रक्त श्वेत कृष्ण पीत
3350.
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदले डोळा ॥१॥
तेणे अंजनगुणे दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥धृपद॥
देशकाळ वस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥
न झाला प्रपंच आहे परब्रम्ह । अहंसोहं ब्रम्ह आकळले ॥३॥
तत्वमसि विद्या ब्रम्हानंदी सांग । तेचि झाला अंगे तुका आता ॥४॥
अर्थ :
तांबडा रजोगुण, पांढरा सत्वगुण, पिवळा शुद्ध सत्वाचा आणि काळा वर्ण तमोगुणाचा आहे आणि या सर्वांपेक्षा वेगळे असे चिन्मय अंजन म्हणजे ज्ञानाचे अंजन सद्गुरु ने माझ्या डोळ्या मध्ये घातले आहे. अशा प्रकारचे ज्ञान अंजन गुण माझ्या डोळ्यात सद्गुरु घातले त्यामुळे माझी दिव्य दृष्टी झाली आणि द्वैत व अद्वैत ही कल्पनाच नाहीशी झाली. देश काळ वस्तू यांमधील भेद मावळला म्हणजे सर्व भेद नाहीसा झाला आणि आत्मा हा विश्वकार स्वरूपाने तेजोमय झाला. खरे म्हणजे प्रपंच नाहीच हे जेव्हा सद्गुरु ने ज्ञानांजन माझ्या डोळ्यात घातले त्यावेळी मला समजले आणि "अहम सोहंम" म्हणजे "ते ब्रम्ह मीच आहे" हे ज्ञान मला प्राप्त झाले. तुकाराम महाराज म्हणतात तत्वमसि या महावाक्याच्या बोधने मी ब्रह्मानंदामध्ये पूर्ण निमग्न झालो म्हणजेच ब्रम्हानंदाच्या अनुभवाने मीच ब्रह्मानंद झालो आहे.
