अनुभव ऐसा । मज लागला
2898.
अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥१॥
पाठी बैसली शेजारी । नव्हे शांत कोणे परी ॥धृपद॥
कोठे न लगे जावे । काही घालावया ठावे ॥२॥
तुका म्हणे कोटि । दुःखाच्याच तये पोटी ॥३॥
अर्थ :
या संसारामध्ये माझ्या पाठीमागे दु:ख लागले आहे असा अनुभव मला येत आहे. काम क्रोध हे विकार तर माझ्या पाठीवर नव्हे अगदी माझ्या शेजारीच बसले आहेत ते कोणत्याही पध्दतीने शांत होत नाहीत. काही माहिती करुन घ्यायची असेल तर कोठे जावे लागत नाही कारण मन फारच चंचल आहे ते सर्वत्र फिरतच असते. तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या पोटामध्ये कोटयावधी दु:खेच आहेत.
