कृपाळू सज्जन तुम्ही
2170.
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हेचि कृपादान तुमचे मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कीव माझी सांगा काकुलती ॥धृपद॥
अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायावेगळा नका करू ॥२॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मज हरी उपेक्षीना ॥३॥
अर्थ :
हे संत जन हो तुम्ही कृपाळू आहात सज्जन आहात आणि तुमच्याकडून मला एवढेच कृपा दान पाहिजे. ते कृपादान म्हणजे असे आहे की माझी आठवण तुम्ही पांडुरंगाला करून द्या आणि माझ्याविषयी त्यांने दया करावी अशी विनंती त्याला करा. तुम्ही संत जन हो पांडुरंगाला असे सांगा की हा तुकाराम अनाथ अपराधी आणि पतीता पेक्षाही पतीत असला तरी तुमच्या पाया पासून त्याला वेगळे करू नका. तुकाराम महाराज म्हणतात हे संत हो तुम्ही तुमच्या मदतीने जर मला हरीच्या स्वाधीन केले तर तो हरी माझी कधीही उपेक्षा करणार नाही.
