वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › १९. कुंभकर्णाला जागे करणे

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088162 · अभंग क्र. १९

19.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय एकोणिसावा ॥
रावणाचा पराजय

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पूर्वप्रसंगाच्या अंती । नीळ मूर्च्छित पडिला क्षिती ।
रावण मिरवी यश कीर्ती । गर्वोन्नति विजयाची ॥१॥

विसंज्ञं वानरं दृष्टवा रणोत्सुकः ।
रथेनांबुदघोषेण सौ‍मित्रिमभिढुद्रुवे ॥१॥
तमाह सौ‍मित्रिरदीनसत्त्वो विस्फारयंतई धनुरप्रमेयम् ।
अवेहि मामद्य निशाचरेन्‍द्र न वानरांरत्वं प्रतियोद्धुमर्हसि ॥२॥
स तस्य वाक्यं प्रतिपूर्णघोषं ज्याशब्दमुग्रं च निशम्य राजा ।
आसाद्य सौ‍मित्रिमुपस्थितं तं रोषान्वितं वाक्यमुवाच रक्षः ॥३॥
दिष्ट्यासि मे राघव दृष्टिमार्गं प्राप्तोऽन्तगामी विपरीतबुद्धिः ।
अस्मिन्‍क्षणे यास्यसि मृत्युलोकं संछाद्यमानो मम बाणजालैः ॥४॥

नीळाला नेत असता लक्ष्मणाच्या आगमनामुळे रावण परतला :

श्रीरामस्मरणें सुखसंपन्न । नीळ निजसुखें मूर्च्छापन्न ।
त्याते देखोनि विसंज्ञ । दशानन विचारी ॥२॥
वानरांचा सेनापती । रावणे आणिला रणख्याती ।
ऐशी मिरवावया कीर्ती । नीळ लंकेप्रती स्वये न्यावा ॥३॥
तंव नीळाची सोडवण । करु पावला लक्ष्मण ।
सज्जोनिया धनुष्यबाण । संमुख रावण लक्षूनी ॥४॥
रावन म्हणे निजचित्तीं । रामसैन्यीं वीर भद्रजाती ।
मज न लभे यश कीर्ती । ऊर्मिलापति स्वये आला ॥५॥
आजि लक्ष्मणासी रण । युद्ध करणे निजनिर्वाण ।
ऐसा करोनिया पण । स्वये रावण परतला ॥६॥

रावणाचा लक्ष्मणाकडून अधिक्षेप :

मेघ गर्जती कडकडाट । तैसा रथाचा घडघडाड ।
लक्ष्मणेंसीं निकटानिकट । युद्धा दशकंठ स्वये आला ॥७॥
रावणासी म्हणे सौ‍मित्र । लंकाधिपति तू दशशिर ।
मस्तकी ढळती छत्र चामर । त्या तुज वानर गांजिती ॥८॥
जरी अंगी आहे आंगवण । तरी मजसी करी पा रण ।
लक्ष्मणे साधिले रणांगण । धनुष्यबाण सज्जूनी ॥९॥
लक्ष्मणे करिता ज्याघोष । नादें त्रासला लंकेश ।
जीवी लंकेश । जीवी बैसला परम त्रास । वीरवित्रास सौ‍मित्र ॥१०॥
ज्याघोष तळघोषेंसीं जाण । ऐकोनि सौ‍मित्राचें वचन ।
कोपे कोंदला दशानन । रणी गर्जोन अनुवादे ॥११॥
आजी माझे मनोरथ । शिवे संपूर्ण केले येथ ।
लक्ष्मण आला रणाआंत। करीन घात बाणे एके ॥१२॥
शूर्पणखीचे नाक कान । येणे छेदिले आपण ।
तिचे व्हावया उत्तीर्ण । घेईन प्राण बाणे एके ॥१३॥
दृष्टी पडता लक्ष्मणासीं । बाणी निर्दळून त्यासी ।
अवश्य धाडीन मृत्युपासीं । गर्जे आवेशी रावण ॥१४॥
ऐकोनि रावणाचे गर्जन । सौ‍मित्र जाला हास्यवदन ।
करुन दावी रणविंदान । वृथा जल्पोन कार्य काय ॥१५॥

जानामि वीर्य तव राक्षसेंद्र बलं प्रतापं च पराक्रमं च ।
अबस्थितोऽहं शरणचापपाणिरागच्छ कि मोघविकत्थनेन ॥५॥
स एवमुक्तः कुपितः ससर्ज रक्षोऽधिपः सप्तशरान्सुपुंखान् ।
तान्लक्ष्मणः कांचनचित्रपुंखैश्चिच्छेद बाणैर्निशितैः सुपत्रैः ॥६॥
क्षुरार्धचंद्रोत्तमकर्णभल्लैः शरांश्च चिच्छेद न चुक्षुभे च ।
स तान्प्रचिच्छेद निशाचरेंद्रं शितानशरान्लक्ष्मणमाजघान ॥७॥

लक्ष्मणाकाडुन रावणाची निर्भर्त्सना :

सौ‍मित्र म्हणे दशानना । तुझे वीर्य शौर्य प्रताप पूर्ण ।
सर्वही मज आहे ज्ञान । सावधान अवधारी ॥१६॥
स्वयंवरी वाहता हरकोदंड । तुझे जाले काळे तोंड ।
तरी वाढिवसी बळबंड । अति तू लंड निःसंग ॥१७॥
वाळीने घोलोनि कांखेतळीं । केली सप्तसमुद्रीं आंघोळी ।
ता तू म्हणवितोसी बळी । राक्षसकुळी निःसंग ॥१८॥
तू निसंगत्वाचा निखिल राशी । राजा आणि भीक मागसी ।
तोही कपटी कपटवेषी । परदारेसी हरावया ॥१९॥
राजा निजांगें चोरी करी । हे तुझ्य़ा प्रतापाची थोरी ।
वाखाणिली दिगंतरीं । निःसंग संसारी तू एक ॥२०॥
चोरी करुनिया परनारी । पळोनि लपसी लंकापुरीं ।
तरी वानिसी बळाची थोरी । निःसंग संसारी तू एक ॥२१॥
तुझ श्वेतद्विपाप्रती । दासी लाता देवोनि नाचविती ।
हेही तुझी परम ख्याती । निर्लज्ज निश्चती तू एक ॥२२॥
कपटवेषे भीक मागतां । सीतेसी स्वये म्हणविसी माता ।
तिसीच करु पाहसी कांता । मातृगामिन महापापी ॥२३॥
चोरीमारी परद्वारी । मातृगामी दुराचारी ।
इतुकीं ब्रीदे तुझ्या शिरी । लाज संसारी तुज नाही ॥२४॥
असो हा तुझा निंद्य वृत्तांत । माझा करीन म्हणसी घात ।
तो मी शरचापसमन्वित । युद्धाआंत उभा असे ॥२५॥
रणी करोनि दावी ख्याती । त्याते वीर शूर प्रतापी म्हणती ।
जे का वृथा बडबड करिती । त्यांते निंदिती अधमत्वें ॥२६॥
सज्जूनियां धनुष्यबाण । म्या साधिलेंसे रणांगण ।
माझा घेणे आहे प्राण । यावे आपन संग्रामा ॥२७॥
शुर्पणखीचे नाक कान । छेदिलें हे कर्म सामान्य ।
नाककानेंसी दशानन । आजि छेदीन संग्रामी ॥२८॥
रावणा ऐके माझी गोष्टी । संग्रामी देवों नको पाठी ।
मग मी न लगें तुझ्या पाठी । कडकडाटीं झुंझावें ॥२९॥

लक्ष्मण व रावणांचे अस्त्रयुद्ध :

ऐकता सौ‍मित्राचें वचन । हृदयी पोळला दशानन ।
सुवर्णपत्री निर्वाणबाण । विंधी दारुण शर सप्त ॥३०॥
रावणाचे सातही बाण । हेळा सौ‍मित्र सांडी तोडून ।
तेणे क्षोभला रावण । असंख्य बाण वर्षला ॥३१॥
ज्या बाणांच्या कडोविकडी । सुरासुर पाडिले निर्वडी ।
ते ते बाण सौ‍मित्र तोडी । जेंवी सर्पकोडी खगेंद्र ॥३२॥
गरुड छेदी भुजंगभार । तेंवी रावणाचे दर्धर शर ।
रणी पसरले अपार । तेणे दशशिर गजबजित ॥३३॥
तेचि समयी सौ‍मित्र । निर्दाळावया दशशिर ।
सुवर्णपत्री सुपुंख शर । विंदिले विचित्र ते ऐका ॥३४॥
सुरुप भाळी सतेज शर । नाराच नाळीक अर्धचंद्र ।
सवेग विंधिता सौ‍मित्र । बाणी जर्जर लंकेश ॥३५॥
तरी बळियाढा रावण । निवारोनि लक्ष्मणाचे बाण ।
घ्यावया लक्ष्मणाचा प्राण । अस्त्र निर्वाण प्रयोजी ॥३६॥
काळी कराळी कंकाळास्त्र । देहदमनी दाहकास्त्र ।
अखंडास्त्र विखंडास्त्र । दंडे दंडास्त्र मारक ॥३७॥
चंडास्त्र ग्रचंडास्त्र । दंडास्त्र विततंडास्त्र ।
घातनास्त्र पातनास्त्र । निमेषं सौ‍मित्र निवारी ॥३८॥
निर्वाणास्त्र अति क्रूर । ज्याचेनि होय सर्व संहार ।
रागे मोकली दशशिर । ते सौ‍मित्र निवारी ॥३९॥
निर्वाणास्त्रें माझी समस्त । हेळां सौ‍मित्रे केलीं व्यर्थ ।
रावण चुरी दोनी हस्त । दांत खांत करकरा ॥४०॥
हृदयी आली आठवण । ब्रह्मदत्त वरदबाण ।
रणी मारावा लक्ष्मण । रागे रावण विंधित ॥४१॥

शरेण कालग्निसमप्रभेण स्वयंभुदत्तेन ललाटदेशे ।
स लक्ष्मणो रावणसायकार्तश्चाल चापं शिथिलं प्रगृह्य ॥८॥
पुनःस संज्ञां प्रतिलभ्य कृच्छ्रच्चिच्छेद चापं त्रिदशेंद्रशत्रोः ।
निकृत्तचापं त्रिभिराजघान बाणौस्तदा दाशरथिः शिताग्रैः ॥९॥
स सायकार्तो विचचाल राजा कृच्छ्राच्च संज्ञां पुनराससाद ।
स कृत्तचापः शरताडितश्च मेदार्द्रगात्रो रुधिरावसिक्तः ॥१०॥

रावणाच्या ब्रह्मदत्त वरदबाणाने लक्ष्मणाचा वेध :

ब्रह्मदत्त वरदबाणांसी । रावण विधी रणाभिवेषीं ।
लक्ष्मण निवारीचना त्यासी । वंदिली शिसी ब्रह्माज्ञा ॥४२॥
श्रीराम आणि लक्ष्मण । अन्यथा न करिती ब्रह्मवचन ।
ललाटीं वंदिला वरद बाण । दिसे संपूर्ण रुतलासा ॥४३॥
ब्रह्मवराचा वरदहस्त । बाण नव्हेती गंधाक्षत्त ।
सौ‍मित्रासी रणभिषिक्त । स्वानंदे करित स्ययंभू ॥४४॥
पुढील कथेची महिमा भारी । बाण खडतरताचि शिरी ।
लक्ष्मणधैर्याची थोरी । मूर्च्छा सांवरी येतयेतां ॥४५॥
धनुष्याग्र लावोनि शिरापुढां । मूर्च्छा सांवरी वीर गाढा ।
सवेग उठोनि वेगाढा । सज्जिला मेढा शरवृष्टी ॥४६॥
शिथिल चाप शिथिल दर्प । शिथिल युद्धखटाटोप ।
ते काळी सौ‍मित्रिप्रताप । धरी साटोप ते ऐका ॥४७॥
सौ‍मित्राची शौर्यथोरी । रावण विंधितांचि शरीं ।
एक चापकरीं छेदिले ॥४८॥
भयें स्वेदसकंपशरीर । सर्वांगी वाहे रुधिर ।
सौ‍मित्रे दशशिर । केला जर्जर बाणजाळें ॥४९॥
छिन्नधन्वा लंकानाथ् । लागता बाणांचा आघात ।
चांचरी जात गडबडित । पडत पडत सांवरी ॥५०॥
वृथा गेला वरदबाण । रणी न मरेचि लक्ष्मण ।
तेणे क्षोभला रावण । शक्ति दारुण स्वये सज्जी ॥५१॥

जग्राह शक्तिं सहसा सुचण्डां स्वयम्भुदत्तां युधि देवशत्रुः ।
स तां सधुमानलसन्निकाशां वित्रासनीं वानरराक्षसानाम् ॥११॥
चिक्षेप शक्तिं सहसा ज्वलंतीं सौ‍मित्रये राक्षसराजसिंहः ।
प्रदीप्यमानां रघुनन्दस्तां जघान बाणैरनलप्रकाशैः ॥१२॥
तथापि सा तस्य विवेश शक्तिर्भुजांतरं दाशरथेर्विशालम् ॥१३॥
शक्त्या तया स सौ‍मित्रस्ताडितोऽपि स्तनांतरे ः
विष्णोरमीमांस्यभागमात्मानं प्रति सोऽस्मरन् ॥१४॥

रावणाकडून ब्रह्मशक्तीचा उपयोग :

ब्रह्मयाने दिधली निर्वाणार्थी । ब्रह्मयाची ब्रह्मशकी ।
अनिवार त्रिजगती । लक्ष्मणवधार्थी मोकली ॥५२॥
रावणे सोडितांचि शक्तीसी । कोटिसूर्यसमप्रकाशी ।
कडडिली पै आकाशी । तेज चौपासी न समाये ॥५३॥
तेजे राक्षसा पडिपाडी । वानरा पडली झांपडी ।
उभय सेना त्रासली बापुडी । शक्तिकडाडी सभ्रांत ॥५४॥
शक्ति तेजे देदीप्यमान । नादें कडाडितां गगन ।
लक्ष्मण ते काळी सावधान। शरचापबाण सज्जूनी ॥५५॥
शक्ति येता अति प्रचंड । लक्ष्मणाचे बळ वितंड ।
बाणी करोनि शतखंड । शक्तिचें तोंड ठेंचिलें ॥५६॥
मागे ने सरे ब्रह्मशक्ती । पुढे न निघवे बाणाहातीं ।
जाजावली रणावर्ती । वांचती गति दिसेना ॥५७॥
लक्ष्मणाचा करावा घात । तो राहिला शक्तिपुरुषार्थ ।
शक्तिसीं आला प्राणांत । वीर विख्यात सौ‍मित्र ॥५८॥

शक्तिच्या शरणागतीस मान देऊन लक्ष्मण ती स्वतःवर घेतो :

अचुक लक्ष्मणाचे बाण । चुकविता न चुकती जाण ।
शक्ति सौ‍मित्राला शरण । माझा प्राण वांचवीं ॥५९॥
शरणागता नाही मरण । हे तंव तुमचे ब्रीद संपूर्ण ।
वांचवावया निजप्राण । शक्ति लोटांगण स्वये घाली ॥६०॥
दृढ ब्रह्मचारी तू लक्ष्मण । मी ब्रह्मयाची ब्रह्मशक्ति जाण ।
तुझे हातें कन्यारत्‍न । हृदयी संपूर्ण सांठवी ॥६१॥
तूंचि माता तूंचि पिता । मी जाले तुझी दुहिता ।
लक्ष्मणा कृपावंता । माझ्या घाता करु नको ॥६२॥
शक्तिनें म्हणतांचि शरण । लक्ष्मणे विंधों सांडिले बाण ।
शक्तिसी हे हृदयस्थान । कृपाळु पूर्ण शरणागता ॥६३॥
शक्तीने देतांचि आलिंगन । होईल परदारस्पर्शन ।
लक्ष्मणे सांडोनि देहाभिमान जाला परिपूर्ण परब्रह्म ॥६४॥

लक्ष्मणास मूर्च्छा :

जेथे नाही पुरुषप्रकृती । जेथे नाही शिवशक्ती ।
लक्ष्मण राहिला ते अद्वैती । सहजस्थिती स्वानंदे ॥६५॥
लक्ष्मण पावला विश्रांती । निर्मुक्त केली ब्रह्मशक्ती ।
श्रीरामभजनाची हे ख्याती । सकळ विश्रांति श्रीरामे ॥६६॥
धर्मयुद्धाची निजनीती । पूर्वी शिकविली रघुपती ।
लक्ष्मण राहिला तेचि गती । सहजस्थितीं स्वानंदे ॥६७॥
घातूं आली ब्रह्मशक्ति । तिसी दिधली नित्य मुक्ती ।
धन्य संतांची संगती । सुखसंवित्ती घातका ॥६८॥
बाह्यकथेची अनुवृत्ती । म्हणती योद्धा लंकापती ।
लक्ष्मण भेदूनि शक्ति । पडिला क्षिती मूर्च्छित ॥६९॥

विसंज्ञं पतितं दृष्ट्वा सौ‍मित्रिं राक्षसेश्वरः ।
अवतीर्य रथात्तूर्णमभिदुद्राव लक्ष्मणम् ॥१५॥
ततो दानवदर्पघ्नं सौ‍मित्रिं देवकंटक ।
तं पीडयित्वा बाहुभ्यां न प्रभुर्लंघनेऽभवन् ॥१६॥
हिमवान्मंदरः शैलः कैलसश्च महाचलः ।
शक्यो भुजाभ्यां संवोदुं न त्वयं राघवानुजः ॥१७॥
आश्वस्तवश्च विशल्यश्च लक्ष्मणःशत्रुसूदनः ।
विष्णोर्भागममीमास्यमात्मानं प्रत्यनुस्मरन् ॥१८॥

मुर्च्छित लक्ष्मणास नेण्याच्या प्रयत्‍नामध्ये रावणाचे दौर्बल्य :

विसंज्ञ देखोनि लक्ष्मण । रथाहूनि उडोनि रावण ।
सवेग येवोनियां आपण । मुष्टिघाते पूर्ण ताडिला ॥७०॥
रावणे हाणिता मुष्टिघात । झणाणिले दोनी हस्त ।
धापां दाटला लंकानाथ । पडत पडत सांवरी ॥७१॥
लक्ष्मणा हाणिता मुष्टिघात । माझा होऊं पाहे प्राणांत ।
त्यासी न्यावे लंकेआंत । परम पुरुषार्थ हा माझा ॥७२॥
मुख्य धूर लक्ष्मण । रथी घालिता रावण ।
त्यासी नुचले तो अणुप्रमाण । सर्वशक्तीं पूर्ण शिणतांही ॥७३॥
एके दोनी चौ हाती । लक्ष्मण नुचलें लंकापती ।
सात पांच दहाही हाती । विसां हाती कुंथत ॥७४॥
लक्ष्मणायेवढी धूर प्राप्त । माझेनि न नेववे लंकेआंत ।
कपाळ पिटी लंकानाथ । अभागी निश्चित मी एक ॥७५॥
लक्ष्मण न मरे मुष्टिघाता । लंके न नेववे घालोनि रथा ।
यासी करिता शस्त्रघाता । शस्त्रे वृथा स्वये जाती ॥७६॥
सस्त्रें हाणिता आकाशासी । जेंवी न रुपती तयासीं ।
तेंवी शस्त्रपात लक्ष्मणासी । अंग घायेंसीं आढळेना ॥७७॥
आकाशमोट बांधूं जाता । जेंवी चौपलवी ये हाता ।
तेंवी लक्ष्मणासी उचलिता । लंकानाथा अति लज्जा ॥७८॥
भाग्ये सांपडला येथ । न चले मुष्टिघात शस्त्रपात ।
न नेववे लंकेआंत । तळमळित रावण ॥७९॥
लक्ष्मणे सांडितां देह‍अहंता । देही कोंदली ब्रह्मरुपता ।
तेणे तो नुचले लंकानाथा । स्वये कुंथतां साटोपे ॥८०॥
रावण विस्मित मानसी । म्हणे शिवासगट कैलासासी ।
म्या आंदोळिलें निजबळेंसी । परी लक्ष्मणासी नुचलवे ॥८१॥
मेरु मंदार गिरिवर । निमेषे उअचलीन मी दशशिर ।
परी नुचलवे हा सौ‍मित्र । रामानुचर बळिष्ठ ॥८२॥
अचेतन पडिला लक्ष्मण । त्यासी न चले आंगवण ।
जळो माझे रावणपण । आपणा आपण निर्भत्सी ॥८३॥
लक्ष्मणासी धरिता लंकानाथ । कोपे खवळला हनुमंत ।
वज्रपाय मुष्टिघात । स्वये हाणित लंकेशा ॥८४॥

ततः कुद्धौ वायुसुतो रावणं समभिद्रवत् ।
आजघानोरसि न्यूढे वज्रकल्पेन मुष्टिना ॥१९॥
तेन मुष्टिप्रहारेण रावणो भीमविक्रमः ।
जानुभ्यां न्यपतद्‍भूमौ चचाल निपपात च ॥२०॥
विसंज्ञं रावणं दृष्ट्वा समरे भीमविक्रमम् ।
ऋषयो वानराश्चैव नेदुर्देवाश्च सासुराः ॥२१॥
हन्मानपि तेजस्वी लक्ष्मणं शुभलक्ष्मणम् ।
आनयद्राघवाभ्याशं बाहुभ्यां परिगृह्य वै ॥२२॥
वायुसूनोः सुहृत्त्वेन भक्ता परमया च सः ।
अकंप्योऽपि हि शत्रूणां लघुत्वमगमत्कपेः ॥२३॥

हनुमंताच्या मुष्टिप्रहाराने रावणास मूर्च्छा :

लक्ष्मण होता मूर्च्छान्वित । लंके नेऊ पाहे लंकानाथ ।
तेणे कोप येवोनि हनुमंत । दे मुष्टिघात लंकेशा ॥८५॥
तेणे मुष्टिघाते रावणांसी । गुडघे आदळोनि भूमीसीं ।
पालथा पडिला तोंडघसी । मोकळ्या केशीं विसंज्ञ ॥८६॥
बळिया बळी लंकानाथ । ज्यासी सुरासुर नित्य कांपत ।
त्यासी लागता वानरघात । पडे मूर्च्छित लंकेश ॥८७॥
रावण पडता मूर्च्छित । वानर रामनाचें गर्जत ।
सुरासुर जयजयकार करित । ऋषि वदत पुरुषार्था ॥८८॥

हनुमंताचा सर्वत्र जयजयकार :

देखोनि हनुमंताचे बळ । स्वर्ग मृत्यु पाताळ ।
जयजयकारीं गर्जती सकळ । राक्षसदळ खवळलें ॥८९॥
राक्षसदळीं हाहाकार । पुढे जो जो जाईल वीर ।
त्यासी कपि करील संहार । द्वंद्वी वानरा राक्षसा ॥९०॥

लक्ष्मणास मारुती रामाकडे नेतो :

विकळ पाडोनि रावणासी । हनुमंत गेला लक्ष्मणापासीं ।
उचलोनियां सावकाशीं । श्रीरामापासी आणिला ॥८१॥
होता श्रीरामदर्शन । ब्रह्मशक्तीतें उद्धरोन ।
सौ‍मित्र जाला सावधान । अगाध महिमान भक्तीचे ॥९२॥
भक्तीपासीं यश कीर्ती । भक्तीपासीं शांति विरक्ती ।
भक्तीपासीं ब्रह्मस्थिती । स्वानंदे वर्तती सर्व कर्मीं ॥९३॥
भक्तीस विकला भगवंत । भक्ताचे उच्छिष्ट स्वये काढित ।
रणांगणी घोडे धूत । शेखी होत द्वारपाळ ॥९४॥
भक्तसांकडीं समस्त । सदा सोशी भगवंत ।
ते भक्ति हनुमंतांत । सप्रेंअ वर्तत स्वानंदे ॥९५॥
विसां हाती स्वये रावण । शिणतां नुचलेचि लक्ष्मण ।
तोचि हनुमंते आपण । पुष्पप्राय जाण उचलिला ॥९६॥
अभक्ता जो दुर्धर नेमस्त । तो भक्ता जड नव्हे भगवंत ।
यालागी पुष्पप्राय हनुंमंत । स्वये उचलित सौ‍मित्र ॥९७॥
होता श्रीरामदर्शन । सौ‍मित्र जाला सावधान ।
वानरा उल्लास पूर्ण । केले गर्जन रामनामे ॥९८॥

रावणोऽपि महातेजाः प्राप्य संज्ञा महाहवे ।
आददे निशितान्बाणान्जग्राह विपुलं धनुः ॥२४॥
अस्वस्थश्च विशल्यश्च लक्ष्मणः शत्रुसूदनः ।
एतस्मिन्नंतरे वीरो दृष्ट्वा रावणविभ्रमम् ॥२५॥

लागता हनुमंताचा हात । रावण पडला होता मूर्च्छित ।
तो होवोनि स्वये स्वस्थ । शरचापयुक्त रथी बैसे ॥९९॥

लक्ष्मण सावध होतो :

येरीकडे लक्ष्मण । स्वये होवोनि सावधान ।
सज्जोनिया धनुष्यबाण । पाहे रावण युद्धार्थी ॥१००॥
मज हाणोनि ब्रह्मशक्ती । केऊता गेला लंकापती ।
त्यासी रणी लावोनि ख्याती । बाणवर्ती मारीन ॥१॥
माझे लागलिया बाण । रणी वांचला रावण ।
हे मज उणेपण । घेईन प्राण बाणे एके ॥२॥
सोडूनियां बाणवर्त । रणी रावणासीं करीन घात ।
लक्ष्मण चालिला गर्जत । शरचापयुक्त साटोपे ॥३॥
लक्ष्मण निघतां उल्लासेंसी । श्रीरामे धरिला पोटासीं ।
अति प्रीती प्रेमेंसी । गुह्य त्यापासी सांगत ॥४॥
रणी मारावा दशानन । माझी प्रतिज्ञा हे प्रमाण ।
प्रतिपाळावी आपण । रणी रावण मज द्यावा ॥५॥
तुवा करितांचि रण । निमेषें मारशील रावण ।
माझी प्रतिज्ञा होऊं नेदीं शून्य । सखा संपूर्ण तू माझा ॥६॥
किती रावणाचे बळ । रणमाराचें कैसे सळ ।
तुकोन पाहू दे एक वेळ । संग्रामशीळ तयाचे ॥७॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । सौ‍मित्र घाली लोटांगण ।
श्रीरामा देवोनि रावण । वंदूनि चरण परतला ॥८॥

लक्ष्मणं च समाश्वस्तं सैन्य च मुदितं पुनः ।
निपातितानां वीराणां वानराणां महाचमूः ॥२६॥
दृष्ट्वा रामो रणं गत्वा प्रत्ययाद्रावणं युधि ।
आयांतमुपसंगम्य हनूमान्वाक्यमब्रवीत् ॥२७॥
राम पृष्ठं समारुह्य जह्येन पापराक्षसम् ।
शृत्वा हनूमतो वाक्यं रामो दाशरथिस्ततः ॥२८॥
एवमुक्तस्तथेत्युक्ता समारुह्य प्लवंगमम् ॥२९॥

लक्ष्मणाला थांबवून श्रीराम रावणावर चाल करितात :

स्वस्थ राखोनि सौ‍मित्रासी । संग्रामा निघतां श्रीरामासी ।
युद्ध करावया रावणासीं । वानरांसी उल्लास ॥९॥
वानर घायीं अतिनिर्बुज । लाविती श्रीरामचरणरज ।
अवघे होवोनि नीरुज । नाचती भोजें संग्रामी ॥११०॥
करिता श्रीरामनामस्मरण । वानरा बाधेना जन्ममरण ।
येणे निःशंकपणे जाण । रावणी रण करु येती ॥११॥
मांडून माहेश्वरी ठाण । सज्जूनियां धनुष्यबाण।
संमुख लक्षोनिया रावण । श्रीराम रण करु आला ॥१२॥
श्रीराम करिता रणगर्जन । कांपिन्नले त्रिभुवन ।
हडबडिला दशानन । राक्षससैन्य खळबळिलें ॥१३॥

हनुमंताच्या विनंतीवरुन श्रीराम त्याच्या पाठीवर आरुढ होतात :

रावण रथी श्रीराम विरथी । देखोनि क्षोभला मारुती ।
येवोनियां श्रीरामाप्रती । करी विनंती अति नम्र ॥१४॥
रणी मर्दावया रावण । स्वये स्वामीनें कृपा करुन ।
माझे पृष्ठीं करावे आरोहण । म्हणोनि चरण दृढ धरिले ॥१५॥
ऐकोनि हनुमंताची विनंती । संतोषला श्रीरघुपती ।
हनुमंताचे पृष्ठाप्रती । शौर्यशक्ति बैसला ॥१६॥
गरुडासन वृषभासन । इंद्र ऐरावतीं आरोहण ।
अवघे दिसती तृणासमान । श्रीरामासन कपिपृष्ठीं ॥१७॥
आधींच हनुमंत परम शूर । तो जाला श्रीरामा रहंवर ।
त्यावरी बैसला श्रीरामचंद्र । आला संहार राक्षसा ॥१८॥
चालला बोलता रथ । स्वये जालासे हनुमंत ।
आला राक्षसांसी अंत । रणप्राणांत रावणा ॥१९॥
पशु अश्व जुंपिता रथी । त्यापासी पाहिजे सारथी ।
तो नाही श्रीरामरथीं । एकला मारुति रथयंता ॥१२०॥

राघवः समराकांक्षी हंतुकामस्तु रावणम् ।
गंभीरोदग्रया वाचा राक्षसेंद्रभुवाच ह॥३०॥
तिष्ठ तिष्ठ मम त्वं हि कृत्वा विप्रियमिदृशम् ।
क्व नु राक्षसशार्दूल गत्वा मोक्षमवाप्स्यसि ॥३१॥
यदिंद्रवैवस्वतभास्करान्वा स्वयंभुवैश्वानरशंकरान्वा ।
गमिष्यासि त्वं दशधा दिशो वा तथापि नैवाद्य गतो विमोक्ष्यसे ॥३२॥

श्रीरामांकडून रावणाची निर्भर्त्सना :

रणी मर्दावया दशानन । सकोप कोपे रघुनंदन ।
गिरा गभीर गर्जोन । काय आपण बोलत ॥२१॥
चोरोनियां सीता सुंदरी । येवोनि लपसी लंकापुरीं ।
माझ्या दृष्टी पडल्यावरी । कैशा परी वांचसी ॥२२॥
माझे लागलिया घाय । तुज कोण राखेल माय ।
सुरासुर जाल्या साह्य । तरी पाहे सोडिना ॥२३॥
इंद्र चंद्र वरुण कुबेर । यम वायु वैश्वानर ।
माझे देखोनि दुर्धर शर । सुरासुर कांपती ॥२४॥
माझे सुटल्या बाण । दशदिशा पळतां जाण ।
कोणी राखों न शके प्राण । अलोट मरण तुज आले ॥२५॥
माझे सुटल्या बाण । धाके सुरवर सांडिती प्राण ।
तेथोनि तुज राखेल कोण । अलोट मरण तुज आले ॥२६॥
जन्मोनियां ब्रह्मवंशीं । महापापी तू जालासी ।
ब्रह्मा क्षोभलासे मानसी । राक्षसांसी प्रळयांत ॥२७॥
चोरीमारी परदारी । इतकीं पापें रावणा तुझे शिरी ।
तेणे ब्रह्मा क्षोभला भारी । निशाचरी प्रळयांत ॥२८॥
माझे सुटलिया बाण । ब्रह्मा बापुडे ब्राह्मण ।
त्यासी नव्हे निवारण । अलोट मरण तुज आले ॥२९॥
रावणा तू तंव पापमूर्ती । अति उन्माद विषयासक्ती ।
भोग मागतां पार्वती । शिव तुजप्रती क्षोभला ॥१३०॥
स्वामीची जे निजकांता । ते तंव सेवकाची निजमाता ।
मातृगामी तू लंकानाथा । उमा मागतां प्रळयांत ॥३१॥
चोरिता श्रीरामाची दारा । परम क्षोभ श्रीशंकरा ।
निर्दाळावया निशाचरां । प्रळयरुद्रा प्रेरिलें ॥३२॥
ऐकोनि श्रीरामवचन । हृदयी खोंचला दशानन ।
हनुमंतावरी दुर्धर बाण । रागे रावण विंधित ॥३३॥

राघवस्य वचः श्रुत्वा राक्षसेंद्रो महाकपिम् ।
आजघान शरैस्तीक्ष्णैः कालवैश्वानरापमैः॥३३॥
ततो रामो महातेजा रावणेन कृतं व्रणम ।
दृष्ट्वा प्लवंगशर्दूलं क्रोधस्य वशमभ्यगात् ॥३४॥
तस्याभिसंगम्य रथं सचक्रं साश्वध्वजच्छत्रमहापताकम् ।
ससारथिं साशनिशुलखड्गं रामः प्रचिच्छेद शरैः सुतीक्ष्णैः ॥३५॥

राम रावण यांचे युद्ध :

तीव्र बोलता रघुनाथ । हृदयी पोळला लंकानाथ ।
करावया हनुमंताचा घात । बाण सज्जित साटोपे ॥३४॥
खंडोनि माझी रथगती । सव्यासव्य चक्राकृती ।
रणी विचरतो मारुती । दुर्धर शक्ती वानरा ॥३५॥
येणे मारिला अखयासुत । इंद्रजित केला हताहत ।
मुख्य द्वंद्वी हा हनुमंत । याचा घात मी करीन ॥३६॥
माझ्या रथासी समान । येणे आणिला रघुनंदन ।
याचे करीन मी हनन । सवर्म बाण विंधोनी ॥३७॥
अडकलाहे श्रीरामातळी । उडोन जाऊ न शके बळी ।
तंव मी याची करीन होळी । बाणजाळी विंधोनि ॥३८॥
ऐसे बोलोनि दशशिर । बाण घेवोनि दुर्धर ।
रणी लक्षोनिया वानर । शर सत्वर विंधिला ॥३९॥
बाण लागतांचि जीवी । हनुमान निर्द्वद्व सर्वभावीं ।
रावणाते वाकुंल्या दावी । घायाची पदवी पोंचट ॥१४०॥
बाण नव्हेती सुमनमाळा । तुवा घातली माझे गळा ।
घाये उल्लास गोळांगळा । राक्षसदळा ॥४१॥
हे ऐकोनि दशशिर । बाण घेऊनि दुर्धर ।
रणी लक्षोनि वानर । शर सत्वर विंधित ॥४२॥
हनुमान जाला श्रीरामरथ । पुच्छे राक्षससैन्यघात ।
मुख्य धुरांतेंचि घोळसीत । रणकंदनार्थ कपिपुच्छ ॥४३॥
कपिपुच्छाचा दुर्धर मार । राक्षसदळीं हाहाकार ।
तेणे दचकला दशशिर । रणी वानर नाटोपे ॥४४॥
हनुमंतासीं बाणघात । देखोनिया रुधिरोक्षित ।
रणी कोपला श्रीरघुनाथ । लंकानाथ दंडावया ॥४५॥
अति लाघवी रघुनंदन । कैसे कैसे केले रणविंदान ।
भ्रमचक्री पडे रावण । तैसे बाण सोडिले ॥४६॥

बाणाच्या पिसार्‍याने रावणास रथासह उडविला :

बाणपिसारियाचा पवन । सरथ उडविला रावण ।
वाहटुळीमाजी भ्रमे पान । तेंवी भ्रमण लंकेशा ॥४७॥
बाणपिसारियाचा वारा । रावण उडविल अंबरा ।
परिभ्रमे गरगरा । रथी थरथरां कांपत ॥४८॥
श्रीरामयुद्धाची कडाडी । रावणा पाडिली रणझांपडी ।
अतिशयेंसी हडबडी । रणनिर्वडी विसरला ॥४९॥
बाप लाघवी रघुनाथ । अश्व सारथी ध्वजेंसी रथ ।
बाणी छेदिला आकाशांत । छत्रपात सचक्र ॥१५०॥

रावणाच्या रथाच्या घोड्यांचा व सारथ्याचा वध :

तयाचि लाघवामाझारीं । चाप छेदोनि वरच्यावरी ।
मुकुट छेदोनियां शिरी । धरेवरी पाडिला ॥५१॥
छेदोनि पाडितांचि रथ । पालथा मुखीं लंकानाथ ।
धरेवरी आदळत । पर्वतपात जेवी होय ॥५२॥

तं विज्वलंतं तु समीक्ष्य रामः समाददे दिप्तमथार्थचंद्रम् ।
तेनार्कवर्ण सहसा किरीटं चिच्छेद रक्षोधिपतेर्महात्मा ॥३६॥
तन्निर्विषाशीविषसन्निकाशं शांतार्चिषं सूर्यमिव प्रकाशम् ।
गतश्रियं कृत्तकिरीटकुंडलं प्रोवाच रामो युधि राक्षसेंद्रम् ॥३७॥
क्रुतं त्वया कर्म महत्सुतीवं हतप्रवीरश्च कृतस्त्वयाहम् ।
तस्मात्परिश्रांत इति व्यवस्य न त्वां शरैर्मुत्युवशं नयामि ॥३८॥

रावणाच्या मुकुटाचा छेद व त्याचे भूमीवर पतन :

बाणार्धशंद्रकडकडाट । सकुंडल छेदिला मुकुट ।
रणी गांजिला दशकंठ । वीर वरिष्ठ श्रीराम ॥५३॥
दांत पाडिलिया देख । जैसे सर्पांचें शमे विख ।
तेंवी संग्रामी दशमुख । बळे निःशेष सांडवला ॥५४॥
जेंवी शांत होय हुताशन । सूर्यासी गिळी अभ्रघन ।
तेंवी संग्रामी दशानन । हन दीन आभासे ॥५५॥
मुकुट कुंडले छेदिलीं शिसी । विरथ रावण मोकळे केशीं ।
संमुख देखोनि श्रीरामासी । कासाविसी होतसें ॥५६॥
बाणापिसारियाचा वारा । सरथ उडविला अंबरा ।
त्यासी भिडावया श्रीरामचंद्रा । न धरवे धीर लंकेशा ॥५७॥
करिता श्रीरामासी रण । माझी न पुरे आंगवण ।
आता त्याचे सुटल्या बाण । अवश्य प्राण घेतील ॥५८॥
रणी सहाय यावा दुसरा । तंव कपिपुच्छे निशाचरा ।
थोर लाविला भेदरा । मुख्य धुरा घोळसूनी ॥५९॥
हनुमान होवोनि श्रीरामरथ । पुच्छे राक्षसा करी आघात ।
जो तो दडे जेथींचा तेथ । लंकानाथ कोण पाहे ॥१६०॥
कपिपुच्छे राक्षसश्रेणी । त्रासियेल्या रणांगणी ।
रावण साह्य न ये कोणी । तोही रणी धांकत ॥६१॥
कपिपुच्छे राक्षसभार । रणी गांजिले निशाचर ।
रामे गांजिला दशशिर । दुर्धर शर वर्षोनी ॥६२॥

रावणाला श्रीराम केविलवाण्या स्थितीमुळे विश्रांतीसाठी सोडतात :

छत्रपात शस्त्रपात । रथपातेंसी कळापात ।
दीन देखोनि लंकानाथ । आश्वासित श्रीराम ॥६३॥
सावध ऐके दशानना । तुज म्या दिधले जीवदाना ।
आजि मी न घे तुझ्या प्राणा । जाय परतोन लंकेसी ॥६४॥
तुझे पुत्र आणि प्रधान । वानर म्हणती हीन दीन ।
तिही तुजसी केले रण । आंगवण जंव पुरे ॥६५॥
वानरांसी करिता रण । भागलासी संपूर्ण ।
माझे साहतां दुर्धर बाण । अति क्षीण जालासी ॥६६॥
भंगल्याचा करिता घात । हा तंव नव्हे गा पुरुषार्थ ।
आजींचा चुकला आघात । लंकेआंत जाय वेगी ॥६७॥
जावोनि भगिनी निजकलत्र । संबोखी पुत्र पौत्र ।
सुखे सुहृद स्वगौत्र । पाहे समग्र लंकेशा ॥६८॥
माझ्या बाणाचा बाणावर्त । तो तुज रावणा प्राणांत ।
एक वेळां जावोनि लंकेआंत । भोगी मुख्यार्थ प्रिय कांता ॥६९॥

स एवमुक्तो हतमानदर्पो निकृत्तचापः स हताश्वसूतः ।
अन्यं रथं सारथिना प्रणीतं समारुरोहाथ विवृद्धलज्जः ॥३९॥
शोकार्दितः कृतमहाकिरीटो विवेश लंकां सहसा गतश्रीः ।
तस्मिन्प्रविष्टे रजनीचरेंद्रे महाबले दानवदेवशत्रौ ॥४०॥
हरीन्विशल्यान्सह लक्ष्मणेन चकार रामः परमाहवाग्रे ॥४१॥

हीन, दीन स्थितीमध्ये रावणाचे लंकेस प्रयाण :

तुज दिधले जीवदान । ऐकोनि रामाचे वचन ।
रावण जाला हीन दीन । लज्जायमान रणरंगी ॥१७०॥
रावणाची गेली राजकळा । अंगी बाणली अवकळा ।
शौर्यवीर्यधैर्यबळा । रामे नागविला रणरंगी ॥७१॥
रावणाचे ब्रीद गहन । आपणा म्हणवी अरिदर्पघ्र ।
श्रीराम दर्पघ्ना दर्पघ्न । दशानन दंडूनी ॥७२॥
रावणाच्या शरीरभारा । मुसमुसित गर्वफुगार ।
बाणपिसार्‍याचा वारा । दशशिरा गर्वभंगा ॥७३॥
रणी क्षोभोनि रघुनाथ । रावणा केले हताहत ।
आणिक आणोनियां रथ । लंकेआंत प्रवेशे ॥७४॥
निर्वाणशस्त्रे अति प्रबळ । शर चाप त्रिशूळ शूळ ।
परिघ पट्टिश शक्ति सबळ । केले निर्मूळ श्रीरामे ॥७५॥
मुकुट कुंडले नाहींत शिसी । रथी बैसला मोकळे केशीं ।
परम लज्जा रावणासीं । स्वये लंकेसी प्रवेशला ॥७६॥
रावण जाता पै लंकेसी । मुखीं उरल्या मसी ।
मुख न दाखवी कोणासी । अधोमुखेंसीं निघाला ॥७७॥
युद्धी अपजयो राक्षसेंद्रा । तेणे रुदन दशशिरा ।
नयनी स्रवती अश्रुधारा । लंकापुरा प्रवेशे ॥७८॥

श्रीराम स्वतःच्या शिबिरात येतात :

स्वये येवोनि रघुपती । लक्ष्मणासी भेदली शक्ती ।
आलिंगून अति प्रीती । निःशल्य करिती सौ‍मित्रा ॥७९॥
माझे सखे जुत्पती । घायवट रणी पडती ।
त्यांसी द्याया सुखविश्रांती । स्वये रघुपति रणा पाहे ॥१८०॥
घायवट पडता कपिभुज । लाविती श्रीरामचरणरज ।
तेणे जावोनि दुःखसमाज । नाचती भोजें रणरंगी ॥८१॥
वानरवीर रणांगणी । रणी पडता नाही कोणी ।
रामनामाच्या स्मरणी । उल्लासोनी गर्जत ॥८२॥
रणी भंगला दशशिर । विजयी जाला श्रीरामचंद्र ।
वानर करिती जयजयकार । नामे कपींद्र गर्जती ॥८३॥
लागली विजयवाद्यांची ध्वनी । घाव घातला निशाणीं ।
मंगळ तुरे मंगळ ध्वनी । कपिये रणी नाचती ॥८४॥
वानरा हर्ष अपार । अवघे करिती जयजयकार ।
नामे गर्जत अंबर । श्रीरामचंद्र निजविजयी ॥८५॥
एका जनार्दना शरण । रणी भंगला रावाण ।
नित्यविजयी रघुनंदन । बिभीषण आल्हादी ॥८६॥
बिभीषणाचे मनोरथ । पुरवावयालागीं रघुनाथ ।
रणी दंडिला लंकानाथ । विजयन्वित श्रीराम ॥१८७॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणपराजयो नाम एकोनविशतितमोऽध्यायः ॥१९॥
ओंव्या ॥१८७॥ श्लोक ॥४१॥ एवं ॥२२८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग