मन झाले भाट । कीर्ती
2659.
मन झाले भाट । कीर्ती मुखे घडघडाट । पडियेली वाट । येचि चाली स्वभावे ॥१॥
बोले देवाचे पवाडे । नित्य नवेचि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥धृपद॥
रोखी रहावे समोर । पुढे मागे चाले भार । करावे उत्तर । सेवा रुजू करूनि ॥२॥
पूर वर्षला देकारे । संतोषाच्या अभये करे । अंगींच्या उत्तरे । तुकया स्वामी शृंगारी ॥३॥
अर्थ :
माझे मन हरीचे गुण गाणारे भाट झाले आहे ते आपल्या मुखाने हरीची किर्ती गडगडाटात गात आहे. आता मनाला हरीचे गुण गाताना जो मार्ग सापडला आहे त्याच मार्गाने मन चालत आहे व माझा स्वभावही तिकडेच ओढ घेत आहे. माझे मन देवाचे पोवाडे नित्य व नवे गात आहे. जसेजसे देवाला आवडेल तसेतसे मी वर्णन करुन देवाचे पोवाडे गात आहे. देवाच्या पुढे मन नेहमी अगदी समोर असावे आणि इंद्रियांचा परिवार तर देवाच्या मागेपुढेच चालत राहावा आणि देवापुढे विविध प्रकारचे देवाचे वर्णन करावे हीच सेवा देवाच्या ठिकाणी रुजू (सादर) माझे मन करत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने संतोषी होऊन माझ्या मस्तकावर त्याचा अभय हस्त ठेवला आणि देवाच्या प्रसादाच्या फुलाचा वर्षावच त्याने माझ्यावर केला. आणि देवाने आपल्या अंगावरील सच्चिनंदारुपी उपरणे आणि दागिन्यांनी मला श्रृंगारीत केले.
