भगवंत म्हणे नामयासी|
1035.
भगवंत म्हणे नामयासी| हे यथार्थ तू बोलसी|परी क्षणक्षणा गुण आठवती मानसी|या ज्ञानदेवाचे॥१॥
भक्त ज्ञानी आणि वैरागी| ज्ञानदेवा ऐसा चहुयुगीं|ना शको न देखो याची लागीं| खंती वाटे बहुत॥२॥
उद्धवे चरणावरी ठेउनि माथा| कांही एक विनंति जगन्नाथा|ते सांगा जी कृपावंता| गुज अंतरींचे स्वामी॥३॥
निवृत्ति ज्ञान सोपानासि| हे बेसविले जी समाधीसी|मुक्ताईची स्थिती केसी| ते ह्रषिकेशी सांगावें॥४॥
मग देव म्हणे तू काय नेणसी| जरी प्रीतीने आम्हा पुससी|तरी आइके गा च्छिती ऐसी| उघडचि बोलों॥५॥
तरी नाथाचा हात ईचा शिरी| यालागी ते सत्यसनातन अवधारी|महाकल्पाचा अवश्वरीं| हे सोडील देह॥६॥
तंववरी तिचे शरीर|अभंग चिरकाळ निरंतर|महद् माया योगिणी साचार| मुक्ताबाई उद्धवा॥७॥
देवगण बैसोनि विमाना| गेले आपुलिया भवना|सकळ महामुनि स्थाना| हरिचरणा वंदोनि॥८॥
म्हणती ज्ञानदेवाच्या प्रसादें| देखिली विठ्ठलचरणारविंदें|रूप पाहाता डोळ्या दोंदे| निघति स्वानंद सुखाचीं॥९॥
तरी ज्ञानदेव हा पायाळ जाण| निवृत्तिदेव तोचि अंजन|सोपान तो नयन| तेथिचे सुखप्राप्ती॥१०॥
ऐसे करूनि साधन| साधिले श्रीविठ्ठल निधान|तेथिचे विभागी़ ज्याचे भाग्य पूर्ण| तींही प्रत्यक्ष देखिलें॥११॥
या निधानासी कुरवंडी| मुक्ताबाई देह भावाची सांडी|मग उभविली गुढी| आनंदाची सर्वकाळ॥१२॥
नामा म्हणे पंढरीसी| चालिले ह्रषिकेशी|भक्ताची मांदी देवासरीसी| नामघोष गर्जत चालिले॥१३॥
