पढीय ते मागा पांडुरं
2770.
पढीय ते मागा पांडुरंगापाशी । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥
याचसाठी दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥धृपद॥
काही करिता कोठे नव्हे समाधान । विचारिता पुण्य तेचि पाप ॥२॥
तुका म्हणे आता निश्चळचि भले । तुज आठविले पांडुरंगा ॥३॥
अर्थ :
लोकहो तुम्हाला जे काही लागत असेल ते पाडूरंगाजवळ मागा. मला काहीही तुम्ही मागू नका उगाच माझ्यासारख्या दुर्बळाला का पिडा ? त्यामुळेच मी संसाराला माझ्यापासून दूर केले आहे. देण्या घेण्याच्या व्यवहारामुळेच माया आणि तृष्णा फार वाढत असते. अहो येथे काहीही केले तरी समाधान मिळत नाही पुण्य समजून जे करायला जावे तर ते पापच घडते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पाडूरंगा आता तुझेच स्मरण करीत राहावे आणि निश्चिंत राहावे हेच चांगले.
