॥ श्रीएकनाथमहाराजकृत
83.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय त्र्याऐंशिवा ॥
श्रीरामांना राज्याभिषेक -
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
धन्य तो वाल्मीकिमुनिजन । धन्य धन्य त्याचे वचन ।
अनागत रामायण । केले-निरूपण शतकोटी ॥१॥
धन्य ते अयोध्याभुवन । धन्य धन्य तेथींचे जन ।
धन्य तयांचे नयन । नित्य रघुनंदन देखती ॥२॥
धन्य भाग्य त्या भरताचे । नित्य चिंतन श्रीरामाचे ।
प्रेम देखोनि निष्कर्षाचें । झाले स्वामीचें आगमन ॥३॥
रामराज्याभिषेकासाठी आलेल्यांची नामावली :
त्याच्या राज्याचा उत्साहो । अभिषेकी कळवळलाहो ।
भरतें मांडिला पहा हो । ऋषिसमुदावो मेळवोनी ॥४॥
श्रीरामराज्याभिषिंचन । पाहू आले सुरगण ।
मरुद्गणेंसी पाकशासन । स्वये आपण तेथे आला ॥५॥
देवगुरु बृहस्पती । तेथे आला शीघ्रगती ।
सनकादिक मुनिपंक्ती । उडी अवचितीं तेथे आली ॥६॥
लुक वामदेव नारद । दत्तात्रेयादि महासिद्ध ।
धुव उपमन्ह प्रल्हाद । भक्तवृंद पातले ॥७॥
तुंबुरादिक गंधर्व । तेथे पातले स्वयमेव ।
अष्टनायिका घेवोनि धांव । नृत्यगौरव मांडिलें ॥८॥
नित्य लोकपाळ समुदायेंसीं । भेटो आले उपायनेंसीं ।
यत्र गंधर्व चारणेंसीं । थाट अयोध्येसीं दाटले ॥९॥
अष्टमहासिद्धींसमवेत । सुस्वर सामवेद गर्जत ।
घेवोनि ब्रह्मा आला तेथ । श्रीरघुनाथ पहावया ॥१०॥
निजध्येय श्रीरघुनंदन । ऐकोनि त्याचे अभिषिंचन ।
गणसमुदायेंसीं धांवोन । त्रिनयन तेथे आला ॥११॥
सांडोनिया शेषशयन । विचित्र रत्ने बळिदान ।
घेवोनि आला जनार्दन । श्रीरघुनंदनदर्शना ॥१२॥
जलचर स्थळचर खेचर । दानव मानव वनचर ।
त्रैलोक्यांतील चराचर । पाहू रघुवीर पातले ॥१३॥
श्रीराम तीर्थां तीर्थपीठ । त्यासी होता राज्यपट ।
पाहू आले तेथीचा थाट । त्यांही शरयूतट बसविलें ॥१४॥
वक्री अतिचार होवोनि पूर्ण । सत्वर पातले ग्रहगण ।
श्रीरामराज्याभिषिंचन । पहावया जाण आनंदें ॥१५॥
रावणाच्या पायांतळी । होते लोळत मंचकाजवळी ।
रामे सोडविले तत्काळी । त्याची राज्यशैली पाहो आले ॥१६॥
अयोध्येतील उत्साह :
अयोध्येच्या चौपासी । विमाने दाटली आकाशी ।
नगरी ठाव नाही वस्तीसी । थाटे ऐसी दाटलीं ॥१७॥
मंदार कल्पतरु संतान । घरोघरी त्यांचेनि वन ।
सुरवर सुमनसिंचन । बिदोबिदीं जाण घालिती ॥१८॥
घरोघरी मंगलार्चनें । दीपावळी नीरांजनें ।
गुढिया मखरे तोरणे । श्रीरघुनंदननिजोत्सवा ॥१९॥
हाड। हटवटिया चौबारें । कथाकीर्तन चौफेरे ।
गात रामकर्तिन गजरें । अंबर झरे तुषारीं ॥२०॥
वसिल्या भक्तीच्या पेठा । आनंदकीर्तन चौहटां ।
सांदीबिदीं राजवाटा । सुकाळ मोठा नामाचा ॥२१॥
शेट महाजन वेव्हारे । श्रीरामागमनसुखीरें ।
उदीम करिती अत्यादरें । लाभ निर्धारे श्रीराम ॥२२॥
राम टके खरें नाणे । एकी मोहरा देणे घेणे ।
अक्षसं रसाचे त्याचे निजकेणें । सवदा करणे निजसत्ता ॥२३॥
द्वैत दलालाची ओढी । नाही मापारियाची सांकडी ।
आपुलाल्या निजवडीं । द्यावया गाडी निजवस्तु ॥२४॥
राममुद्रावस्तूवरी । आख घालोनि साटीकरीं ।
देता घेता सुखचि वरी । उदीम भारी चालत ॥२५॥
भरत वसिष्ठांकडे अभिषेक -सामग्रीची विचारणा करतो :
येरीकडे वीर भरत । श्रीरामप्रेमें अत्यद्भुत ।
सस्तुरूसी शरणागत । होवोनि पुसत सामग्री ॥२६॥
श्रीरामाभिषेकसामग्री । स्वामी सांगावी झडकरी ।
कोण पदार्थ कैसिये परी । निजनिर्धारी आज्ञापी ॥२७॥
देखोनि भरताच्या प्रेमासी । अत्यंत सुख वसिष्ठासी ।
प्रीती धरोनि पोटेंसीं । निजहृदयेंसीं आलिंगिला ॥२८॥
वसिष्ठकृत भरतप्रशंसा :
भरता तुझे भाग्य गहन । भरता तुझी भक्ति धन्य ।
भरता तुझे प्रेम धन्य । भाव धन्य तुझा भरता ॥२९॥
श्रीरामाचे भजनसुख । तुवांचि सेविले सम्यक ।
भजनमर्यादा अति नेटक । आचार्यत्वें देख प्रकाशिली ॥३०॥
भरत भक्तीचें भांडार । भरत भक्तीचें निजसार ।
भरत भक्तीचें माहेर । भरतें उद्धार भक्तीचा ॥३१॥
म्हणोनि दिधले आलिंगन । प्रीतीकरोनि मुखचुंबन ।
शास्वविधी निजलक्षण । सामग्री पूर्ण अभिषेका ॥३२॥
सर्वज्ञ ज्ञाता तू होसी । विधिपाळण करू आलासी ।
तरी पूर्वीच रामसिद्धीसी । तुझपासी उषदेशिलें ॥३३॥
मानसोपचारच प्रत्यक्ष रूपाने आणवून अभिषेक करावा अशी श्रीवसिष्टांची भरताला आज्ञा :
तेणे अनुक्रमे जाण । तुवा करिता आराधन ।
अंतर्योग सुलक्षण । जेणे रघुनंदन भेटला ॥३४॥
जे केले मानसोपचार । तेचि प्रत्यक्ष साचार ।
मेळवोनि वेगवत्तर । श्रीरघुवीर अभिषेकीं ॥३५॥
लाहोनि सद्गुरूआज्ञापन । करोनि साष्टांगी नमन ।
जेथे सुग्रीव बिभीषण । तेथे ठाकून पे आला ॥३६॥
तस्य तद्वचनं शृत्वा भरत: सत्यविळमः ।
पाणी जजाह सुग्रीवं प्रविवेश ततो गृहम् ॥१॥
भरत सुग्रीव-बिभीषणाच्या भवनाला आला :
श्रीरामाचे निजगण । सुग्रीवादि बिभीषण ।
श्रीरामभवनासमान । स्थानें नेमून तया दिधली ॥३७॥
ज्यांचिया निजभवनांसी । सत्यकीर्ति सत्वराशी ।
भरत रामाभिषेकासी । पुसों विचारासी तेथे आला ॥३८॥
धरोनि सुग्रीवाचा हात । प्रवेशला भवनाआंत ।
एकासनीं आसनस्थ । निजवृत्तांत सांगत ॥३९॥
पित्राज्ञा अति दुस्तर । पाळावया रघुवीर ।
व्रते धरिली दुर्धर । जी दुस्तर सुरसिद्धा ॥४०॥
धरिता न धरवती मानसी । ऐकतो चळकांप चित्तासी ।
ती आचरला वनवासी । झालीं जगासी सुखकारी ॥४१॥
निवटोनियां रक्षोगण । मुक्त केले जनस्थान ।
दृष्ट निवटोनि रावण । सुरगण सोडविले ॥४२॥
कर्म आचरोनि अद्भुत । संपादिला सुरकार्यार्थ ।
वनी श्रमला रघुनाथ । व्रत समाप्त पै करावे ॥४३॥
श्रीरामराज्याभिषेकाची सर्व जबाबदारी आपण स्वीकारावी
अशी भरताची त्या दोघांना प्रार्थना :
तुम्ही प्रियकर रामाचे । तुमचे वचन मानी साचे ।
सुमुहुर्त अभिषेकाचें । तुम्ही साचे संपादा ॥४४॥
म्हणोनि धरिले दोनी चरण । येरू पाली लोटांगण ।
आम्ही तुझे किंकर जाण । आज्ञापन करी आम्हा ॥४५॥
सुग्रीवादि बिभीषण । अंगदादि मारुति जाण ।
भरतें नमिलें वानरगण । मृदु वचनें विनवोनी ॥४६॥
सुग्रीवासी अति प्रीती । भरत करीतसे विनंती ।
अभिषेकावया रघुपती । आज्ञा दूती करावी ॥४७॥
अभिषेकाय रामस्य दूतानाज्ञापयत्स्वयम् ।
तच्छ्रुत्वा वानरेन्द्रश्च सौवर्णांश्चतुरो घटान् ॥२॥
चतुर्णा कपिमुख्यानां ददौ रत्नविभूषितान् ॥३॥
उदईक सकाळी अभिषेकासाठी चारी दिशांचे उदक आणण्यास सुग्रीवाला भरताने सांगितले :
श्रीराम अभिषेकावया सांग । प्रभाते मुहूर्त अति अव्यंग ।
गुरुपुष्य अमृतसिद्धियोग । पाहिजे अति वेग पै केला ॥४८॥
इतर पदार्थी नाही अटक । पाहिजे चतुःसमुद्रीचें उदक ।
ते तुम्ही आवश्यक । पाहिजे सम्यक आणिले ॥४९॥
ऐकोनि भरतवचन । जोडल्या करी वानरगण ।
सुग्रीवासी विनवण । करोनि जाण पूसत ॥५०॥
कोणे दिशेप्रती कोण । जाणे नेमूनि आपण ।
शीघ द्यावे आज्ञापन । आणावया पूर्ण समुद्रजळ ॥५१॥
ऐकोनि जुत्पत्तींचे वचन । सुग्रीव झाला सुखैकघन ।
दिशा नेमूनि संपूर्ण । केले आज्ञापन सेवका ॥५२॥
हेमकुंभ रत्नाभरणी । भरतें आणिले तत्क्षणीं ।
सृष्टीचे अति प्रीतीकरोनि । दिधले वांटूनी जुत्पती ॥५३॥
उत्तरेला हनुमंत, दक्षिणेला भषभ, पश्चिमेला नळ व
पूर्वेला अंगद याप्रमाणे सुग्रीवाने उदक आणण्यास पाठविले :
उत्तर दिशा अतिदुरंत । हनुमान पाठविला तेथ ।
दक्षिणे ऋषभ विख्यात । कुंभेंसहित निघाला ॥५४॥
नळ पश्चिम समुद्रासी । वेगे निघाला हेमकुंभेंसीं ।
अति उल्लासें निश्चयेसी । पूर्वे अंगदासी नेमिलें ॥५५॥
युवराजा अति पवित्र । अति बळियाढा अंगद वीर ।
लक्षून गेला पूर्वसमुद्र । वेगवत्तर हेमकुंभें ॥५६॥
चहू दिशां चौघे जण । अति बळियाढे वानरगण ।
वेगे करोनि उढाण । क्षणे गगन आक्रमिले ॥५७॥
वेगे जावोनि सिंधुपासीं । रत्नजडित हेंमकुंभेंसीं ।
शुद्ध प्रक्षाळून वेगेंसीं । समुद्रोदकासी भरियेले ॥५८॥
त्या चौघा वीरांनी सूर्योदयापूर्वीच हेमकुंभ भरून
सागरतीर्थ आणले, त्यामुळे वसिष्टादिकांना अपार आनंद :
सूर्योदय न होता पूर्ण । घेवोनि आले समुद्रजीवन ।
वसिष्ठापुढें ठेवोनि जाण । लोटांगण घातले ॥५९॥
देखोनि वानरांचा प्रताप । उड्डाण किराण साटोप ।
वसिष्ठ सुखावला अमूप । प्रीतिपूर्वक आलिंगी ॥६०॥
श्रीरामभजनपरिपाटीं । वानरांची नित्य पुष्टितुष्टी ।
अहंसोहं सुटल्या गांठी । सद्गुरुभेटी निश्चिती ॥६१॥
देखोनिया समुद्र जीवन । सुग्रीव आणि बिभीषण ।
सुख उथळले गहन । श्रीरघुनंदन अभिषेका ॥६२॥
भरत येवोनि आपण । धरिले वसिष्ठाचे चरण ।
स्वामींनी केले आज्ञापन । श्रीरघुनंदनअभिषेका ॥६३॥
भरताने वसिष्टांना त्यांच्या पवित्र हस्ते रामांना अभिषेक करण्याचे विनविले :
तरी श्रीरामाभिषिंचन । करावया मी मशक कोण ।
स्वामींनी निजहस्तेंकरोन । अभिषिंचन करावे ॥६४॥
सद्गुरुहस्तें अभिषेक होता । अक्षय राज्य रघुनाथा ।
आम्हा सकळा अति श्लाघ्यता । जाण तत्वता स्वामिया ॥६५॥
आणि श्रीरामाचे मनोज्ञ । ऐसेंचि आहे जाण ।
जे गुरुहस्तें अभिषिंचन । ते अक्षय पूर्ण स्वामिया ॥६६॥
यालागी तुम्ही निजहस्ते । अभिषेकावें श्रीरामाते ।
ऐकोनि भरतवचनातें । वसिष्ठ चित्ते सुखावला ॥६७॥
अभिषेकाय रामस्य शत्रुघ्नः सचिवैर्तृतः ।
पुगेहिताय श्रेष्ठाय वसिष्टाय नवेदयत् ॥४॥
शास्त्रदृष्टेन विधिना महाद्भिर्विदितेन व ॥५॥
सर्वांच्या विनंतीने वसिष्ठांना संतोष :
भरत आणि शत्रुघ्न । सुग्रीवादि बिभीषण ।
सकळीं वसिष्ट प्रार्थून । केला प्रसन्न अभिषेका ॥६८॥
सुमंत आणि हनुमान वीर । सकळ प्रधानांचा भार ।
रलकुंभ जल सागर । अति सत्वर निवेदिलें ॥६९॥
देखोनि समुद्रजीवन । वरी भरताचे आज्ञापन ।
तेणे वसिष्ठ सुखायमान । केले नमन ऋषिवरां ॥७०॥
श्रीरामांच्या अभिषेकाला सर्वांची उपस्थिती, त्यांची नावे :
सकळ भूमंडळीचे ऋषीश्वर । सनकादि सिद्ध समग्र ।
नारदादि भक्तवर । सकळ रघुवीरअभिषेका ॥७१॥
ब्रह्मा जो का निजपिता । तोही बोलाविला तत्वता ।
अभिषेकावया रघुनाथा । आला धाता लोकपाळांसी ॥७२॥
यक्ष गंधर्व चारण । निगणेंसीं त्रिनयन ।
सिद्ध पातले धांवोन । श्रीरघुनंदनअभिषेका ॥७३॥
जलचर स्थळचर । दानवमानव पाताळचर ।
अयोध्ये दाटले समग्र । पहावया रघुवीरअभिषेका ॥७४॥
नभ दाटले विमानी । पृथ्वी दाटली नृपयानी ।
तेणे सुखावली अवनी । रामाभिषिंचनी आनंद ॥७५॥
वसिष्ठ सद्गुरु धर्मज्ञ । केले सकळा विज्ञापन ।
तुम्ही निज वैभवेकरून । रघुनंदन अभिषेका ॥७६॥
मंडळवर्ती आले भूपाळ । त्यांसी आज्ञापिले तत्काळ ।
उपायनें आणा सकळ । रधुकुळपाळअभिषेका ॥७७॥
त्रैलोक्यविजयी रघुपती । आला ऐकोनि अयोध्येप्रती ।
राजे पातले भूपती । अभिषेकार्थी सत्वर ॥७८॥
पूर्वपश्चिमनृपती । उत्तरेचे नेणो किती ।
दक्षिणदिशेचे भूपती । आले गडपती गडपाळ ॥७९॥
पर्वतवासी जे भूपती । म्लेंच्छ राजे नेणो किती ।
गौडबंगाल असंख्यस्थितीं । आले रधुपतिअभिषेका ॥८०॥
सर्वांनी आपापल्या योग्यतेनुरूप रामांची पूजा करावी अशी वसिष्ठांची आज्ञा :
जितुके जयाचे सामर्थ्य । तितुकेनिसीं रघुनाथ ।
स्वये पूजावा यथोचित । वसिष्ठें तेथ आज्ञापिले ॥८१॥
ऐकता वसिष्ठवचन । अवघे झाले सुखैकघन ।
यथासामर्थ्ये करोनि जाण । पूजाविधान मांडिले ॥८२॥
पूर्व दिवशी उपोषण करून रामांनी त्या दिवशी
मंगलस्नान केल्यावर वसिष्ठांकडून रामांना अभिषेक :
मुक्त करोनि जटाबंधन । सौमित्रजानकींसहित जाण ।
श्रीरामे करोनि मंगलस्नान । उपोषण पूर्वदिवसीं ॥८३॥
श्रीरामा सहजचि उपोषण । चौदा वर्षे व्रत गहन ।
राज्याभिषेकीं विधिपाळण । फळभोजन न करीचि ॥८४॥
प्रभाती गुरुपुष्यकरीं । वसिष्ठ रामासी अभिषेक करी ।
परिसा तेथींची नवलपरी । संक्षेपाकारीं सांगेन ॥८५॥
श्रीरामाचे अभिषिंचन । सकळ आकळू शके कोण ।
वक्ता एक जनार्दन । निजनिरूपण चालवित ॥८६॥
अभिषेकसोहळ्याचे रामच वर्णन करवितात :
तेथे संकोच साकल्यता । सुचूं परिहार केउता ।
स्वये श्रीराम वदनी वक्ता । कर्ता करविता तोचि तो ॥८७॥
श्रीराम आणि जनार्दन । स्वरूप एक नामे भिन्न ।
जना सबाह्य असोनि पूर्ण । करवी चळण इंद्रियांचें ॥८८॥
जनार्दन वदता वदनी । अर्थमय शब्दश्रेणी ।
उघडित प्रेमाची खाणी । निजात्मगुणीं विनवोनी ॥८९॥
नयनी देखता जनार्दन । जनार्दन वदवी वचन ।
रसने रसज्ञ आपण । घ्राणीं अवघाण सुवास तो ॥९०॥
त्वगिंद्रियस्पर्शनानंद । तो जनार्दने केला बोध ।
बुद्धीचा निश्चयो शुद्ध । अति विशुद्ध जनार्दने ॥९१॥
चेतवोनि अहंकार । दाटोवाटी निजचरित्र ।
चालवित अति सत्वर । इतर व्यापार सांडोनी ॥९२॥
असो परिहाराचा अतिशयो । कर्ता करविता रामरावो ।
तेथे कायसा संदेहो । निजनिर्वाहों श्रीरामे ॥९३॥
अभिषेक श्रीरघुनाथा । सर्वज्ञ वसिष्ठ स्वये कर्ता ।
अवधान द्यावे श्रोतां । साधकां तत्त्वता उपयोगी ॥९४॥
श्रीरामांच्या सर्व उपचारांचे आध्यात्मिक रूपकात्मक वर्णन :
सर्वदा पूर्णमनोरथ । तोचि औदुंबर सदाफळित ।
भद्रपीठ अति मंडित । तेच अद्मुत झळके की ॥९५॥
दुजे पीठ देदीध्यमान । सूर्यमंडळासमान पूर्ण ।
द्वादशकळामंडित जाण । श्रीरघुनंदनअभिषेका ॥९६॥
त्यावरी पीठ तिजें । षोडशोपचारीं विराजे ।
चंद्र देखोनि त्याते लाजे । दडी मारिजे आसनातळी ॥९७॥
एवं सूर्य अग्नि चंद्रमा । आसनातळी दाटती रामा ।
त्या श्रीरामाचा महिमा । वाग्धर्मा अनिर्वाच्य ॥९८॥
क्रोधव्याघ्राचें शोधून अंतर । क्रूरचारट सांडोनि दूर ।
शांतिचर्म अति परिपर । श्रीरधुवीरवरासना ॥९९॥
हेमकुंभ शतानुशत । दीर्घ वोसंडे वृषभ ऑ ।
सुवणभृंगार क्षीरयुक्त । अति मंडित अभिषेका ॥१००॥
अनिर्वाच्य त्याचे महिमान । जिही रामाभिषेकीं क्षीर जीवन ।
हृदयी धरिले सावधान । भाग्य गहन तयांचें ॥१०१॥
वस्त्रे सपुर विरंजांबरें । अत्यंत भावार्थ परिकरे ।
वेढावया श्रीरघुवीरें । आणिली पवित्रे पूजेसी ॥१०२॥
प्रेमजळें पूर्ण परम । सिंधुसंगम शुद्धसंगम ।
गंगायमुना त्रिवेणीसंगम । आणिली परम पवित्रजळें ॥१०३॥
सप्तधातू ते शोधित देखा । आणिले सप्त कुश सप्त मृत्तिका ।
सप्त ऋषि आणिले ऐका । रघुकुळटिळकअभिषेकीं ॥१०४॥
संकल्पविकल्पातीत । चैतन्य प्रभवे वेगयुक्त ।
मनोवेगाते जिणोनि जात । तैसा वारुवीं रथ जुंपिला ॥१०५॥
असंभावना विपरीत ज्ञान । हेचि मत्त पंचानन ।
त्याते विदारिते शार्दूल गहन । रथी जुंपोन आणिले ॥१०६॥
शुद्धसत्वें अति मंडित । चंद्रोपम छत्र श्वेत ।
श्वेत चामरे रत्नदंडयुक्त । सुवासित भक्तिव्यजनें ॥१०७॥
रामाभिषेकीं मंगल पूर्ण । शांतिगौचें गोरोचन ।
नामे हरिद्रा सुरंगपूर्ण । सौभाग्यमंडन सर्वदा ॥१०८॥
भक्तिप्रेमें लवलव । क्षीरपल्लव पद्यपल्लव ।
तोरणे बांधिलीं अपूर्व । श्रीरघुरावअभिषेका ॥१०९॥
दधिमधुघृताक्षतायुक्त । पूर्णकलशेंसी सालंकृत ।
अष्टौ कन्या पै दानार्थ । उभ्या तिष्टत अभिषेका ॥११०॥
मुकुट कुंडले कटिमेखळा । बाहुअंगदे सुमनमाळा ।
सिद्ध सामग्रिया सकळा । ब्राह्मणमेळा तिष्ठत ॥१११॥
ततः पुरोहितो वृद्धो वसिष्टो ब्राह्मणैः सह ।
रामं रत्नमये पीठे ससितं संन्यवेशयन् ॥६॥
वसिष्ठो वामदेवश्व जाबालिरथ काश्यप: ।
कात्यायनो भरद्वाजो विजय: सहगौतमः ॥७॥
अभ्यषिंचन्नरव्याघ्रं प्रसन्नेन सुगंधिना ।
सलिलेन सहस्राक्षं वसवो वासवं यथा ॥८॥
अभिषेकासाठी वसिष्ठ, वामदेव, जाबाली इत्यादी ब्रह्मर्षींची हजेरी :
षडूगुणेश्वर्यसंपन्न । वृद्ध कुळगुरु सनातन ।
श्रीवसिष्ठ ज्ञानघन । श्रीरघुनंदनअभिषेका ॥११२॥
आणिकही विख्यात ऋषिजन । ब्रह्मादि देवा नित्य मान्य ।
ज्यांचेनि नामे पापमोचन । जे भवतारण प्रतापें ॥११३॥
ऐका त्यांचे अभिधान । वामदेव जाबालि कश्यप जाण ।
कात्यायन भरद्वाज गहन । नामे पावन महीतळीं ॥११४॥
आणीकही ऋषि बहुत । जे पृथ्वीचे स्तंभ मूर्त ।
अभिषेकावया श्रीरघुनाथ । आले शीघ्रवत समकाळे ॥११५॥
अयोध्यानगरे रम्ये रत्नमंडपमध्यगे ।
स्मृता कल्पतरोर्मूले रत्नसिंहासने शुभम् ॥९॥
तन्मध्येऽष्टदलं पद्य नानारत्नप्रवेष्टितम् ।
तत्र रामं च ऋषयो ध्यायंतेऽजं परात्परम् ॥१०॥
वेदमंत्रांच्या मंगल घोषांत सर्व ऋषींनी रामजानकीला अभिषेक केला :
ऐसे ऋषिवरीं सकळिकीं । श्रीरामासहित जानकी ।
रत्नमंडपीं बैसवोनि निकी । अभिषेकीं सुमुहूर्त ॥११६॥
पुण्यपूज्य ऋषीश्वर । करिती वेदघोषउच्चार ।
दीर्घस्वरे मंत्रोच्चार । श्रीरधुवीरअभिषेकीं ॥११७॥
सुमंगलें सुवासित । पुण्यजळें अति विख्यात ।
आणिली होती पुण्योचित । तिही रघुनाथ अभिषेकिला ॥११८॥
श्रुतिस्वरांचे उच्चार । पुराणोक्त मंत्र अपार ।
जयजयकारें अंबर । गर्जे सत्वर रामनामे ॥११९॥
सकळ सुरवर स्वर्गस्थ । देवगुरुसमवेत ।
जेंवी इंद्रातें अभिषेकित । तेंवी रघुनाथ अभिषेकिला ॥१२०॥
ज्यासी जेथे जेथे अधिकार । तेणेंकरोनि रघुवीर ।
अभिषेकिला अति सत्वर । निजउद्धार व्हावया ॥१२१॥
पदाभिमानें संतप्त । हर्षविषादीं दुःखित ।
तेथोनि व्हावया निर्मुक्त । आर्ते रघुनाथ अभिषेकिती ॥१२२॥
तया अभिषेकाचें लक्षण । यथामति निवेदीन ।
साधु श्रोते स्वामी सर्वज्ञ । द्यावे अवधान कूर्मावलोकनें ॥१२३॥
ऋत्विग्भिर्बाह्मणै: सार्धं कन्याभिर्मंत्रिभिस्तदा ।
बलमुख्यैश्व संहृष्टैः सोडभिषिक्तश्च नैगमैः ॥११॥
सर्वौषधिरसैश्चैव दैवतैर्नभसि स्थितैः ।
चतुर्भिर्लोकपालैश्व समेतै: सर्वदैवतै: ॥१२॥
कोणी कोणी श्रीरामांना कसा कसा अभिषेक केला :
नित्यानित्यविवंचन । तेणे वेद श्रमला पूर्ण ।
देखोनयां रघुनंदन । केले अभिषिंचन नेतिशब्दें ॥१२४॥
ऋत्विज जे का अभिषेकार्थी । कर्मकलापक्रियायुक्ती ।
देखोनिया श्रीराममूर्ती । निष्कर्मस्थितीं अभिषेक ॥१२५॥
अष्टनायिका सौंदर्यबल । तिही देखोनि रघुकुळपाळ ।
निजावयवीं विटोनि सकळ । लाजिल्या प्रबळ अभिषेकी ॥१२६॥
मंत्री प्रधान सेनानी । सामर्थ्ये बुद्धिबळेंकरोनी ।
तेही श्रीरामाते देखोनी । अभिशिंचनीं लाजिले ॥१२७॥
वनस्पतींचा राजा सोम । ओषधिरस सर्वोत्तम ।
अभिषिंचिता रघूत्तम । सुरसोत्तम ओषधीं ॥१२८॥
चतुर्दिशांचे दिक्पाळ । देवगंधर्वादि सकळ ।
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । श्रीराम तत्काळ अभिषेकिती ॥१२९॥
अमर अमृत सेविती । परी मरणार्णवा न चुकविती ।
अमृताभिषेकीं रघुपती । अमृतप्राप्ती अमरांसी ॥१३०॥
मानवीं सिंचन प्रेमामृतें । पन्नगीं सिंचन परामृतें ।
गंधर्वीं श्रीरामाते । नादामृतें अभिषेकिले ॥१३१॥
हरिदासीं नामामृतें । अट्टाहास्ये आनंदयुक्ते ।
अभिषेकिले श्रीरामाते । केले त्रैलोक्यातें पावन ॥१३२॥
अयोध्येच्या जनी समस्ते । चित्ते विटे जीवितें ।
अभिषेकिले श्रीरामाते । उछासितें निजमनें ॥१३३॥
भरतें अभिषेकिले भावार्थे । श्रीराममाता पुत्रस्नेहार्थे ।
सौमित्र शत्रुघ्ने हर्षे तेथे । केला स्वामीतें अभिषेक ॥१३४॥
स्थावर जंगम चराचर । जीवमात्र लहान थोर ।
त्यांही राजा श्रीरामचंद्र । सर्वस्वें साचार अभिषिंचिला ॥१३५॥
छत्रं तस्य तु जग्राह शत्रुघ्नः पांडुरं महत् ।
श्वेतं व वालव्यजनं सुग्रीवो वानरेश्वरः ॥१३॥
अपरं चंद्रसंकाशं वालव्यजनमुत्तमम् ।
हृष्टो रामस्य जग्राह राक्षसेंद्रो बिभीषणः ॥१४॥
मालां ज्वलंतीं वपुषा कांचनीं शतपुष्कराम् ।
राघवाय ददौ वायुर्वासवेन प्रचोदितः ॥१५॥
रत्नाध्यक्ष: समुद्रस्तु मणिरत्नपरिष्कृतम् ।
मुक्ताहारं समादाय प्रादाच्छक्रप्रचोदितः ॥१६॥
अभिषेक समारंभात प्रत्येकाने केलेली सेवा :
भावार्थाचें वास परिकर । पीतांबर अति मनोहर ।
भरतें आणोनि सत्वर । श्रीरामचंद्र पूजिला ॥१३६॥
सद्गुरू वसिष्ठें आपण । चिद्रत्नाचे जडित भूषण ।
शीघ्र आणोनियां जाण । श्रीरघुनंदन अलंकारिला ॥१३७॥
छत्र शुद्ध श्वेतांबर । चंद्रप्रभासम परिकर ।
श्रीरामावरी प्रीतिपुरःसर । शत्रुघ्ने सत्वर धरियेले ॥१३८॥
कनकदंडे रत्नाकारें । शुभ व्यंजनें परिकरे ।
दोघा जणीं युग्मचामरे । अति सत्वरें धरियेली ॥१३९॥
सुग्रीव आणि बिभीषण । चामरधारी दोघे जण ।
स्वये होवोनि आपण । श्रीरघुनंदन वीजिती ॥१४०॥
इंद्रा अति गौरव । तेणे अमरावतीचें वैभव ।
आणोनि पूजिला राघव । सुखें स्वयमेव बंदिमोचनें ॥१४१॥
देखोनि इंद्राची पूजनकळा । आनंद सकळा लोकपाळां ।
वायूनें येवोनि तत्काळा । घनसांवळा पूजिला ॥१४२॥
कांचनयुक्त रत्नमाळा । विचित्रगुणी विचित्रकळा ।
आणोनियां तत्काळा । घनसावळां पूजिला ॥१४३॥
जावोनि शेषशयनींहूनी । रामे निवटिला दशाननी ।
क्षीरसागरें संतोषोनी । भेटी रामालागोनी आणिली ॥१४४॥
स्वये रत्नांचा निकर । विचित्र रत्नें परिकर ।
मुक्तघोषीं मंडित हार । गुंफोनि सत्वर आणिला ॥१४५॥
श्रीरामे देखोनिया दृष्टी । बाणिला जनकात्मजाकंठीं ।
तेणे शोभली गोरटी । श्रीराम नेहटी अंकस्थ ॥१४६॥
प्रकृत्या सीतया सार्धं सूर्यवत्तिग्मतजसम् ।
चतुर्भुजं शंखचक्रगदापंकजधारिणम् ॥१७॥
किरीटहारकेयूररत्नकुंडलशोभितम् ।
देवैः सह मुनींद्रैश्च योगिवृंदैश्च सेवितम् ॥१८॥
क्षीरसिंधूची दुहिता । जनकात्मजा सती सीता ।
संतोषावया तिच्या चित्ता । श्रीरामे सीता पूजिली ॥४७॥
इतरही जे जे लोकपाळ । यथासामर्थ्यें अविकळ ।
पूजिते झाले पै सकळ । रघुकुळपाळ निजराजा ॥४८॥
यथासामर्थ्यें यथाचित्तें । वित्ते जीवितें भावार्थे ।
पूजिते झाले श्रीरामाते । उल्लासित मानसी ॥४९॥
श्रीरामाचा राज्याभिषेक । पाहू आले तिन्ही लोक ।
तिही यथासामर्थ्ये देख । रघुकुळटिळक पूजिला ॥१५०॥
सिंहासनारूढ श्रीरामांची निस्सीम तेजस्विता :
सिंहासनी श्रीरामचंद्र । शोभा शोभली विचित्र ।
लाजोनि रविचंद्र । प्रकाश मनोहर सुखमय ॥१५१॥
ते काळींच्या रूपासी । सीमा न करवे शास्त्रांसीं ।
मौन पडले उपनिषदांसी । नेति वादेंसी वेद परते ॥१५२॥
तया रूपाचें वर्णन । वदावया मी अल्प दीन ।
कृपाळू एका जनार्दन । निजात्मवर्णन सांगत ॥१५३॥
श्रुतीस रिघतां जेथे सांकडें । परेसी सर्वथा नातुडे ।
तेथे वैखरी सैरां वावडे । हे सामर्थ्य घडे गुरुकृपेसीं ॥१५४॥
गुरुकृपेचे निजपक्षें । अलक्ष लक्षेंवीण लक्षे ।
निर्विकल्पीं सावकाशे । स्वये प्रकाशे मन बुद्धि ॥१५५॥
तो जगद्गुरू जनार्दन । एकाएकी वोळला पूर्ण ।
श्रीरामस्वरूपाचें वर्णन । आपल्या आपण सांगत ॥१५६॥
त्या श्रीरामाचे स्वरूपवर्णन । श्रोते परिसोत सावधान ।
एका विनवी जनार्दन । स्वानंदघन श्रीराम ॥१५७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामराज्याभिषेको नाम त्र्यशीतितमोऽध्यायः ॥८३॥
ओंव्या ॥१५७॥ श्लोक ॥१८॥ एवं ॥१७५॥
