नामयाचा धरूनि हात| क
1034.
नामयाचा धरूनि हात| क्षणक्षणा पंढरिनाथ|ज्ञानदेवाते आठवित| कंठ सद्गदित करोनियां॥१॥
उद्धवासी म्हणे पांडुरंग| या सज्जनाचा न व्हावा वियोग|हे ह्रदय होतसे दोन भाग| जाणार अंतरंग तुम्ही माझें॥२॥
त्याविण गोड मज न वाटे| ऐसे जिवलग कैचे भेटे|जे मनींचा वियोग दुःख तुटे| समाधान वाटे ह्रदयामाजी॥३॥
ज्ञानदेवा ऐसो निधान| नाही धुंडिता त्रिभुवन|न संपडे न देखो जाण| तुझी आण उद्धवा॥४॥
धन्य धन्य हे तिघेजण| मुक्ताई मुक्तरूपे पूर्ण|ही उद्धल ले त्रिभुवन| भवदुःख दारुण नासीलें॥५॥
याचे निपडी पाडे| उपमेसी दीसे थोडे|परी ज्ञानदेवा ऐसे रत्न जोडे| हे न घडे कल्पांतीं॥६॥
माझे जिवींचे गुह्यगुज| हे उद्धवा सांगितले तुज|का नामदेव जाणे सहज| आणि सकळ संत सज्जन॥७॥
गुज सांगे रुक्मिणीसी| घडी घडी ह्रषिकेशी|तंव रुक्मिणीही मानसी| या जीवलगासी आठवि॥८॥
ज्ञानदेव तरी तुमचा अंश| केवळ स्वयंप्रकाश|स्वात्मसुख निजरहिवास| स्वानंद असे उद्बोध॥९॥
निवृत्ति तुम्हा नाही भिन्नता| त्याचा आत्मा तुम्ही हो आनेला|शिव विष्णु आइक्यता|असे स्वभावता मुळीच॥१०॥
सोपान तरि पोटींचा| तो प्राण असे तुमचा|तेथे शब्द भिन्नपणाचा| कोठे मिरवेल॥११॥
संतभक्त सकळ मिळोनि| मस्तक ठेवला श्रीचरणीं|तंव बोले रुक्मिणी| तुम्हापासोनि दुरी नाहींत॥१२॥
नामयाने धरुनि चरण| साष्टांगी करूनि नमन|म्हणे तू सर्वांचे स्वानंद जीवन| मी दीन काय बोलो॥१३॥
