संताची आरती.
2282.
संताची आरती.
गुण आणि गंभीर रणधीर | तया योग्य साजे केशव शरीर |
तैसा अमृतराज हा विसोबा खेचर | बोलोनि अबोलपणा न कल्पी ऐसा सार ॥१॥
जय जय आरती या हरिदासाच्या भक्ता | दिंडी पुढे डोलत पंढरिनाथा ॥ धृ ॥
हरिदासमहिमा न वर्णवे वाचा | पतितउद्वरण जाणविला साचा |
त्याचा दासीपुत्र होय तो दैवाचा | म्हणोनि संतचरणी भाव धरावा साचा ॥२॥
साधु संता घरी श्वान मी होईन | मग त्यांच्या पायी नित्य लोळेन |
हरिभक्ति सोय ते मी लाभेन | तयाचे पोसणे कै मी होईन ॥३॥
दूध देखोनि जेसी मांजर सोय | तैसे न संडवती या संतांचे पाय |
चालता तयासंगे मद मत्सर जाय | म्हणोनि आवडी त्यांचे धरावे पाय ॥४॥
तसी आरती हे अमृतराज | गाता उन्मेष उन्मनी सहज |
सत्रावीचे वोळले अमृत मज | धन्य तृप्तितीर जोडले सहेज ॥५॥
यांची कृपा तरी सार्थक जन्म | नाही तरी निरर्थक होईल जाण |
विष्णुदास नामा म्हणे नेणते अज्ञान | केशव चरणी ठेवुनि केले सार्थक निर्वाण ॥६॥
