काळाच सारिखी वाहाती
2674.
काळाच सारिखी वाहाती नक्षत्रे । करिता दुसरे फळ नाही ॥१॥
ऐसे करत्याने ठेविले करून । भरिले भरून माप नेमे ॥धृपद॥
शीतउष्णकाळी मेघ वरुषाव । वरुषता वाव होय शीण ॥२॥
तुका म्हणे विष अमृताचे किडे । पालट न घडे जीणे तया ॥३॥
अर्थ :
काळाप्रमाणेच नक्षत्र योग्य प्रमाणे येतात या कालामध्ये मेषादी बारा संक्रांती आणि सत्तावीस नक्षत्रे क्रमाने येतात यामध्ये जर बदल केला तर त्यापासून योग्य फळ मिळत नाही. असा नियम जगत्कर्त्याने केलेला आहे एक माप भरुन झाले की नियमाने दुसरे माप भरले जाते. विचार करा की जर हिवाळयात आणि उन्हाळयात पाऊस झाला तर त्यापासून काय फायदा होईल फायदा तर होणार नाही परंतू सर्वांना त्रास मात्र होईल. तुकाराम महाराज म्हणतात, अमृतातील किडे विषामध्ये टाकले किंवा विषातील किडे अमृतात टाकले तर त्यांच्यामध्ये बदल तर होत नाहीत परंतू ते जगूही शकत नाहीत त्याप्रमाणे याच नियमाला अनुसरुन असे लक्षात येते की जगत्कर्त्याने प्रत्येकाला नियम घालून दिलेले आहेत.
