वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ५. सुन्दरकाण्ड - अध्याय ४२ › १०. सीतेचे दर्शन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088234 · अभंग क्र. १०

10.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय दहावा ॥

सीतेचा पश्चाताप

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीतेला रावणाच्या धमक्या :

रावणे भेडसावितां सीता । त्याच्या पत्‍न्या ज्या समस्ता ।
आश्वासिती श्रीरामकांता । नेत्रवक्त्रा खुणावूनि ॥१॥

देवगंधर्वकन्याश्च विषेदू राक्षसीस्तदा ।
ओष्ठप्रकारैरपरा नेत्राकारैस्तथा परा : ॥१॥
सीतामाश्वासयामासुस्तर्जितां तेन राक्षसा ॥२॥

सीतेसी म्हणे स्वये रावण । माझी भार्या न होता पूर्ण ।
तुझा घेईन मी प्राण । नाक कान कापूनी ॥२॥
फोडा इचे दोनी डोळे । वेगे मोडा रे सिसाळे ।
स्तन कापा मांसगोळे । अंत्रमाळे काढा वेगी ॥३॥
तुझिया पातिव्रत्याची थोरी । भीड धरिली सहा मासवरी ।
आता भोगीन बलात्कारीं । राम भिकारी वनवासी ॥४॥
रावणपत्‍न्यांनी सीतेला अभयाचे आश्वासन दिले :
ऐसी गांजितां नानापरी । क्षोभोनि रावणाच्या नारी ।
आश्वासिती नानापरी । भय न धरी तू याचे ॥५॥
देवी गंधर्वी अति सुंदरी । नागकन्या निशाचरी ।
आश्वासिती सीता सुंदरी । खुणा करिती ते ऐका ॥६॥
ऐकी खुणाविती नेत्रांतरी । एकींची संज्ञा ओष्ठांतरीं ।
एकी त्या निवारिती करी । अंगुष्ठावरी अनेका ॥७॥

रावणाला ब्रह्मदेवाचा शाप :

ब्रह्मशाप रावणशिरीं । झोंबों न शके परनारीं ।
यांचे कांही भय न धरी । धीर धरी श्रीरामकांते ॥८॥
सत्यलोकी वनप्रदेशीं । रावण झोंबतां उर्वरीसीं ।
आजी नेम दिधला नलकूबरासी । तू का झोंबसी परदारे ॥९॥
बळे झोंबतां दशानन । उर्वशी करी आक्रंदन ।
तेथे आला चतुरानन । कोपायमान रावणा ॥१०॥
दुष्टा नष्टा लंकानाथा । येथोनि परदारेसीं झोबतां ।
पावसील मस्तकपाता । ब्रह्मशापता दुर्लंघ्य ॥११॥
ज्याचा निजभाव निर्मळ । त्यावरी कृपा करी सकळ ।
रावणशापाचें निजमूळ । स्त्रियांनी समूळ सांगितले ॥१२॥
असो हा मागील वृत्तांत । स्वये देखे हनुमंत ।
मंदोदरीयें लंकानाथ । नेला घरांत ते ऐका ॥१३॥

इत्युक्तो भार्यया राजा रावणः शत्रुकर्शनः ।
समादिश्य ततः सर्वा राक्षसीर्निर्जगाम हः ॥३॥
राक्षस्यो भीमरूपास्ताः सीतां सन्मतिमब्रुवन् ।
पौलस्त्यानां वरिष्ठस्य रावणस्य महात्मनः ॥४॥
दशग्रीवस्य भार्यात्वं सीते न बहु मन्यसे ।
तत : शूर्पनखा नाम राक्षसी वाक्यमब्रवीत् ॥५॥
सुरामानीयतां क्षिप्रं सर्वशोकविनाशिनीम् ।
मनुष्यमांसेन समं विभुज्य रसमंततः ॥६॥
तेन सोन्मादसानंदं नृत्यामश्च निकुंभिलें ॥७॥

रावणाच्या हुकुमाप्रमाणे राक्षसींचे सीतेला भिवविणे :

