समाधीचें स्थान हरिकी
1446.
समाधीचें स्थान हरिकीर्तन । येर अवघा वांयां शीण ।
कासया गुदाग्री अंगुष्ठ लाऊन । खटाटोप पसारा ॥१॥
राम कृष्णा हरि वासुदेवा । हाचि छंद असो जीवा ॥धृ.॥
आसन ध्यान मुद्रा लक्षण । कर्मकांड क्रिया धर्म जाण ।
वाउगें कासया भस्मलेपन । कीर्तन अंतरी नसेची ॥२॥
माळा मुद्रा शृंगार भारी । भाळे भोळे भोदीं निरंतरी ।
ऐशी कीर्तनमर्यादा नाही निर्धारी । निरपेक्ष हरिकीर्तन ॥३॥
श्रोता वक्ता होउनी सावधान । परनिंदा परपीडा टाकून ।
कीर्तन करावे श्रवण । रामकृष्ण नामे उच्चार ॥४॥
ऐस ऐकता कीर्तन । समाधीसी तेथे समाधान ।
अष्टांगादि कर जोडोनि । उभे सर्वदा राहाती ॥५॥
कीर्तने होय सर्व सिद्धी । तुटती भवपाश आधिव्याधी ।
एका जनार्दनी नाही उपाधी । कीर्तनी श्रवण केलिया ॥६॥
