वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ६७. भरत-शत्रुघ्न

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088360 · अभंग क्र. ६७

67.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय सदुसष्टावा ॥
भरत-शत्रुघ्न

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लहूला पकडून नेल्यामुळे जानकीचा खेद :

शत्रुघ्न घेवोनि गेला लहुया । बांधोनि जानकीच्या कनिष्ठ तनया ।
ऐसे ऐकोनि जनकतनया । शोकार्णवी बुडाली ॥१॥
ऋषिकुमर सांगती सीते । लहूनें युद्ध केले पुरुषार्थे ।
संतोषविले पितृव्यातें । आपुलेनि भुजबळे ॥२॥
शेवटी बंधन पावूनी । आम्हांदेखता रथी वाहूनी ।
पुत्र नेला वो सुलक्षणी । ऐकोनि विकळ सुंदरी ॥३॥
मूर्च्छा सांवरोनि ते अवसरी । जानकी शोकातें आदरी ।
कपाळ पिटी निजकरीं । धावें त्रिपुरारी आकांतीं ये ॥४॥
धरणिजा म्हणे ऋषि ताता । मी काय करु जी आता ।
वेगी सोडवा माझ्या सुता । पुत्रदानता करावी ॥५॥
माझा वनवासींचा सांगती । याचेनि होते वनाप्रती ।
काय कोपला शैलजापती । आता सांगू कणवातें ॥६॥
येरे माझ्या लहुवा बाळा । गोजिरिया रे वेल्हाळा ।
सुंदरा डोळसा कुशळा । परदेशींचिया सांगात्या ॥७॥
सहोदर सोडोनि आपुला । खेळावया लहु कोठे गेला ।
अथवा संग्राम करिता एकला । तुज वैरिये साधिले ॥८॥
पाठीसी न देखता सहोदर । तुज कोप आला थोर ।
तेणे वैरियासी मारिता मार । भागलासी पुत्रराया ॥९॥
आता मेळवा माझे वासरूं । तयावीण न धरवे धीरू ।
ऐकोनि वाल्मीकासी गहिंवरू । ऋषिभार्या गजबजिल्या ॥१०॥
इतुके बोलता रावणारीची पत्नी । तेणे दुःखे फुटों पाहे अवनी ।
ऐसे ऐकोनि ऋषि मुनी । थोर दुःखा पावले ॥११॥

मुनींचे सीतेला आश्वासन :

मुनी म्हणे रघुराज कांते । सर्वथा भय नाही त्याते ।
कुश येवोनि त्या सैन्यातें । जिंकोनि बंधु सोडवील ॥१२॥
पितृव्यातें बांधोन । तुझे लहुकुश येतील जाण ।
आणि समस्त राया गळबंधन । करितील जाण पुत्र तुझे ॥१३॥
पूर्वी मी वदलों भविष्य । मानी माझ्या शब्दाचा विश्वास ।
हे निधडे जाण पुरुष । बाळक यातें म्हणो नये ॥१४॥
सत्य जाण दूषणारिप्रिये । सूर्यवंशींचे निधडे वीर हे ।
यांचिये पुरुषार्थाची उपमा नये । आणिकसी देता हो ॥१५॥

कुशाचे आगमन व त्याची प्रतिज्ञा :

इतुके बोलता वाल्मीकी । तंव कुश आला आश्रमाचें तटाकी ।
त्याते देखोनिया जानकी । दुर्घट दुःख सांगत ॥१६॥
अरे कुश लहुवाते । बांधोनि नेले शत्रुघ्नभरतें ।
रथी वाहोनिया अयोध्यापथें । गमन केले दोघीं जणी ॥१७॥
कुशा आता काय करु । कोण सोडवील माझे वासरूं ।
केव्हा देखोन निज कुमरू । रणरंगधीर संग्रामीचा ॥१८॥
ऐकोनि लहुवाचे हरण । तेव्हांच माझा त्यासवे प्राण ।
गेला कुशा सत्य जाण । नाही अनमान येविषयीं ॥१९॥
करुन ऐओकोनि मातेची । कुशें गुढी उभविली प्रतापाची ।
म्हणे माते चिंते लहुवाची । तुजकारणें पै नलगे ॥२०॥
पाताळा नेला असेल बाळू । तरी सोडवीन शेषाची मर्दोनि टाळू ।
नाही तरी हा अवघा भूगोळू । पालथा करीन जननिये ॥२१॥
शोषीन अब्धीचें पाणी । आकाश पाडीन खोंचोनी ।
नातरी प्रयळकाळींचा वन्हीं । शीतळ करीन क्षणार्धे ॥२२॥
मेरु उपडीन भुजबळे । शोधीन सप्त द्वीप कुळाचळें ।
घरधांडोळी घेवोनि पाताळे । नागकुळें मारीन ॥२३॥
वैकुंठ कैलास सत्यलोक । भूमंडळ शोधीन सम्यक ।
दिक्पालादि स्वर्ग लोक । दमीन त्रैलोक्य निमेषार्धे ॥२४॥
घेवोनि येईन तुझा कुमरु । तरीच मी सूर्यवंशींचा वीरु ।
सत्य असेल श्रीगुरु । माझिया मस्तकावरी ॥२५॥
तेथे कायसे रावणारीचे सैन्य । एके बाण सर्व खिळीन ।
जीत बांधोनि भरतशत्रुघ्न । सहलक्ष्मण हनुमंतेसीं ॥२६॥
म्हणोनि वंदिले मातेचे चरण । श्रीगुरुसी करोनि साष्टांग नमन ।
मग प्रदक्षिणा दोघा करुन । आज्ञा मातेसी पुसतसे ॥२७॥
जनकजा म्हणे कुशासी । जीवे न मारावें रामसैन्याचे वीरांसी ।
धरुन आणावें थोरथोरांसी । वारुवापासीं बांधावें ॥२८॥

मातेला वंदन करुन कुश युद्धार्थ निघाला :

आशीर्वाद घेवोनि निघाला । सिंहनादे गर्जिन्नला ।
बाण धनुष्यी चढविला । अंगी बाणला पुरुषार्थ ॥२९॥
चालता पुढारा पाउले । शीघ्र रणभूमीसी गांठिलें ।
तंव एके रथी बंधूसी देखिले । भरत शत्रुघ्नेंसीं ॥३०॥
तेचि रथी लहु वीर । कुशास देखोनि आनंद थोर ।
म्हणे सोंडवूं आला दादोजी सत्वर । हर्ष न माये पृथ्वीवरी ॥३१॥
कुशे लहुवा बंधनेंसीं । देखियेला पितृव्याचे रथासी ।
क्रोधे भडका उठला मानसी । सृष्टि निर्दाळीन म्हणे आतांचि ॥३२॥
क्रोध कुशाचा देखोन । भेणे कांपे त्रिनयन ।
भयभीत श्रीजनार्दन । ब्रह्मादि देवगणां चळकांप ॥३३॥
की गजावरी केसरी । की तमावरी जैसा तमारी ।
की स्तंभीं प्रकटे हरिण्यकश्यापारी । तयेपरी कुश शोभे ॥३४॥
की आकाशसुत मेघपटळा । की दितिसुतावरी मेघ सांवळा ।
की कद्रुसुतावरी प्रताप आगळा । मिरवी जैसा विनताबाळ ॥३५॥
की प्रळयकाळीं दक्षजामात । सृष्टीचा संहार करीत ।
तैसा शक्राजितारिअग्रजाचा सुत । वेगवंत रणमंडळीं ॥३६॥
हाती घेवोनि धनुष्यबाण । जैसा चाले पंचानन ।
हृदयी श्रीगुरु स्मरोन । मग शत्रुघ्न पाचारिला ॥३७॥

शत्रुघ्नाला आव्हान :

अरे कैकेयीच्या लघु बाळा । प्रताप दावोनि आगळा ।
संतोषविले अग्रजा आणि दळा । आता मजसी कुशळ युद्ध करी ॥३८॥
बांधोनि माझा सहोदर । तुज झाला जैतबडिवार ।
तुमचा पूर्वापार विचार । तुम्ही नाही आयकिला ॥३९॥
श्रीरामाकारणें झालेति योगी । श्रीरामालागी झालेति वीतरागी ।
आता आलेति युद्धालगीं । हे अपूर्व वाटतें ॥४०॥
तुम्ही करावे अनुष्ठान । तुम्ही करावे तपःसाधन ।
आता धरोनि आंगवण । युद्ध दारुण करु आलेती ॥४१॥
श्रीरामाकारणें सोडूनि राज्यभोग । तुम्ही नंदिग्रामीं साधिला योग ।
मस्तकी जटा धरोनि ऋषिमार्ग । आश्रयोनि होतेती ॥४२॥
आता संग्रामाच्या चाडा । युद्ध करू आलेति पुढा ।
श्रीरामकटकीं दुकाळ गाढा । महावीरांचा पडिला हो ॥४३॥
कोणी न दिसे वीर झुंझार । तुम्ही नावानिगे परम शूर ।
म्हनोनि धाडी श्रीरामचंद्र । युद्धाकरणे तुम्हांते ॥४४॥
जानकीचा ज्येष्ठ कुमर । शत्रुघ्नासी होवोनि समोर ।
काय बोलतसे उत्तर । सावधान अवधारा ॥४५॥
उणें आले तुझिया नामासी । तुवा संग्राम केला कोणासीं ।
आता साहे माझ्या बाणासी । म्हणोनि शरासी सोडिले ॥४६॥

