माझी मजचि वो पडियली
202.
माझी मजचि वो पडियली भुली ।
गेले मर्यादा वो विसरोनि आपुली ।
याची अणुमात्र पडताचि साउली ।
वृत्ति तदाकार होऊनिया ठेली वो ॥१॥
आले वाचे तेचि करिते बडबड ।
नये भ्रांतीचे वो वस्त्र दृष्टी आड ।
मना आले तैसा नाचते धुमाड ।
नेणो काय पुढे आरंभला नाड वो ॥२॥
नाही देखिले ते येऊनि पडे दृष्टी ।
तेचि उच्चारे वो येऊनि वाचे ओंठी ।
नेणोनि अनुभवा ज्ञानाची कसोटी ।
नेणो काय येऊनि सांठवले पोटी वो ॥३॥
वाचे अनिर्वाच्य येऊनि आदळे ।
ह्रदयी वाउगेचि होताती सोहळे ।
उठिति स्फुर्तिचेचि क्षणक्षणा उमाळे ।
माझिये जाणिवेचे फोडूनि पेंडोळे वो ॥४॥
होते तैसे तुम्हा निवेदिले पांई ।
न कळे यावरी तुमचे कृपेची नवाई ।
ठेवाल जैसे तेथे रहावे ते ठायी ।
कैची सत्ता आम्हा बोलावे ते काई वो ॥५॥
यावरी कराल ते तुम्ही करा देवा ।
मी तो नुरोनिया उरले देहभावा ।
कांहिंचि नेणोनिया हिताहित तेव्हा ।
निळा म्हणे साक्षी तुम्हीचि या सर्वा वो ॥६॥
