संताजी पवार
2254.
संताजी पवार
रांजण गांवामध्ये संताजी पवार । असे तो सरदार नामांकित ॥१॥
स्वामी काजामध्ये असे तो सावध । भावे हा गोविंद आठवीत ॥२॥
शास्त्र भागवत करिता श्रवण । समजले पूर्ण मनामाजी ॥३॥
नाशवंत सर्व आहे हा संसार । नाम एक सार विठोबाचे ॥४॥
ऐसे कांही आता करावे साधन । रामनामी मन लागेल ते ॥५॥
कासियासि आता हा पाहिजे उद्योग । घेतले वैराग्य तेचि वेळा ॥६॥
मातेलागी तेव्हा केला नमस्कार । निघाले हे त्वरे तेथूनिया ॥७॥
बाबा संतराजा का बा केला त्याग । घेतले वैराग्य कासयास ॥८॥
काय जड भारी पडियेले तुज । सांग कैसे गुज मजलागी ॥९॥
नको नको माते या संसाराची बेडी । फारच आहे गोडी हरिनामांत ॥१०॥
नामामृत पान करीन हे आता । माधान चित्ता होय माझ्या ॥११॥
करू दे सार्थक आलिया देहास । नको भव फांस घालू आता ॥१२॥
वारंवार तुज हेचि विज्ञापना । पाहू दे चरणा देवाजीच्या ॥१३॥
कृपा करूनिया देई आशिर्वाद । सखा हा गोविंद करी माझा ॥१४॥
करुनी प्रार्थना निघाले तेथुनी । चालिले ते वनी अरण्यांत ॥१५॥
नको नको मज भव हा संसार ॥ उतरावे स्वामीसंगे मजलागी ॥१७॥
गंगेचा हा ओघ सागरासी गेला । नाही परतला मागुता तो ॥१८॥
ऐसे महाराज तुम्ही कृपावंत । समाधान चित्त करा माझे ॥१९॥
येईन सांगाते करीन हे सेवा । मान्य हे केशवालागी असे ॥२०॥
पहा महाराजा तुम्ही कृपाद्दष्टी । का मज हिंपुटी करीतसा ॥२१॥
जळा तो वेगळा कैसा राहे मीन । जाईल हा प्राण तेचि वेळा ॥२२॥
तुमचे चरणी बहु आहे सुख । नको भवदु:ख संसार हा ॥२३॥
सार रामनाम फार आहे गोड । पुरवा आवड माझी आता ॥२४॥
आवडीचे लेणे द्यावे मज आता । तुम्ही प्राणनाथा कृपासिंधु ॥२५॥
रामनास अंगी लेववा भूषण । तेणे समाधान होय माझे ॥२६॥
दीपक ही प्रभा नव्हेचि वेगळी । पाहू वनमाळी संगे दोघे ॥२७॥
तेव्हा संतराज करिती उत्तर । न धरवे धीर तुजलागी ॥२८॥
न सोसवे तुज कठीण बैराग्य । नको येऊ मागे माझ्या आता ॥२९॥
सांडोनिया द्यावी देहाची हे आस । तेव्हा तुटेल फांस संसाराचा ॥३०॥
कामक्रोध यांसी देऊ नये थार । लीन व्हावे फार संतांपायी ॥३१॥
वस्त्रे भूषणाची धरु नये चाड । ध्यावे नाम गोड गोविंदाचे ॥३२॥
लौकिकाची कांही धरू नये लाज । बोलावे हे गुज देवाजीसी ॥३३॥
द्वतै कल्पनेचा नसे जेथे ठाव । तोचि झाला देव स्वये अंगे ॥३४॥
ऐकोनिया ऐसे बोले कांता त्यासी । आनंद मानसी हाचि माझ्या ॥३५॥
तिचि वेळा केला भूषणाचा त्याग । घेतले वैराग्य पतिसंगे ॥३६॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ॥ राहती ते वनी आनंदाने ॥३७॥
तेव्हा संत राज बोले कांतेलागी । भिक्षेलागी वेगी जावे आता ॥३८॥
पारगांव असे भीमे पलीकडे । कोणासी सांकडे न घालावे ॥३९॥
संतोषाने जे का देतील पदरी । म्हणावे श्रीहरी अर्पण ते ॥४०॥
आनंदाने तेव्हा निघाली तेथुनी । वाचे नारायण गात असे ॥४१॥
भिक्षा मागतांना नणंद भेटली । तिणे ओळखिली भाउजई ॥४२॥
कासयासी बाई घेतले वैराग्य । कांगे केला त्यग संसाराचा ॥४३॥
सांडोनिया सर्व हे राज्य संपत्ती । उदास का चित्ती झाला तुम्ही ॥४४॥
ऐकोनिया येरी करीत उत्तर । सांपडले सार संसारींचे ॥४५॥
सार नामामृत गोड आहे फार । प्राशन चतुर करिताती ॥४६॥
सद्रुरु कृपेचा वर्षाव जाहला । प्रसाद लाधला भ्रतारासी ॥४७॥
त्यांतील हे शेष त्या पात्री राहिले । आवडी सेविले माझ्या एक्या मुखे ॥४९॥
अखंड सेविती नित्य साधुसंत । भाग्या नाही अंत त्याचीया तो ॥५०॥
येरी म्हणे वाई करावे भोजन । भिक्षा जा घेऊन येथूनिया ॥५१॥
आग्रह करून दोन पोळ्या आता । घातल्या झोळींत न कळता ॥५२॥
आज्ञा घेऊनिया निघाली ते त्वरे । पोंहचली तीरा भीवरेचे ॥५३॥
भीवरे उगमी पर्जन्य पडीला । पुर तेथे आला अकस्मात् ॥५४॥
पलीकडे जावया न दिसे उतार । झाली चिंतातुर मनामाजी ॥५५॥
स्वामी माझा तेथे असे उपवासी । काय हृषिकेशी करू आता ॥५६॥
ऐकोनिया कोळी झाला नारायण । नेले उतरून पार तीते ॥५७॥
पतीलागी तिने केला नमस्कार । ठेविली समोर भिक्षा त्याचे ॥५८॥
येरु म्हणे कैसी आलीस तू पार । कोळीयाने त्वरे उतरीली ॥५९॥
कैंचा कोळी तेथे आले पांडुरंग । धन्य तुझे भाग्य भेट झाली ॥६०॥
प्रेमअश्रु डोळा वाहे त्याचे नीर । भेट द्यावी त्वरे पांडुरंगा ॥६१॥
भेटी वांचूनिया न करी भोजन । करीतसे ध्यान देवाजीचे ॥६२॥
वाणी एक होता रांजणगांवांत । झाला द्दष्टांत त्याजलागी ॥६३॥
बोले पांडुरंग करुनि पव्कान्न । घालावे भोजन संतराजा ॥६४॥
करुनी पाकसिद्धि वाणी गेला तेथे । सांगे तो वृत्तांत त्याजलगी ॥६५॥
येरु म्हणे तुज देवाजी भेटले । निष्ठुर का झाले मजविसी ॥६६॥
करीन भोजन देवा तुझ्या हाते । कांहो माझे चित्त पाहातसा ॥६७॥
पतीत मी पापी तुझा शरणागत । समाधान चित्त कर माझे ॥६८॥
न मागे मी कांही देवा तुज आता । भेट तू अनंता एक वेळा ॥६९॥
भाकिता करुणा आले नारायण । करी बा भोजन संतराजा ॥७०॥
आलिंगूनि दोघा धरिले ह्रदयी । झाली विठाबाई कृपावंत ॥७१॥
काय इच्छा असे मागा तुम्ही आता । नामी हे अनंता प्रीत देई ॥७२॥
भिक्षेचे पवित्र भक्षिताती अन्न । अहोरात्न ध्यान देवाजीचे ॥७३॥
आषाढीची यात्रा जात पंढरीसी । आनंद मानसी जाहला त्यांचे ॥७४॥
भेटतील आता माझे दिनानाथ । आणीकही संत साधुजन ॥७५॥
समारंभे जाती करीत गजर । पोहोंचले तीर भीवरचे ॥७६॥
व्रत एकादशी होती तेचि दिनी । भीवरा भरोनि चाललीसे ॥७७॥
नामाचेंनि छंदे जाहला ब्रम्हानंद । चालिले आनंदे त्याची पंथे ॥७८॥
कूर्मरूप तेव्हा जाहला नारायण । नेले उतरून पार त्याते ॥७९॥
स्वर्गी सुरव्र बैसोनि विमानी । पाहती नयनी कवतुक ॥८०॥
धन्य साधुसंत भाग्या नाही पार । वाहे पृष्ठी भार देव त्यांचा ॥८१॥
भीमा उतरूनि आले पंढरिसी । आनंद मानसी सर्वत्रांचे ॥८२॥
अणीकही भार अयात्रेचा तो आला । त्याणे हा देखिला नवलावो ॥८३॥
म्हणती संतराजा नेई आम्हा पार अ। भेटवी हा वर रखुमाईचा ॥८४॥
कृपावंत साधु आले धांऊनिया । म्हणती पंढरिराया सांभाळावे ॥८५॥
भावाची ही पेठ बांधा बळकट । मार्ग धरा नीट भक्तीचा हा ॥८६॥
संतांचा हा संग धरावा सप्रेम । न वाधा हा श्रम तुम्हालागी ॥८७॥
रामनाम संगे धरावे भांडवल । वस्तु हे अमोल येईल हाता ॥८८॥
सभाग्य हे साधु त्यांनी केला सांठा । देतील ते वांटा तुम्हांलागी ॥८९॥
नामाचे ते रूप असे सर्व सृष्टी । दाविती तो द्दष्टी ज्ञानाची हे ॥९०॥
तेव्हा तुझ्या मना होईल आनंद । तोचि ब्रह्मानंद ओळखावा ॥९१॥
द्वैत क्ल्पनेसीनसे जेथे ठाव । आला तोचि देव स्वये अंगे ॥९२॥
सद्गुरु कृप्ने हरेल हा भ्रम । दिसेल हे ब्रम्हा जग सारे ॥९३॥
त्याजविण कोठे रिता नाही ठाव । धरा नामी भाव विठोबाच्या ॥९४॥
उतरूनि भीमा गेले पैल तीरा । भेटावया वरा रखुमाईच्या ॥९५॥
ब्रम्हानंद झाला सर्वांचे अंतरी । आनंदे श्रीहरि आठविती ॥९६॥
पंढरीच्या सुखा भाग्या नाही अंत । जाणताती संत साधुजन ॥९७॥
नित्यानित्य घडे चंद्रभागे स्नान । अखंड दरुशन देवाजीचे ॥९८॥
तयाचिया भाग्या अंत नाही पार । राहिला सार संतोबा तो ॥९९॥
नामदेव तेथे याचक भिकारी । हाका त्यासी मारी वारंवार ॥१००॥
कांही मज द्यावे तुमचे उच्छिष्ट । भरेल हे पोट तेणे माझे ॥१०१॥
कृपावंत साधु आली त्या करुणा । वंदितो चरणा नामदेव ॥१०२॥
