वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ८२. श्रोतृफल

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088161 · अभंग क्र. ८२

82.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय ब्याऐंशीवा ॥
श्रीरामांना राज्याभिषेकाचा निर्णय -

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

भरताची श्रीरामांना प्रार्थना :

भेटोनियां सकळांसी । भरत आला रामापासी ।
करोनि साष्टांग नमनासी । लोटांगणेंसी राम वंदिला ॥१॥
बद्धांजलि विनयवृत्ती । भरत सत्यें सत्वमूर्तीं ।
विनविता झाला श्रीरघुपती । मधुरोक्तीं नम्रत्वे ॥२॥
श्रीरामा तुजवीण । झालों होतो अति दीन ।
मृतप्राय कळाहीन । जीवनेंवीण जेंवी धान्य ॥३॥
भ्रतारेंवीण जेंवी कांता । उपहत२ जैसी सर्वथा ।
शुंगारभोग सकळ वृथा । तेंवी रघुनाथा तुजवीण ॥४॥
मातृहीन पै बाळक । मृतप्राय दिसे देख ।
नाही बाळसें कैंचें सुख । स्तनपान निःशेख असेना ॥५॥
तुजवांचोनिया रघुनंदन । तैसी आमची दशा पूर्ण ।
केवळ भूमिभार जाण । मागो मरण तरी न ये ॥६॥
जिता जीववेना रामेंवीण । काळावांचोनि न ये मरण ।
सर्वांगी तळमळ पूर्ण । जेवितां अन्न रुचेना ॥७॥
केवळ माझीच नव्हे अवस्था । आदिकरोनि तुझ्या माता ।
अयोध्येच्या जना समस्ता । दुखावस्था अनिवार ॥८॥
त्या दुःखाचा परिहार । आजि झाला समग्र ।
देखोनिया रघुवीर । आनंदपूर लोटला ॥९॥

अद्य मे सफलं जन्म सफलश्च मनोरथः ।
यत्वां पश्यामि राजानमयोध्यां पुनरागतमू ॥१॥

भरताने जन्म सफल झाल्याचे रामांना सांगितले :

श्रीरामदर्शनेंकरून । वियोगदुःख गेले पूर्ण ।
प्रेमाश्रुपूर्ण झाले नयन । बाष्पेंकरून दाटला कंठ ॥१०॥
त्याते आवरोनि तत्वता । जिरवोनियां सत्वावस्था ।
चरणी ठेवोनिया माथा । श्रीरघुनाथा विनवित ॥११॥
अमिता जन्यांचे दुःख । जननीजठरीं येवोनि देख ।
निमोनि गेले सकळिक । रघुकुळटिळक देखिलिया ॥१२॥
सकळ जन्मांची सार्थकता । आजि झाली गा तत्वता ।
तुज देखोनिया रघुनाथा । उत्तीर्णता जन्माची ॥१३॥
श्रीरामाचे विस्मरण । तेथे प्रतिपदीं मरण ।
तो देखता रघुनंदन । सर्वथा मरण निमाले ॥१४॥
मृत्यूचा मृत्यू रघुनंदन । त्यासी देखता निमाले मरण ।
येणे जन्में जन्मनिवारण । निजात्मा रघुनंदन देखिला ॥१५॥
रामदर्शने जन्म सफळ । राम दर्शने सफळ कुळ ।
रामदर्शने पावन सकळ । व्रत सुशीळ श्रीरामे ॥१६॥
श्रीरामेंसी नव्हे भेटी । तंवचि व्रताची आटाआटी ।
तंवचि पुरश्चरणें कोटी । श्रीराम दृष्टी जंव न पडे ॥१७॥
विसरोनियां रघुराया । जे जे केली तपश्चर्या ।
साधनाभिमानें गिळिले माया । श्रमचि वाया वाढविला । 1 १८ ॥

स्मरणभक्तीचे सामर्थ्य :

अनिमिष जे रामस्मरण । ते उग्र तप दारुण ।
स्मरणापरतें निजसाधन । सर्वथा आन असेना ॥१९॥
स्मरणाविरहित साधनभक्ती । ते जाणावी अवघी भ्रांती ।
नटाचेपरी वृथा नटती । जीविकावृत्तिसाधनें ॥२०॥
येथे वस्तूचे विस्मरण । त्याते साधन मानी कोण ।
जपतपादि व्रत दान । स्मरणे जाण सार्थक ॥२१॥
ती आमुची सकळ व्रते । श्रीरामस्मरणें सनाथें ।
प्रसन्न होवोनि समस्ते । श्रीरामाते भेटविलें ॥२२॥
निवटोनियां लंकानाथ । त्रैलोक्यविजयी रघुनाथ ।
आम्ही देखिला अयोध्येआंत । व्रतें समस्त आजि फळली ॥२३॥
स्मरण कीर्तन रघुनाथा । अनिमिष तुझे ध्यान करिता ।
जना अखंड सुखावस्था । तिन्ही अवस्था नासती ॥२४॥
श्रीरामकीर्ति मकरंद । झेपावले कृष्णषट्‌पद ।
गुजारत अति साल्हाद । निजानंद सेविती ॥२५॥
श्रीरामा तुझ्या कीर्तिपासीं । संत समर दूरवासी ।
तेही ऐकोनि वेगेंसीं । उडी आपैसीं घालिती ॥२६॥
स्वर्गमृत्यूपाताळवासी । साधु जे का अति तापसी ।
तेही सांडून तपश्चर्येसी । रामकीर्तीसी ठाकून आले ॥२७॥

अवेक्ष्य तु भवान्कोशं गोष्ठागारं तु पुष्कलमू ।
भवतस्तेजसा सर्वं कृतं व द्विगुणं मया ॥२॥
तथा ब्रुवाणं भरतं दृष्ट्वा तं भक्तिवत्सलमू ।
मुमुचुर्वाजरा नादंनागराश्च जनास्तदा ॥३॥
ततः प्रहष्टं भरतमंकमारोप्य राघव: ।
ययौ तेज विमानेन ससैन्यो भरताश्रमम् ॥४॥

भरताने केलेली श्रीरामस्तुती ऐकून वानरांचा आनंद :

श्रीरामकीर्ति अत्यद्‌भुत । साधुसंतसमवेत ।
अयोध्यानगरी अत्यंत । अपरमित वस्ती झाली ॥२८॥
पहावे स्वामी रघुपती । पहिली अयोध्या होती किती ।
आता किती जाहली वस्ती । श्रीरामकीर्ती ख्याति केली ॥२९॥
श्रीरामकीर्तीचे महिमान । ऐकोनिया भरतवचन ।
हरिखले वानरगण । भुभुःकारें पूर्ण गर्जिन्नले ॥३०॥
भुभुःकार जयजयकार । माजि रामनामाचा उच्चार ।
किराणे देती अपार । श्रीरघुवीरजयजयकीर्ती ॥३१॥
ते देखोनि अलोलिक । अयोध्यावासी एकएक ।
नामे गर्जिन्नलें असंख्य । श्रीरघुकुळटिळक विस्मित ॥३२॥
देखोनि भरताच्या प्रेमासी । सुख उथळले श्रीरामासी ।
जेवी चंद्रोदयीं आकाशी । सागरासी ये भरते ॥३३॥
सागर एकदेशी जण । तरिया दाटती तेणे भरतेन ।
श्रीराम स्वये चैतन्यघन । ब्रह्मांड पूर्ण सुखे धाले ॥३४॥
श्रीराम स्वये सुखैकघन । तथापि प्रेम अति गहन ।
हृदयी धरोनि भरता जाण । श्रीरामे आपण आलिंगिला ॥३५॥

श्रीरामांनी भरत, वसिष्ठ व मातांना विमानात बसविले :

वसिष्ठादिक कषींसमवेत । विमानी बैसोनि रघुनाथ ।
अंकी बैसविला भरत । प्रेम अद्‌भुत भक्तीचे ॥३६॥
वामांकी जानकी सुंदरी । भरत विराजे दक्षिण अंकावरी ।
समस्त माता रधुवीरी । विमानाभीतरी बैसविल्या ॥३७॥
सेनापति आदिप्रधान । त्याते आज्ञापीं रघुनंदन ।
निजवहनी आरोहण । स्वये आपण करावे ॥३८॥
ऐकोनि रामाचे वचन । अवघे झाले सुखैकघन ।
जयजयकारें गर्जोन पूर्ण । केले आरोहण निजवहनी ॥३९॥
गज रथ वाजी वहने । आपुलालीं आरोहणें ।
सौमित्रासहित शत्रुघ्ने । विमानी रघुनंदने विराजिजे ॥४०॥

मोक्षपुरी अयोध्येचे आध्यात्मिक रूपक :

सांडोनि देहत्रिकूट । चौथें पैणें घडघडाट ।
मोक्षपुरी अयोध्यापीठ । झाले प्रविष्ट पै तेथे ॥४१॥
श्रवण मनन निदिध्यासन । चौथा साक्षात्कार पूर्ण ।
हीचि चारी पेणी पूर्ण । ऐका विवंचन तयांचें ॥४२॥
पहिलें पेणे रामेश्वरी । दुसरे अग्रहार रामनगरीं ।
तिसरे भारद्वाजश्रमाभीतरी । मो क्षपुरी पै चौथी ॥४३॥
आत्माराम सवे असता । श्रवण मनन कोण्या अर्था ।
ऐसा आशंकेचा ठाव आता । परी सर्वथा न धरावा ॥१४४॥
जीवा आत्मयासीं वेगळीक । कल्पांतीही नाही देख ।
निजभ्रमें भेद आवश्यक । एकाएक पै भासे ॥४५॥
जेंवी विसरोनि जागृतीसी । स्वप्नभ्रमें कासाविसी ।
स्वये होय अनायासीं । सावध त्यासी केलिया नव्हे ॥४६॥
तेंवी जीवा आत्मयाची एकात्मता । स्वतःसिद्ध स्वये असता ।
श्रवण मनन न करिता । भ्रम सर्वथा निरसेना ॥४७॥
चौथें पेणे रघुनंदन । स्वयं पावला निजभवन ।
बंधुबंधू आलिंगन । जीवशिव पूर्ण जेवी भेटती ॥४८॥

भरताच्या आश्रमाला येताच रामांना परमानंद :

आपुलाले निजवहनी । आरूढोनि तत्क्षणीं ।
रामनामाचे दीर्घध्वनीं । करित गर्जन चालिले ॥४९॥
आले भरतआश्रमासी । तेथे उतरिले विमानेंसी ।
आश्रम देखता राघवासी । प्रेम मानसी न संडे ॥५०॥

आश्रमाचे व भरताचे वर्णन :

देखे दर्भांची आसने । तृणशेजा शयनस्थानें ।
प्रावरणासी कृष्णाजिनें । आणि वल्कलें बहुवस ॥५१॥
फळमूळांचें संभार । देखे आश्रमी अपार ।
उदंड मिनले ऋषीश्वर । त्यांसी फळाहार करावया ॥५२॥
भरतमुखें रामकथा । अत्यंत प्रेमे श्रवण करिता ।
धणीन पुरे ऋषी समस्ता । आश्रमी त्या अर्था मीनले ॥५३॥
देशोदेशींचे ऋषीजाण । निजाश्रम त्यगून पूर्ण ।
भरतापासीं आले ठाकून । करावया श्रवण रामकथा ॥५४॥
भरताश्रम रघुनाथा । स्वये देखतांचि तत्वता ।
अति उल्लास झाला चित्ता । प्रेमावस्था अनिवार ॥५५॥
वनवासी जी जी व्रते । होती धरिली रघुनाथे ।
ती ती समस्ते भरतें । प्रेमे अद्‌भुते अंगीकारिली ॥५६॥
माथा दृढ जटाभार । पादुकामंडित परिकर ।
खपाटी लागले उदर । वल्कलांबरपरिधान ॥५७॥
निजवृत्तिअलंकृत । श्रीरामे देखोनिया भरत ।
सुखझालें अत्यद्‌भुत । निजहृदयांत आलिंगी ॥५८॥
श्रीरामाचेनि आलिंगनें । सुख उथळले चौगुणें ।
सर्वस्वें ओवाळिलें तेणे । निंबलोणे कुरवंडिया ॥५९॥
भरताश्रमा येवोनि निरुते । सुखावले निजचित्तें ।
आज्ञापिले श्रीरघुनाथे । सावधचित्तें परिसावे ॥६०॥

अब्रवीच्च तदा रामस्तद्‌विमानमनुत्तममू ।
वह वैश्रवणं देवमजुजानामि गम्यतान् ॥५॥

आपले कामग विमान आपणास परत मिळावे अशी कुबेराची अपेक्षा :

निवटोनियां लंकनाथ । सुर सोडविले समस्त ।
निजवैभवा समवेत । झाले प्राप्त निजभवन ॥६१॥
कुबेराचे निजविमान । कामग अति शोभायमान ।
रावणे आणिले हिरोन । दुखीनिमग्न तेणे तो ॥६२॥
निवटोनियां लंकेशासी । संस्थापिले सकळासी ।
मुक्त केले नवग्रहांसी । परी आपणासी उपेक्षिले ॥६३॥
माझे कामग विमान । मज देता रघुनंदन ।
तरी मी जाणतो संपूर्ण । कृपाळूपण रामाचे ॥६४॥
ज्याचा जेथे अतिशयो पूर्ण । ते त्यासी न पावतां जाण ।
स्वये होवोनि दुःखनिमग्न । बोले पैशून्य सर्वदा ॥६५॥

लोभमहिमा :

जेथे दृढत्वें लोभाची वस्ती । तेथे कैंची विवेकस्थिती ।
अंध होवोनि ठाके वृत्ती । दृढविषयार्थी लोभिष्ठ ॥६६॥
लोभ तेथे कैंचे ज्ञान । लोभ तेथे कैचें ध्यान ।
लोभ तेथे समाधान । सर्वथा जाण पै नाही ॥६७॥
लोभ तेथे कैंची भक्ती । लोभ तेथे कैंची मुक्ती ।
जेथे लोभ तेथे विरक्ती । नाही निश्चिती सर्वथा ॥६८॥
लोभाचें ठाणें अंतरी असता । समूळ साधने होती वृथा ।
गुरूसी चाळी विकल्पता । ज्याचेनि तत्वता मोक्ष लाभे ॥६९॥
माता पिता इतर जन । त्यांची कथा गणी कोण ।
है लोभाचे स्वाभाविक चिन्ह । कुबेर जाण नव्हे तैसा ॥७०॥
तथापि ज्याची वस्तु त्यासी । पावविता श्रेय आम्हांसी ।
विमान अर्पावे कुबेरासी । हेंचि आम्हांसी निजमंडन ॥७१॥

कुबेराचे विमान बिभीषणाला दिल्यामुळे स्वतःचे
विमान कुबेराला देण्याची रामांची इच्छा :

कुबेराचे निजविमान । शरणागता दिधले दान ।
आमुचे कामग सुलक्षण । करावे अर्पण धनदासी ॥७२॥
आज्ञापितां रघुनाथ । भरते वंदिला वचनार्थ ।
निर्लोभ शुद्धशास्त्रार्थ । निजसिद्धार्थ श्रीराम ॥७३॥

