आधी सोज्वळ करावा मार
2701.
आधी सोज्वळ करावा मारग । चालता ते मग गोवी नाही ॥१॥
ऐसा चालोनिया आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥धृपद॥
पळणे तो पळो सांडुनि का बळे । उपाधीच्या मुळे लाग पावे ॥२॥
तुका म्हणे येथे शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्री ॥३॥
अर्थ :
आपल्याला ज्या मार्गाने चालायचे आहे तो मार्ग स्वच्छ करावा म्हणजे मग कोणताही अडथळा येत नाही. असा शिष्टाचार परमार्थमार्गामध्ये पूर्वीपासून चालत आलेला आहे जसे वेदाने सांगितले आहेच त्याचप्रमाणे परमार्थमार्गाने आपण चालावे या परमार्थमार्गामध्ये पाप आणि पुण्याचा व्यवहार आपल्याला अडथळा आणतात. जर या परमार्थामध्ये धावायचे असेल तर देहबुध्दी टाकून धावावे नाहीतर उपाधीमुळे सुख दु:ख आपल्या पाठीमागे लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, जो परमार्थमार्गामध्ये विवेक आणि वैराग्य संपन्नशूर आहे तोच यातून सुटतो बाकी सर्व बापुडे लोक या कालचक्रात पडतात.
