(वाममार्गी शाक्तांचा
3462.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
ऐसे कलियुगाच्या मुळे । झाले धर्माचे वाटोळे ॥१॥
सांडुनिया रामराम । ब्राम्हण म्हणती दोमदोम ॥धृपद॥
शिवो नये ती निळी । वस्त्रे पाघरती काळी ॥२॥
तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥३॥
अर्थ :
कलियुगामध्ये अधर्माचे प्रमाण वाढेल त्यामुळे धर्माचे वाटोळेच होत आहे. या कलियुगामध्ये राम राम असे म्हणण्याचे सोडून ब्राम्हण लोक देखील फकीराचे कपडे घालून डोम डोम असे म्हणून भीक मागत आहेत. अहो ज्या निळया व काळया वस्त्राला शिवू नये असे वस्त्र अंगावर ते पाघरतात. तुकाराम महाराज म्हणतात, अहो ब्राम्हण लोकांचे कर्म कोणते होम, हवन, जप, तप, अध्ययन, अध्यापन हे आहे ही वृत्ती टाकून देऊन ते फकीराचे कपडे घालून भीक मागत फिरत आहेत.