श्रीरामांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे विमान भरताने आपल्या दूताबरोबर कुबेराकडे पाठवून दिले :

भरताचेनि भजनें पूर्ण । ग्रा त्रिलोकीं गमन ।
त्यासी करोनि आज्ञापन । धाडिलें विमान कुबेरासी ॥७४॥
उत्तरेचा लोकपाळ । अलकावती नगर विशाळ ।
श्रीरामभांडार सकळ । राखे अविकळ कुबेर ॥७५॥
तेथे जावोनिया दूत । सांगितले श्रीरामवृत्त ।
विमान अर्पोनियां त्वरित । आला पुसत कुबेरा ॥७६॥
देखोनि श्रीरामगण । येरें घातले लोटांगण ।
देखता श्रीरामविमान । आनंदमग्न पै झाला ॥७७॥

कुबेराकडून दूताचा सत्कार व रामस्तुती :

श्रीरामरूपें रामगणासी । षोडशोपचारीं परियेसीं ।
पूजोनिया अति प्रीतीसी । काय तयासी बोलत ॥७८॥
श्रीराम सकळांची माउली । आर्त श्रांतांची साउली ।
आश्रितजना कल्पवल्ली । ख्याति केली अवतारी ॥७९॥
निवटोनियां दुष्ट रावण । गौरविले सकळ सुरगण ।
मजलागोनि स्वविमान । अर्पिले आपण रघुनाथे ॥८०॥
भक्तजनां कृपाळ । ऐसा ब्रीदाचा कल्लोळ ।
साच करोनि दावी तत्काळ । निजभक्त सकळ गौरविले ॥८१॥
ऐसे करोनि स्तवनासी । पूजोनियां अति प्रीतीसी ।
बोळविलें श्रीरामगणासी । कुबेर मानसी सुखमय ॥८२॥

श्रीराम दशरथाच्या सिंहासनास वंदन करण्यास निघाले :

येरीकडे रघुनंदन । प्रवेशोनि स्वभुवन ।
दशरथाचें सिंहासन । नमावया जाण निघाला ॥८३॥
तुरे लागलीं घनदाट । उठला नाद अचाट ।
नादें गर्जती सुभट । कीर्ति निर्दुष्ट रामाची ॥८४॥
विचित्र वाद्यांचा ध्वनी । रामनामाच्या दीर्घ श्रेणी ।
नाद कोंदला गगनी । वीर तेथोनी चालिले ॥८५॥
निराळ वोळले नामेंकरोनी । वर्षो लागले अमृतकणीं ।
हर्षे तिंबली अवनी । सुखसमाधानी श्रीराम ॥८६॥

सुवासिनींकडून श्रीरामांची मंगल दीपांनी ओवाळणी :

हर्षाचेनि गदारोळें । नगरवनितांहीं मंगल केले ।
दधिमधु अक्षता दूर्वामेळें । दीप प्रबळें ओवाळिती ॥८७॥
ऐसे पातले राजभवन । गजरें करोनि ससैन्य ।
करोनिया नीराजन । सिंहासन नमियेलें ॥८८॥

पितुर्भवनमासाद्य प्रसाद्य सुमहद्यशः ।
कौसल्या व सुमित्रां व कैकेयीमभ्यवादयत् ॥६॥

वाद्यांच्या गजरांत श्रीरामांचा राजभवनात प्रवेश :

प्रसन्नोन्मख तिघी माता । श्रीरामे नमिल्या तत्वता ।
सहित सौमित्र आणि सीता । आनंद समस्ता उथळला ॥८९॥
श्रीराम प्रवेशतां राजभवन । तुरे वाद्यें गर्जे गगन ।
नामे कोंदलें त्रिभुवन । जयजयकार पूर्ण प्रवर्तला ॥९०॥
नागरिक जना सकळा । नरनारी अबळां बाळां ।
तृणचरादि सकळा । देखोनि घननीळा आनंद ॥९१॥

नागरिकांची रामराज्याभिषेकाची इच्छा :

सकळ जन नगरवासी । आदिकरोनि दासदासी ।
राज्याभिषेक राघवासी । पहावयासी इच्छिती ॥९२॥
ऐसे सकळांचें मनोगत । त्याहूनि भरताचे अत्यंत ।
राज्याभिषेकीं रघुनाथ । देखां इच्छित अत्यादरें ॥९३॥

अथाब्रवीद्‌राजपुत्रो भरतं धर्मिणां वरम् ।
अर्थोपहितया वाचा मधुरं रघुनन्दन ॥७॥

ती इच्छा भरताने श्रीरामांना निवेदन केली :

सत्वाथिला अति सात्विक । परमधर्मे अति धार्मिक ।
श्रीरामभजनविश्वासक । निजरंक रामभजनीं ॥९४॥
सकळांसमवेत हर्षनिर्भर । होवोनि अत्यंत नम्र ।
लोटांगण अत्यादर । भरतें रघुवीर विनविला ॥९५॥
वनवासाचीं सकळ व्रतें । स्वामी विसर्जावीं समस्ते ।
जटाबंधनें करोनि मुक्तें । मंगलस्नानातें करावे ॥९६॥
करोनि व्रतविसर्जन । राज्याभिषेक घेवोनि पूर्ण ।
अंगीकारावे सिंहासन । राजचिन्ह छत्रादि ॥९७॥
अति सुकुमार जानकी माता । उपवासे गांजिली तत्वता ।
मलिन अंग मलिन माथा । अस्थिपंजरता उरलीसे ॥९८॥
मलिन वस्त कृशोदर । तांबूलहीन म्लान वक्त्र ।
श्रमेंकरून लागले नेत्र । बहुत सुंदरी गांजिली ॥९९॥
दुरात्मा रावणाच्या घरी । अत्यंत गांजिली सुंदरी ।
मंगलस्नानीं आज्ञा करी । दीनोद्धारी नाम तुझे ॥१००॥
तैसाच सौमित्र भ्राता । बहु कष्टला रघुनाथा ।
आहार नातळे सर्वथा । तुज तत्वता सेविले ॥१०१॥
त्या श्रमाचा परिहार । कर्ता तू एक रघुवीर ।
अंगीकारोनि राज्यभार । सुख सत्वर यासी द्यावे ॥१०२॥

रामआज्ञेप्रमाणे आपण चौदा वर्षे राज्य केल्याचे भरताने रामांना सांगितले :

आणिक एक विज्ञापन । स्वामींनी ऐकावे सावधान ।
तुझे आज्ञेप्रमाणें पूर्ण । राज्यशासन पै केले ॥१०३॥
पितृआज्ञा तुझे व्रत । झालीं चौदा वर्षे नियत ।
तितकियांत कीर्ति अद्‌भुत । त्रैलोक्यांत विस्फारिली ॥१०४॥
निवटोनियां रक्षोगण । मुक्त करोनिया जनस्थान ।
ब्राह्मणा दिधले दान । न लागतो क्षण श्रीरामा ॥१०५॥
जो नागवे सुरासुरी । कांखे सूदला दशशिरी ।
त्या वाळीची केली बोहरी । एके बाणेंकरीं श्रीरामा ॥१०६॥
मुक्त करोनि किष्किंधाभवन । सदा राज्याभिषिंचन ।
सुग्रीवासी केले जाण । निमिषेंकरोन श्रीरामा ॥१०७॥
सागरी तारोनि पाषाण । क्षणे उतरिले वानरसैन्य ।
लंकेमाजी घालोनि खाण । सकुळ रावण निर्दाळिला ॥१०८॥
मुक्त करोनि सुरमांदी । संस्थापिले निजपदीं ।
नवग्रह हर्षानंदीं । स्थापिले त्रिशुद्धी ग्रहचक्रीं ॥१०९॥
अलोलिक लंकाभवन । क्षणे हिरोनियां जाण ।
बिभीषणा दिधले दान । संपत्ति गहन समवेत ॥११०॥
निर्लोभी कळा ऐसी । आचार्यत्व दृढ जगासी ।
संस्थापिले निजभजनासीं । कृपाकुत्वेंसीं श्रीरामा ॥१११॥

आमच्यासाठी राज्याचा स्वीकार करावा अशी भरताची रामांना कळकळीची प्रार्थना :

त्या तुज राज्याची आस्था । सर्वथा नाही रघुनाथा ।
आमचे कृपेलागी तत्वता । राज्यभार आता अंगीकारी ॥११२॥
सिंहासनी सचिन्ह देख । सालंकृत रघुकुळटिळक ।
आमचे नेत्र आत्यंतिक । देखावया भुकेले ॥११३॥
आमच्या नेत्रांचे पारणे । स्वामी फेडावे कृपाळुपणें ।
मी तुझे निजतान्हें । लळे पाळणे पै माझे ॥११४॥
राज्यलोभ राघवासी । नाही सर्वथा मानसी ।
निश्चये कळलें आम्हांसी । संदेह ह्मासीं असेना ॥११५॥
परी लळे पाळावे भक्तांचें । हेंचि व्रत श्रीरामाचे ।
तेथे काय विज्ञापन आमुचे । वृथा करील श्रीराम ॥११६॥

श्रीरामांवरील प्रेमातिरेकामुळे भरतादि सर्वांचा गळा दाटून आला :

म्हणोनि घातले लोटांगण । सुदृढ माथा धरिले चरण ।
प्रेमे चालिलें स्फुंदन । करी रुदन अट्टहासे ॥११७॥
जेंवी भरताची अवस्था । तैसीच शत्रुघ्नाची तत्वता ।
सौमित्र सीता सहित माता । प्रेमावस्था नावरे ॥११८॥
सुग्रीव बिभीषण वानरगण । सुमंत सेनानी प्रधान ।
अयोध्येचे सकळ जन । प्रेमे स्फुंदन चालविलें ॥११९॥
ऋषिवरांही दशा तैशी । प्रेमे स्फुंदती आवेशी ।
ते देखोनि हनुमंतासी । आवेश मानसी पै आला ॥१२०॥

भरताची इच्छा पूर्ण करावी असे त्या वेळी मारुतीचे स्पष्ट सांगणे :

करोनिया साष्टांग नमन । मृदुमंजुळ मधुर वचन ।
विनविला श्रीरघुनंदन । भरत वचन मानावे ॥१२१॥
तुजलार्गी आर्तभूत । तुझी व्रतें जी समस्त ।
असोनि राज्यभोगाआंत । स्वये भरत आचरला ॥१२२॥
तुम्ही असतो वनांतरीं । सहज भोग केले दुरी ।
भोगी असोनि अलिप्त परी । ख्याति थोरी भरताची ॥१२३॥
तुजलागीं आर्तभूत । भोग भोगोनि त्यजी समस्त ।
झाला वनवासी व्रतस्थ । वल्कलयुक्त जटाधारी ॥१२४॥
आहार सांडोनि निःशेख । श्रीराम भेटावया देख ।
फळभोजनीं अति हरिख । कवि सकळिक समवेत ॥१२५॥
त्रिकाळ पादुका पूजितां । क्षण अवकाश नाही भरता ।
श्रीरामकीर्ती वाखाणितां । नाही तत्वता अवकाश ॥१२६॥
श्रवण कीर्तन पूजन । सत्संगती कथा गहन ।
अखंड श्रीरामाचे ध्यान । समाधान तेणे त्यासी ॥१२७॥