लवकुशांनी भरत-शत्रुघ्नांना पकडून नेले :

नारायणास्त्र जानकीकुमरे । बीजाक्षरें जपोनि सोडिले त्वरे ।
सर्व सैन्यी नारायण अवतरे । दशदिशा भरे चतुर्भुज ॥४७॥
नारायण धरित्रीं पाताळी । नारायण आकाशी अंतराळीं ।
नारायण नभोमंडळी । कुळाचळीं नारायण ॥४८॥
सैन्य अवघे नारायणें । व्यापिले देखोनि शत्रुघ्ने ।
गजबजोनियां मनें । संग्राम करु विसरला ॥४९॥
जैसा एकादा प्राणी । स्वप्नी तस्कर देखे नयनी ।
जागृत जंव होय उठोनी । तंव घरभरी तस्कर देखिजे ॥५०॥
तैसे झाले शत्रुघ्ना । नारायणरुप देखोनि मना ।
विस्मयो झाला अंतःकरणा । संग्राम करु विसरला ॥५१॥
सवेंचि कुशें परम सत्वर । बाणी विंधोनि पाडिला कैकेसीकुमर ।
चरणी धरोनि बांधिला वीर । रथातळीं उतरविला ॥५२॥
रथ मोडिला चपेटघातें । लहुवा सोडोनि घेतला तेथे ।
सवेंचि पाचारिलें भरतातें । तुम्ही यावे संग्रामा ॥५३॥
कुश म्हणे भरतातें । तुम्ही पादुका पूजाव्या घराते ।
अथवा परभारें नंदीग्रामतें । अनुष्ठानालागीं जावे ॥५४॥
वचन ऐकोनि भरतें तेच क्षणी । क्रोधे प्रज्वळिला जैसा वन्ही ।
म्हणे बाळका समरांगणीं । माझा शर साहे रे ॥५५॥
तू तरी बाळकाकार । माथेचा वाळला नाही जार ।
आता साहे माझा शर । नाही तरी ऋषीस शरण जावे ॥५६॥
मग टाकिला काळदंड । एकचि बाण परी झाले उदंड ।
रावणारिकुमर साधक वितंड । वरच्यावरी तोडिले ॥५७॥
लहुवाअग्रजें वीरे कुशें । घातले शरांचे फांसे ।
रामानुज कासाविसें । संग्राम करु विसरला ॥५८॥
भरत भुलला रणी । मागेपुढें पाठीराखा न दिसे कोणी ।
तंव अवचितें कुशें बांधोनी । रथातळीं पडिला ॥५९॥
दोघे बांधोनियां रणी । परतला निजाश्रमालागोनी ।
भरत शत्रुघ्न एकत्र दोन्ही । ऐसे आणिले ऋषिआश्रमा ॥६०॥
बांधोनि खरदूषणारीचे अनुज । मातेची सत्य करोनि पैज ।
दोघे संतोषें रामात्मज । आश्रमा उजू पै आले ॥६१॥
सवे दोघे भरत शत्रुघ्न । एके रथी बांधिले जाण ।
सीतेने दुरोन देखोन । ऋषीप्रति बोलाली ॥६२॥
धरणिजा म्हणो अहो ऋषी । दोघे नाणावे माझ्या दृष्टीसीं ।
मज देखोनि लाजें प्राणांसी । त्याग करितील निश्चये ॥६३॥
मग ऋषीनें शिष्या खुणविले । कर्दळीवनासी पाठविले ।
जेथे असे अश्व बांधले । तेथे दोघें राखावे ॥६४॥
जानकीकुमर विजयीं रणी । दोघे आले गुरुदर्शनीं ।
साष्टांगें नमस्कारुनि मुनी । मग मातेसी वंदिलें ॥६५॥
मातेने करोनि निंबलोण । धन धान्य ओंवाळून ।
दोघा हृदयी आलिंगून । समाधान पावली ॥६६॥
पुढील कथा अति रसाळ । श्रवण करिता मुखा येतसे लाळ ।
मनाची जिव्हा करी तळमळ । युद्ध तुंबळ करु इच्छी ॥६७॥
पुढे पित्यापुत्रां होईल रण । असंभाव्य अति दारुण ।
तेथे श्रोते हो व्हावे सावधान । रामायण अति गोड ॥६८॥
वाल्मीकाचीं वाग्रत्नें । ती प्राप्त केलीं जनार्दने ।
एक जनार्दनाचें तान्हें । संतांचे पोसणे म्हणोनी ॥६९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
भरतशत्रुघ्नबंधनं नाम सप्तषष्टितमोऽध्यायः ॥६७॥ ओंव्या ॥६९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग