सवे तीर्थे मिळाली अन
1010.
सवे तीर्थे मिळाली अनंते | ती सुखी करूनी क्रुतार्थे | संवत्सरा जावोनी सोपानाते | समाधीसी बैसवू ॥१॥
अनंत सुखाचिया रासी | उदैल्या भक्तांचिया मानसी | आनंद जाला पुंडरिकासी |मग न बोले कांही ॥२॥
सोपान म्हणे वैकुंठा | बिजे किजो महाश्रेष्ठा |संवत्सर ग्राम क-हे तटा |वैकुंठासहित चालावे ॥३॥
इंद्रचंद्रब्रह्माहर देव | आणि गण मिळाले सर्व | तेहतीस कोटी देव |विमानी आरुढले देखा ॥४॥
निव्रुत्ती सोपान ज्ञानदेवो | त्रिमूर्ति तिन्ही देवो | धर्मरक्षणार्थ पाहा हो | मनुष्यरूपे अवतरले ॥५॥
तिघेही उभे सन्मुख |तिघांही थोर संतोष | विनविती केशवास | स्वामी विनंति अवधारिजो ॥६॥
ये आळंकापुरीसी | स्थापावे कोटी तीर्थासी | जो जो भक्त येईल स्नानासी |तो वैकुंठासी आणावा ॥७॥
ऐसे आईकोनि श्रीहरी | म्हणे धन्य धन्य तुमची वैखरी | जगदोद्धार केला संसारी |बावीस वरूषे असता पै ॥८॥
जो जो दिवस उगवला | तो तो ज्ञानदेवे सफळ केला | पद पदांतर कथिला |जेणे आत्माराम संतोषे ॥९॥
पूर्वी अनंत भक्त जाले |पुढे ही भविष्य बोलिले | परी निव्रुत्ती ज्ञानदेवे सोडविले |अपार जीवजंतु ॥१०॥
जो अभक्त मनुष्य जनी प्राणी | ज्याचा भार न साहे मेदिनी | मग इही अवतार घेउनी | जग तारिले कीर्तने ॥११॥
नामा पंढरीस नाचत | ज्ञानेश्वर आळंकापुरी शोभत | सोपान संवत्सरी मिरवित | निव्रुत्ति त्र्यंबकसिखरी ॥१२॥
