वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ४८. भरत-शत्रुघ्न उपदेश

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088362 · अभंग क्र. ४८

48.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय अठ्ठेचाळिसावा ॥
सीतेचा आक्रोश

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मणाचे निष्ठुर वचन । ऎकोनि जानकी खेदे खिन्न ।
थोर विषाद पावोन । मूर्छागत पै झाली ॥१॥
सुकुमार जैसी कर्पूरजननी । अनिळ झगटें येवोनी ।
मग ती डोले हादरोनी । तैसे अवनिजेसि जाहलें ॥२॥
ते पडे धरणी मूर्छागत । भ्रमे व्याकुळ झाले चित्त ।
क्षण एक होवोनि सावचित्त । लक्ष्मणा बोले दीन वचनें ॥३॥
जनकात्मजा म्हणे सुमित्रासुता । माझे शरीर दुःखाते तत्वता ।
ऎसे जाणोनि की विधाता । दुःखासी पात्र मज केले ॥४॥
पूर्वी जैसे आपण केले । कोणा स्त्रीपुरूषां असे विघडलें ।
तरी मज हे प्राप्त झाले । वनवासासी सांडीलें श्रीरामे ॥५॥
ऎसा जाणोनिया वृत्तांत । वनी मज त्यागी श्रीरघुनाथ ।
माझे पाप मजचि फळत । वियोग होत श्रीरामी ॥६॥
जन्मापासोनियां जाणा । हेंचि मज प्राप्त उर्मिलारमणा ।
तरी अदॄष्टचि प्रमाणा । बोल कवणा ठेवावा ॥७॥
पूर्वी मी श्रीरामभवनीं । करीत असता सेवा चरणी ।
मज गृहीं अनुदिनी । दुःख थोर जाहलें ॥८॥
पुढे आता ॠषिआश्रमस्थानीं । वसतां मज पुसतील मुनी ।
काय कारण तुजलागोनी । श्रीरामे वनी सांडिलें ॥९॥
मज पुसतील ॠषीश्वर । काय कारणे तुज रघुवीर ।
वनी सांडी हे प्रश्नोत्तर । आम्हांप्रति सांगिजे ॥१०॥
तुज कोण्या दुःखास्तव श्रीरामे । त्यजिलें वनी अवो रामे ।
काय दुष्कर्म कोण्या अधर्मे । तुज वनी सांडीले ॥११॥
काय सांगू मुनींप्रती । जरी मुनिपत्न्या मज पुसती ।
तू सुंदर सुकुमार श्रीरघुपती । का वों तुज सांडीलें ॥१२॥
निश्चये जाण लक्ष्मणा । जान्हवीतीरीं आपुली प्राणां ।
त्यजीन मी आता वाचेंना । काही कारण मज नाही ॥१३॥

सीतेने लक्ष्मणाला अयोध्येस जाण्यास सांगितले :

मज सांडोनिया सुमित्रासुता । करी रघुनाथाज्ञेतें तत्वता ।
मज दुःखी वनस्थळी सांडोनि आता । अयोध्येसि गमन करावे ॥१४॥
आता लक्ष्मणा माझे वचन । तुवा करावे अवश्य जाण ।
माझिया सासवांसि विशेषेकरून । नमन माझे सांगावे ॥१५॥
तुमचे दीन वनवासी । वास करितें तुमचे आज्ञेसीं ।
जळावेगळी शफरी जैसी । तैसी वनवासी तुम्हांवीण ॥१६॥
दोनी करकमळे जोडून । श्रीरामा माझे साष्टांग नमन ।
जाणसी तैसे लक्ष्मणा आपण । विनंती माझी सांगावी ॥१७॥
तुझिया चरणांचा वियोग । तोचि माझा प्राणभंग ।
जैसा चातक मेघउद्वेग । जळ असोनि पै करी ॥१८॥
भक्तकृपाळू श्रावणारीनंदनें । मज सांडीलें लोकलज्जेभेणें ।
लौकीकासारखे वर्तिज जेणे । तोचि एक पुरुषर्थी ॥१९॥
पिता राज्यीं स्थापितां जेणे । सापत्न मातेचेनि वचने ।
राज्य सांडोनि वना जाणे । तोचि एक पुरुषार्थी ॥२०॥
अहंकामादिक राक्षस । मारोनि पावला जो यश ।
सुरवर पूजिती जयास । तोचि एक पुरुषार्थी ॥२१॥
लोकलज्जेसि भिवोनी । ममता योषितेसी सांडिली ज्यांनी ।
ये जनीं वनी त्रिभुवनी । तोचि एक पुरूषार्थी ॥२२॥
सर्व कर्मी कुशळपण । समता दया सेवी जयाची आंगवण ।
जया अहं ममता नाही जाण । तोचि एक पुरूषार्थी ॥२३॥
सद्गुरुवचनीं द्रुढ भाव । गुरू म्हणे ते करी निःसंदेह ।
म्हणोनि भजनीं जयाचा उत्सव । तोचि एक पुरूषार्थी ॥२४॥
गृहकृत्यीं उदासभूत । तयांत असोनि जो अलिप्त ।
कामिनीकामातें नातळत । तोचि एक पुरुषार्थी ॥२५॥
ऐसिया श्रीरामासी जाण । करितें मी साष्टांग नमन ।
हे लक्ष्मणा अवश्य सांगोन । कृपा कीजे मजवरी ॥२६॥
पौरजनांची बरवी मात । ऐकोनि मज त्यागी श्रीरघुनाथ ।
ऐसे जाणोनिया मी येथ । शोक न करी सर्वथा ॥२७।
पुरवासियांचे मनोगत । जाणोनि राजा तैसे वर्तत ।
याकारणे मी शोक येथ । काय कारणे पै करू ॥२८॥
भ्रताराच्या जे मनीचें । तेंचि स्त्रियेनें कीजे साचे ।
आन करिता दोष पृथ्वीचे । बैसतील मज माथा ॥२९॥
इतुके हे माझे वचन । सांगावे श्रीरामासि आपण ।
दयासागर तू उर्मिलामरण । यदर्थी आळस न करावा ॥३०॥
ऐसी जानकीची करुणामात । अति पराक्रमी सुमित्रासुत ।
ऐकोनि प्रदक्षिणा करित । दीर्घस्वरे रुदन करोनी ॥३१॥
क्षणैक सौमित्रे धरोनि ध्यान । माते तुज पाहता नये जाण ।
पूर्वी तुझे देखिले चरण । रूप नाही देखिले ॥३२॥
श्रीराम नसतां येथे जाण । केंवी मी पाहू तुझे वदन ।
म्हणोनि अधोमुखें आपण । चरणध्यान केलेंसे ॥३३॥
सीतेला वंदन करून लक्ष्मण अयोध्येला निघाला ः
ऐसा धरणिजेस नमस्कारू । नावे बैसला शक्रजितशत्रू ।
नावाडियासि म्हणे सत्वरू । उत्तरपारीं पाववीं ॥३४॥
ऐसा उतरोनि पैलपारी । शोके संतप्त हृदयभीतरीं ।
भ्रांत होवोनि रथावरी । बैसता झाला ते काळी ॥३५॥
पुजःफ़िरोनि पाहे लक्ष्मण । परतीरीं सीता दीनवदन ।
सीताही अवलोकी लक्ष्मण । कळाहीन देखिला ॥३६॥
परतीरींहूनि जोपर्यंत । सीता पाहे रथ दिसत ।
रथ न देखता मूर्च्छागत । धरणिजा धरणीवरी पडली ॥३७॥
ते सीता दुःखेंकरुन । अत्यंत आरंबळे त्यजू पाहे प्राण ।
सर्वेचि मूर्च्छा सांवरून । रुदनधर्म मांडिला ॥३८॥

सा दुःखभारावनता यशस्विनी यशोधना नाथमपश्यती सती ।
रुदोद सा बर्हिणनादिते वने महास्वरां दुःखपरा च जानकी ॥१॥

जानकीचा विलाप :

ते जानकी पतिव्रता यशस्विनी । दुःखभारें वनी आक्रंदोनी ।
धराधर श्रीरामलागूनी । पाहतसे ते सती ॥३९॥
अनाथबंधो अनाथनाथा । अनाथा जना तू रघुनाथा ।
का न पावसी कृपानाथा । मज ये वनी सांडोनी ॥४०॥
म्हणोनि करितें रुदन । हे भयानक अत्यंत वन ।
मयूर गर्जना करिती गहन । तेणे भय दुःख वाटतसे ॥४१॥
काय म्या तुमचा अपराध केला । कोणे माझा अन्याय देखिला ।
काय कारणे त्यागून गेला । वनवासी सौमित्र ॥४२॥
का स्वामी मज सांडिलें । मी काय अन्याय आचरलें ।
की माझी अभक्ती देखोनि अव्हेरिलें । वनवासी निरंजनी ॥४३॥
की पंचवटिकेमाजी लक्ष्मणा । अति दुरुक्ती केले छळणा ।
तेणॆं रागे श्रीरघुनंदना । मज वनवासी सांडिलें ॥४४॥
ऐसा शोक अत्यद्भुत । वनी जनकात्मजा असे करित ।
तिच्या शोकाची वर्णना येथ । काय म्हणोनि करावी ॥४५॥
मुळींच शोक मिथ्या जाण । तयाचे मिथ्या करिता वर्णन ।
जानकी अशोक आपण । शोकरुदन लैकिकीं ॥४६॥
एका जनार्दना शरण । सीता शोकें अति दीन ।
वनींचे पक्षी करिती रुदन । धरनिजादुःख देखोनी ॥४७॥
पुढे वाल्मीकमुनि येविनि । करील सीतेची संबोखिणी ।
ते परिसावे संतज्जनीं । दत्तचित्त होवोनी ॥४८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तराकांडे एकाकारटीकायां
सीताशोकनिरुपणं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥४८॥
ओव्या ॥४८॥ श्लोक ॥१॥ एवं ॥४९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग