शेजारत्या
2285.
शेजारत्या
चंदनाची वोवरि उदविली प्राकारी | कनकाचा मंचक शेजे सुमने वरी ॥१॥
वोवाळू आलिया शेजे आरती | निद्रा करी बापा लक्ष्मीपती ॥२॥
संत सनकादिक याते आज्ञा दीजे | शुकादिक ज्ञानियांचा नमस्कार घेजे ॥३॥
बाळा प्रौढा मुग्धा याते आज्ञा दीजे | मज सेवका सन्निध पहुडविजे ॥४॥
विष्णुदास नामा राहिला द्वारा नेहटी | जयजयकार करित देतसे घिरटी ॥५॥