भरताला आपण काहीच उत्तर देत नाही हे योग्य नाही :

ऐसी असोनि अवस्था । लोटांगणी विनविता ।
उत्तर न देसी रघुनाथा । हे सर्वथा अनुचित ॥१२८॥
राज्यलोभ पै भरतासी । सर्वथा नाही मानसी ।
कळलें निश्चये आम्हांसी । प्रमाणासी तुझे चरण ॥१२९॥
ऐकोनि मारुतीचे वचन । संतोषला रघुनंदन ।
भरत उठोनिया जाण । हृदयी पूर्ण आलिंगिला ॥१३०॥

आपली आज्ञा नाही म्हणून रामांनी मौन धरले
हे जाणून वसिष्ठांची रामांना राज्य स्वीकारण्याची आज्ञा :

हृदयी आलिंगोनि पूर्ण । काही नेदी प्रतिवचन ।
सस्तुरूसी कळले चिन्ह । माझे वचन पाहतसे ॥१३१॥
श्रीराम मर्यादेचा मेरू । राम भावार्थसागरू ।
राम आज्ञेचा किंकरू । पूर्णावतारू श्रीराम ॥१३२॥
राम गुणांचे मंडन । राम प्रेमाचें जीवन ।
गुरूचा निजगुरु आपण । देतो मान गुरूत्वा ॥१३३॥
गुरुमर्यादा पाळिता । विजय आला रघुनाथा ।
उत्तरोत्तर होती कथा । स्वधर्मता स्थापिली ॥१३४॥
जे जे आचरती श्रेष्ठ । आबाळां तोचि पडे पाठ ।
राम अवतार श्रेष्ठ । पुराणपाठ श्रीराम ॥१३५॥
पितृज्ञाप्रतिपाळण । तुझे वनवास गमन ।
चौदा वषै नियत पूर्ण । राज्यशासन तेंचि भरता ॥१३६॥
होता दोघांचा जो नेम । सिद्धि पावला सर्वोत्तम ।
आज्ञा पाळावी निःसीम । भरत सप्रेम सुखावी ॥१३७॥
अंगीकारोनि राज्यासी । ब्राह्मणदास्ये अहर्निशी ।
सुख द्यावे गोविप्रांसी । स्वधर्मासी संरक्षी ॥१३८॥
संरक्षावे गोब्राह्मण । पितृवतू प्रजापाळण ।
धरा आनंदवावी पूर्ण । स्वधर्मेकरोन श्रीरामा ॥१३९॥
अश्वमेधादि महा यज्ञ । तेणे गौरवीं अमरगण ।
वसुधारा दंडायमान । हव्यवाटरे जाण सुखी करी ॥१४०॥
ऐसे वसिष्ठआज्ञापन । हनुमंताचा संदेश पूर्ण ।
भरताचे प्रेम गहन । तेणे रघुनंदन सुखमय ॥१४१॥

श्रीसद्‌गुरूंची आज्ञा श्रीरामांना शिरोधार्य :

सद्‌गुरूचें आज्ञापन । माथा वंदोनि आपण ।
बोलता झाला रघुनंदन । आला कोण उल्लंघी ॥१४२॥
ऐकोनि श्रीरामवचन । भरत झाला सुखैकघन ।
अंगद गर्जिन्नला पूर्ण । रधुनंदननिजराज्य ॥१४३॥
अयोध्येचे सकळ जन । आणि सकळ वानरगण ।
शरणागत बिभीषण । करित गर्जन उठिले ॥१४४॥
एका जनार्दना शरण । श्रीरामाचे राज्याभिषिंचन ।
श्रोती द्यावे अवधान । निजनिरूपण राम वदवी ॥१४५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां ।
श्रीरामभिषिंचननिर्णयो नाम द्व्यशीतितमोऽध्यायः ॥८२॥
॥ ओंव्या १४५ ॥ श्लोक ७ ॥ एवं १५२ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग