(निर्याणाचे अभंग)
3623.
(निर्याणाचे अभंग)
अवघियांच्या आलो मुळे । एका वेळे न्यावया ॥१॥
सिद्ध व्हावे सिद्ध व्हावे । आधी ठावे करितो ॥धृपद॥
जोवरी ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥२॥
मंगळाचे वेळे उभे । असा शोभे सावध ॥३॥
अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥४॥
तुका म्हणे पाहे वाट । बहु आट करूनि ॥५॥
अर्थ :
हे लोकहो मी तुमच्या सर्वांसाठी येथे आलो आहे सर्वांना एकाच वेळेस वैकुंठास नेण्यासाठी मी तयार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी तयार व्हावे तयार व्हावे माझ्याबरोबर येण्यासाठी मी तुम्हाला आधीच ही माहिती देत आहे. माझ्याबरोबर वैकुंठाला येण्यासाठी अजून खूप घटका बाकी आहे तोपर्यंत तुम्हाला तयारी करण्यास खूप काळ आहे. अशा मंगलमय वेळेस म्हणजे वैकुंठाला जाण्याच्या वेळेस तुम्ही जर सावधानतेने उभे राहाल तरच तुम्ही शोभून दिसाल. सर्व गोष्टीचा चांगला योग घडून आला तरच तो आनंददायक वेळ ठरतो. त्यानेच आनंद प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी तर वैकुंठाला जाणारच आहे परंतू मी खूप कष्ट करुन तुम्हीही माझ्याबरोबर येता की काय याची वाट पाहात आहे.
