व्यापक हा विश्वंभर ।
3365.
व्यापक हा विश्वंभर । चराचर ज्याचेनी ॥१॥
पंढरिराय विटेवरी । त्याचि धरी पाउले ॥धृपद॥
अवघियांचा हाचि ठाव । देवीदेव सकळ ॥२॥
तुका म्हणे न करी सोस । भेदे दोष उफराटे ॥३॥
अर्थ :
ज्याच्यापासून चराचर उत्पन्न झाले असा हा विश्वंभर सर्व विश्वामध्ये व्यापलेला आहे. असा हा परमात्मा पंढरीक्षेत्रामध्ये माझा पंढरीचा राया विटेवर उभा आहे त्यामुळे तुम्ही त्यांचे चरण धरावे. सर्वाचा आश्रय म्हणजे हा माझा पंढरीचा राया आहे. सर्व देवी देवता म्हणजे हा देव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे या पंढरीरायाविषयी तू कोणत्याही प्रकारची चिकित्सा किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद आणि चिकित्सा तू पाहू नकोस जर असे तू केलेस तर उलटा तुला दोष लागेल व तुझ्या हातून पाप घडेल.
