सांडूनी वैकुंठ न धरत
388.
सांडूनी वैकुंठ न धरता पातलो |तुज भेटावया आलो पुंडलिका ॥१॥
प्रीतिचा बोरसु हॄदयी दाटला |नुठिसी का वहिला आलिंगना ॥२॥
भक्त शिरोमणी आमचा जिवलग |म्हणे पांडुरंग पुंडलिका ॥३॥
स्फुरती भुजादंड आणि वक्षस्थळ |हरूषे नयनकमळ विकासले ॥४॥
आनंदे रोमांच उद्भवले आंगी |क्षेमा देई वेगी भक्तराया ॥५॥
मज नाम रूप तुमचेही संभ्रमे |केली जन्मकर्मे असंख्यात ॥६॥
तुमचिया आवडी असे म्या विकिला |सांग कोण्या बोला रूसलासी ॥७॥
हॄदयींचे निजगुज सांग रे सकळिक |तेणे मज सुख होईल जीवा ॥८॥
परतोनिया द्रुष्टि पाहे आळुमाळ |तेणे हरेल सकळ श्रम माझा ॥९॥
ऐसा भक्तजनवत्सलु भक्तांचा विसांवा |भक्तांचिया भावा भाळलासे ॥१०॥
कटावरी दोन्ही हात ऊभा पुंडलिका द्वारी |नामया स्वामी हरि विनवितसे ॥११॥
