वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ४३. रामधर्मोपदेश

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088361 · अभंग क्र. ४३

43.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय त्रेचाळिसावा ॥
श्रीराम-भद्र-संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

तत्रौपविष्टं राजानमुपासंते विचक्षणाः ।
कथयतः कथा नानाहास्यकाराः समंततः ॥१॥
विजयो मधुमंतश्च कश्यपो मंगलाकुलः ।
पुराजित्कालियो भद्रो दंतवक्त्रः सिमागधः ॥२॥
एते कथा बहुविधाः परिहाससन्विताः ॥३॥

भद्रासनीं चापशरपाणी । तेथे बैसलें संत चतुर ज्ञानी ।
पंडित ऋषी महामुनी । श्रीरामाते उपासिती ॥१॥
नानापरींच्या कथा पुराणे । धर्मचर्चा हरिकीर्तनें ।
विनोद हास्य गीत गायनें । सकळ मिळोन तेथे करिती ॥२॥
कोण कोण ते सभेप्रती । श्रीरामसन्निध तेथे असती ।
तयांची नामे संकळिती । यथानिगुतीं सांगेन ॥३॥
विजयो दुसरा मधुमंत । कश्यप मंगळ चौथा तेथ ।
पुराजित् काळियो दंतवक्त्र । भद्र जाण आठवा ॥४॥
नवमाचें सुमागध नाम । हे नवविध सभानायक परम ।
यांचा विश्वास मानी श्रीराम । अति चतुर म्हणोनि ॥५॥
हे इतुके श्रीरघुपति । आपुलेनि प्रताप सांगती ।
नानापरींचें विनोद करिती । धरणिजापतिसुखार्थ ॥६॥
ऐसे ऐकोनि तयांचें गीतगायन । विनोद उपहास नृत्य जाण ।
तयांप्रती बोले श्रीरघुनंदन । सावधान अवधारा ॥७॥

रामांनी लोकांचे मताविषयी भद्राला प्रश्न केला :

तयांमध्ये भद्र श्रेष्ठ । विवेकी ज्ञाता आत्मनिष्ठ ।
तयाप्रति रावणारी प्रतापतेजिष्ठ । बोलता झाला ते समयी ॥८॥
अगा भ्द्रा विचक्षणा । सभेंत योग्य अति शहाणा ।
युक्तिप्रयुक्तीं तू विचक्षणा । तुझ्या गुणां तुळणा नाही ॥९॥
पुरवासी देशवासी जन । वसताती आपुले घरी जाण ।
काय वदती श्रीरघुनंदन । नवा राजा अयोध्येचा ॥१०॥
की आणिकही निंदा करिती । की भरता बोल ठेविती ।
की शत्रुघ्न सौमित्र याची स्थिती । निंदा करिती देखोनी ॥११॥
कैकेयीमाता वनवासासीं । आम्हा धाडिले दंडकारण्यासीं ।
किंवा बोलती सीतेसी । रावणे हरिले म्हणोनी ॥१२॥
नगरवासियांचें वर्तमान । भद्रा ऐकिलें असेल जाण ।
ते मजप्रति निवेदन । ये काळी करावे तुवा ॥१३॥
श्रीरामाचे मुखपद्मे जाण । ऐसे भद्रें ऐकोन ।
पुढती श्रीरामासी मधुर वचन । बोलता झाला ते समयी ॥१४॥

रामराज्याविषयी नागरिक प्रसन्न असल्याचे त्याने रामांना सांगितले :

म्हणे भास्करवंशभूषणा नरचूडामणी । लोक पुरी पाटणीं गृहीं वनी ।
मार्गी चालता वचनी । स्तवन करिती पै तुझे ॥१५॥
श्रीराम धर्मिष्ठ राजा । आणि पतिव्रता जनकात्मजा ।
लक्ष्मणे वनवासी अग्रजा । बहुत सुख दिधले पै ॥१६॥
वधिले रावणकुंभकर्ण । सेना सैन्यपुत्र प्रधान ।
राज्यीं स्थापोनि बिभीषण । बंधुसीतेसीं येथे आला ॥१७॥
अयोध्येसीं धर्मनीती । नवा राजा होवोनि रघुपती ।
प्रजापाळक परम प्रीती । विजयी व्हावा श्रीराम ॥१८॥

तरीही खरे असेल ते स्पष्ट सांगण्याचा रामांचा त्याला आग्रह :

ऐसे भद्रें बोलिल्यावरही । पुनरपि श्रीराम प्रश्न करी ।
भद्रा बरवे वाईट या दोहींभीतरी । जन सूत्रीं बांधले ॥१९॥
सुख दुःख पुण्य पाप । ऐसे जनाचे संकल्प ।
सत्य असत्य हा खटाटोप । मी माझे देख सकळांसी ॥२०॥
मी श्रेष्ठ कुलवंत । येर ते अवघे अकुळवंत ।
मी ज्ञाता महापंडित । येर अज्ञान अपंडित जाणावे ॥२१॥
ऐसे त्रिगुणांचेनि पाशें । सकळहि जग बांधिले असे ।
त्या अशुभ शुभ वार्ता पै असे । गुणानुरुपें निघताती ॥२२॥
भद्रा नगरवासी जन । जे वदत असती ते आपण ।
यथानिगुती करी निवेदन । शंका झणी धरसील ॥२३॥
आपणासि शुभ कर्तव्यता । हे भद्रा जाण तत्वता ।
अशुभ त्यागोनि उत्तमार्था । म्या श्रीरघुनाथा आचरावें ॥२४॥
ऐसी सीतापति बोलोनि सरे । तदनंतरे भद्रें वीरे ।
नगरीचा वृत्तांत सत्वरें । श्रीरामासी सांगितला ॥२५॥

भद्राने सीतेच्या चारित्र्याविषयी लोक साशंक असल्याचे सांगितले :

अहो जी दयानिधि रावणारी । पुरी पाटणीं नगरी ।
हाटविदीं चौहाटीं घरोघरी । ठायी ठायी बोलती ॥२६॥
रावणे सीता बळेंकरुन । हरोनि लंके नेली जाण ।
भोवतीं ठेविले राक्षसगण । अशोकवनाभीतरीं ॥२७॥
जानकी सौंदर्याची खाणी । अभिलाषें ठेविली अशोक वनी ।
तेथे राक्षस घोरदर्शनी । तियेभोंवतीं ठेविले ॥२८॥
तुझी कीर्ति अद्भुत लाठी । वानर मेळविले कोट्यानुकोटी ।
शिळी सेतु बांधोनि समुद्रतटीं । लंका नेटीं उतरलासी ॥२९॥
वधिले रावणकुंभकर्ण । राज्यीं स्थापिला बिभीषण ।
सीता सोडवोनि अयोध्ये गमन । प्रतापें पूर्ण तुम्ही केले ॥३०॥
ऐशा तुमच्या कीर्तीसी । रावणे कळंक लाविला हरुन सीतेसी ।
तिसी न पुसतां गृहीं कैसी । एकाएकी घातली ॥३१॥
न करिती पृच्छा शोधन । जानकीस गृहीं घालोन ।
कैसा वर्ततो रघुनंदन । लोकलाज सोडोनी ॥३२॥
आमच्या स्त्रिया ऐसे करिती । उचकणें सीतेचे आम्हा देती ।
याकारणें लोक ऐसे बोलती । श्रीरघुपति सत्य जाण ॥३३॥
राक्षसा वश झाली सीता । नाना भोग भोगी जनकदुहिता ।
तिये न पुसतां श्रीरघुनाथा । घरामध्ये घातली ॥३४॥
जे आचरली सीता सती । तैसेंच आमच्या स्त्रिया वर्तती ।
तुझ्या आधारें आम्हा न मानिती । ऐसी वदंती जनाची ॥३५॥
राजा प्रवर्ते अधर्मासी । तेथे नीति कोणी कोणासी ।
शिकवावी रघुपति कायसी । या स्थितीसी देखोन ॥३६॥
यापरी बहुविध जन । नगरी करिती विवंचन ।
हे सत्य श्रीरामा जाण । नाही अनुमान यदर्थी ॥३७॥
ऐकोनि भद्राचे वचन । परमार्थबुद्धि श्रीरघुनंदन ।
सर्वा सुहृदाप्रति बोले जाण । हे कथा सत्यत्वे मानते तुम्हा ॥३८॥

सभेतील इतरांचे भद्राला अनुमोदन :

सभाजन म्हणती श्रीरघुनाथा । भद्र वदला जे का कथा ।
ते सत्य स्वामी या अर्था । आम्ही ऐसेंच ऐकिलें ॥३९॥
सर्वही प्रणिपात करुन । श्रीरामप्रति बोलती जाण ।
म्हणती राजेंद्रा असत्यपण । भद्रवचना पै नाही ॥४०॥
ऐसी सर्वांची वचनावळी । ऐकोनि कृपाळु ते काळी ।
सभा विसर्जून हृदयकमळीं । रावणारि विचार करितसे ॥४१॥
पुढिलें प्रसंगीं सौमित्ररघुपती । संवाद एकांती बैसोनि करिती ।
एका जनार्दनी विनंती । सावध श्रोती परिसावे ॥४२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामभद्रसंवादो नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥४३॥
ओंव्या ॥४२॥ श्लोक ॥३॥ एवं ॥४५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग