द बोलतात त्यांच्या मागे मागे तुम्ही पळता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचे बोलणे चालणे जरा उरफाटेच वाटत आहे.
