देवे केले कैसे कैसे
2897.
देवे केले कैसे कैसे । उद्धरिले अनायसे ॥१॥
ऐका नवलायाची ठेव । नेणताही भक्तिभाव ॥धृपद॥
कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बसैला ॥२॥
पंखांच्या फडत्कारी । उद्धरुनी नेली घारी ॥३॥
चोरे पिंडी दिला पाव । त्या पूजने धाय देव ॥४॥
तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हा कोवळा ॥५॥
अर्थ :
देवाने कसे कसे महापराक्रम केले ते लक्षात घ्या त्याने महापापी लोकांचे देखील अनायासे सहजच उध्दार केला आहे. ज्यांच्या ठिकाणी भक्तिभाव आणि भक्तिभाव काय आहे हे देखील माहित नाही अशांचा देखील या देवाने उध्दार केला ही किती नवलाची गोष्ट आहे तेच तुम्हाला सांगायची आहे ते तुम्ही ऐका. अहो एक दिवस एक भिल्ल शिकारी व्याघ्राची शिकार करण्यासाठी बेलाच्या झाडावर बसला त्या दिवशी शिवरात्र होती आणि शिकार लवकर दिसेना म्हणून तो बेलाचे पान तोडायचा व खाली टाकायचा परंतू खाली शिवलिंग होते व अनायासे ते बेलपत्र शिवलिंगावर पडायचे कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसतांना केवळ अनायासे बेलपत्र शिवलिंगावर पडल्यावर देखील त्या भिल्लाचा उध्दार झाला व देवाने त्याला कैलासावर नेले. एक घार एक दिवस शिवलिंगावर बसली आणि सहजच तिने तिचे पंख फडकवले तर तो वारा भगवान शंकराला इतका सुखकारक वाटला की त्यामुळे भगवान शंकराने तिलाही उध्दरुन टाकले. एक दिवस एक चोर चोरी करुन पळत होता तर रात्री त्याला शिवलिंग दिसले नाही त्याने चुकून शिवलिंगावर पाय दिला तर भगवान शंकराला तो अभिषेकच वाटला व त्यामुळेच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याच्या मदतीला धावले. तुकाराम महाराज म्हणतात, माझा स्वामी फारच भोळा आहे आणि भक्तांविषयी फारच संवेदनशील म्हणजे कोवळा आहे.
