आता बरे घरिच्याघरी ।
2700.
आता बरे घरिच्याघरी । आपली उरी आपणापे ॥१॥
वाइट बरे न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥धृपद॥
बोलो जाता वाढे बोल । वाया फोल खटखट ॥२॥
काकुलती यावे देवा । तो तो सेवा इिच्छतो ॥३॥
हिशोबाचे खटपटे । चढे तुटे घडेना ॥४॥
तुका म्हणे कळो आले । दुसरे भले तो नव्हे ॥५॥
अर्थ :
आता स्वत:च्याच घरी असलेले चांगले म्हणजे आपलाच आपल्याशी संबंध येतो. घरी राहिल्याने काय होते तर चांगले वाईट काहीही आपल्या दृष्टीला पडत नाही त्यामुळे कष्टही होत नाही. बोलण्याने बोलणे वाढते आणि त्यामुळे व्यर्थ खटपट वाढते. देवाशी जसेजसे काकूळतीला यावे तसेतसे जास्त सेवेची इच्छा होते, व्यर्थ हिशोबाचा खटपट केल्याने कोणत्याही प्रकारचा नफा किंवा तोटाही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मला आता चांगले कळले आहे की घरी एकटे असणे हे चांगले आहे किंवा जरी आपल्याबरोबर कोणी असले तर एखादा सज्जन असावा.
