(निर्याणाचे अभंग)
3610.
(निर्याणाचे अभंग)
संसाराचे अंगी अवघीच वेसने । आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ॥१॥
आता हे सोंवळे झाले त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेले ॥धृपद॥
ब्रम्हपुरी वास करणे अखंड । न देखिजे तोंड विटाळाचे ॥२॥
तुका म्हणे आम्हा एकाताचा वास । ब्रह्मी ब्रम्हरस सेवू सदा ॥३॥
अर्थ :
संसाराच्या अंगी अनेक प्रकारचे व्यसने आहेत ती म्हणजे जन्ममरणाचे भय विविध कर्मे भेदाभेद परंतू आम्ही हरीकिर्तनाने शुध्द झालो आहोत. हरीनाम किर्तनाने सर्व त्रिभूवन आता शुध्द झाले आहे सर्व प्रकारचे विषम भेदाभेद धुवून जाऊन त्याचा त्याग झाला आहे. आता आम्ही ब्रम्हपुरीमध्ये अखंड वास करत आहोत तेथे आम्हाला पापरुपी विटाळाचे तोंड सुध्दा बघण्यास मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला एकाताचा वास करणे खूप आवडते व आम्ही ब्रम्हरुप झालो असून ब्रम्हरसाचेच आम्ही नेहमी सेवन करु.