मंदोदरीयें नाना युक्ती । कौसल्यादशरथउत्पत्ती ।
शिकवोनियां लंकापती । निजधामाप्रती नेती जाली ॥१४॥
विकटा विक्राळा अति क्रूरी । राक्षसी पाचारिल्या समग्री ।
रावणा त्यांसी एकांत करी । सीता सती वश्य करा ॥१५॥
भय दाखवावे गाढे । जे भय देखतांच पुढे ।
वश्य होय मजकडे । तैसी चांभाडे पसरावीं ॥१६॥
सामदामभेदकरीं । भय दाखवोनियां भारी ।
वश्य केलिया सीता सुंदरी । कृतोपकारी मी तुमचा ॥१७॥
ऐसा करोनिया एकांत । रावण मंदोदरीसमवेत ।
निघता जाला निजधामांत । राक्षसी येत परतोनि ॥१८॥
रावणे प्रेरिलिया सत्वरा । विकटा विक्राळा वक्रनेत्रा ।
मुखे पसरोनिया क्रूरा । सीतेसामोर्या धांविन्नल्या ॥१९॥
एकी जटाकृतभारी । हरितजटा ते दूसरी ।
विस्तीर्ण कर्ण उदरावरी । स्थूळोदरी विक्राळा ॥२०॥
अहिमुखी हयमुखी महामारी । विकटा तिखटा चंडोदरी ।
आणिक राक्षसी घर्घरी । सीतेवरी धाविन्नल्या ॥२१॥
शूळ पट्टिश मुग्दल लहुडी । शस्त्रे लख्लखींत गाढीं ।
इची करा गे ताडातोडी । भीड येवढी ते काय ॥२२॥
तडतडां तोडोनि मांस नेऊ । इचें काळीज भाजोनि खाऊ ।
इचे हाडांचे मणी नेऊ । शिरा घेंऊं ओरपोनि ॥२३॥
रावणा वरी ना जनकबाळा । हिच्या काढा अंत्रमाळा ।
वेगे निमटोनि हिचा गळा । खाऊ सगळा वांटूनि ॥२४॥
काढा मारा आणी धरा । हिची शतखंडें करा ।
हाका मारिती दुर्धरा । दशशिरा वरीना ॥२५॥

शूर्पणखेच्या पोकळ वल्गना :

अवघियांचे शेवटी । आली शूर्पणखा नकटी ।
सीता लक्षोनिया दृष्टी । सांगे गोष्टी फेफांत ॥२६॥
आईक सीते रावणोत्पत्ती । मुख्य ब्रह्मयाचा पौलस्ती ।
त्याचा विश्रवा प्रजापती । रावण निश्चिती तयाचा ॥२७॥
रावण ब्रह्मयाची चौथी पिढी । वेदविभागीं प्रज्ञा गाढी ।
राज्य प्राप्त चौदा चौकडी । त्यासी तू वेडी वरिसी ना ॥२८॥
रावण ब्रह्मवंशी ब्राह्मण । श्रीराम सूर्यवंशी क्षत्रिय हीन ।
त्याची तुज आवड कोण । श्रेष्ठ वर्ण रावणाचा ॥२९॥
रावणसत्ता सुरीं असुरीं । श्रीराम केवळ भिकारी ।
ऋद्धि सिद्धि रावणाघरी । राम फळाहारी वनवासी ॥३०॥
माझा बोल आईक आता । होई रावणाची प्रियकांता ।
दिव्य भोग भोगी तत्वता । सभाग्य सीता जग मानी ॥३१॥
सांडोनिया खरवाहन । गजस्कंधीं बैसता जाण ।
जग वानी सभाग्यपण । तैसे पर्णन रावणाचे ॥३२॥

सीतेकडून अवहेलना :

शूर्पणखेचें ऐकोनि वचन । सीता सांडी हेळसून ।
जैसा हंस न पाहे शेण । तैसे वचन उपेक्षी ॥३३॥
सीता नेदी प्रतिवचन । शूर्पणखा कोपायमान ।
हिची जिव्हा कान कापून । रक्त पिईन नळीचें ॥३४॥

शूर्पणखेचा क्रोध :

आणा मद्दमैरेयांसी । इचे मांसें करू उपहारासी ।
अंगें विभागू विभागूं सकळांसी । खाऊ सीतेसी अवघ्याही ॥३५॥
सीतामेदमांसमेळें । मद्दासीं येथ चांगलें ।
खातां आनंदकल्लोळें । नाचूं निकुंबळें गोंधळीं ॥३६॥

सीतेची निर्भय व शांत वृत्ती :

राक्षसी त्या ऐशापरी । भेडसाविती अति दुर्धरी ।
सीता त्यांचे भय न धरी । श्रीरामचंद्री निजबोध ॥३७॥
न करी रूदन नव्हे दीन । श्रीरामसुखे सुखसंपन्न ।
राक्षसींचें भयमान । तृणासमान सीतेसी ॥३८॥
नित्य श्रीरामनामा स्मरतां । सीतादेहीं विदेहता ।
शंका न मनी देह छेदिता । तेंचि श्लोकार्थ अनुवादे ॥३९॥

छिन्ना भिन्ना विभक्ता वा दीप्ते वाग्नौ प्रवेशिता ।
रावणायोपतिष्ठेति कि प्रलापेन वाश्चिरम् ॥८॥

नांव वैदेही सीता सती । देहभयाची नाही भ्रांती ।
श्रीरामध्याने भयनिवृत्ती । न मानी क्षिती देहाची ॥४०॥

सीतेची श्रीरामांवरील अढळ निष्ठा :

छेदा भेदा खा समस्तीं । श्रीराम भोक्ता सर्वा भूतीं ।
परि नांवे न पाहे लंकापती । स्वप्नस्थिती स्पर्शेना ॥४१॥
देह करावा रामार्पण । तुम्हांत सबाह्य श्रीराम पूर्ण ।
तुम्ही करितांचि भक्षण । ब्रह्मार्पण देह माझा ॥४२॥
देह ठेवितां कृमि होती । तो लावावा उपकारार्थीं ।
मज भक्षावें तुम्ही समस्तीं । भोक्ता सर्वा भूतीं श्रीराम ॥४३॥
देह छिन्नभिन्न करा समस्ती । अथवा घाला अग्नीप्रती ।
परी नातळो लंकापती । जाणा निश्चिती नेम माझा ॥४४॥
कराळविकराळवदनाकृती । घर्घर हाका माराल किती ।
नाही वरणें लंकापती । स्वप्नसुषुप्ती जागृती ॥४५॥

त्याचा राक्षसींवर परिणाम :

निधडी देखोनि सीता सती । राक्षसी चळचळां कांपती ।
हे क्षोभलिया आम्हांप्रती । करील शांती अवध्यांचि ॥४६॥
आमुचा द्वेष न करी सीता । सर्वा भूती देखे रघुनाथा ।
रावण आज्ञेसीं छळिता । आम्हा समस्ता अवश्य निमणें ॥४७॥
इचेनि अभिलाषें रावण । सन्निपातें पावेल मरण ।
ऐशा राक्षसी आपआपण । स्वये गुणगुण त्या करिती ॥४८॥

राक्षसी त्रिजटा वृद्धा इतरां स्वयमब्रवीत् ।
आत्मानं खादतानार्या न सीताभक्षणं हितम् ॥९॥
स्वप्नोऽप्ययं मया दृष्टो ह्रशुभो रोमहर्षणः ।
राक्षसानामभावाय भर्तुरस्या भवाय च ॥१०॥
श्रुत्वा पप्रच्छ सा भीता त्रिजटां तामिदं वच : ।
अशेषं श्रोतुमिच्छामि तव दुः स्वप्नदर्शनम् ॥११॥
राघवश्च मया दृष्टः चतुर्दतं महागजम् आरूढः
शैलसंकाशं सीतया सहलक्ष्मणः ॥१२॥

त्रिजटेचे स्वप्नकथन :

देवोनि महाभयगर्जन । करिता सीतेसी तर्जन ।
वृद्ध त्रिजटा क्षोभोन । कोपायमान बोलत ॥४९॥
त्रिजटा बिभीषणाची भगिनी । राक्षसी सत्वशिरोमणी ।
क्रूरा राक्षसीतें निवारूनी । सत्यवचनीं अनुवादे ॥५०॥
म्या केले असता शयन । सभाग्य देखिले म्या स्वप्न ।
सीतेसी घालोनि लोटांगण । विरूद्ध वचन न वदावें ॥५१॥
सीतेसी खाऊ पाहता राक्षसी । तुम्ही खावें आपाआपणांसीं ।
सीता सती सत्वराशी । विरूद्ध इयेसी न वदावे ॥५२॥
सीता सर्वा भूतीं समान । तुम्ही का वदावे विरूद्ध वचन ।
जानकी जगदंबा परिपूर्ण । वंदा चरण तुम्ही हिचे ॥५३॥
ऐकोनि त्रिजटेचे वचन । राक्षसी झाल्या कंपायमान ।
कैंसे कैंसे देखिले स्वप्न । कृपा करोन सांगावे ॥५४॥

रामसीतादर्शन :

स्वप्नीं देखिला श्रीरघुनाथ । श्वेत गज चौदंत ।
सीतासमवेत सालंकृत । लक्ष्मणयुक्त गजस्कंधीं ॥५५॥
चवरें ढाळिती सुरासुर । भाटीव करिती नरवानर ।
ऋषी करिती जयजयकार । वाद्दें अपार वाजती ॥५६॥
श्रीरामसीता अभेदस्थितीं । म्या देखिलीं स्वप्नाप्रतीं ।
ते ऐका हो उपपत्ती । यथानिगुतीं सांगेन ॥५७॥
सूर्यासवें प्रभा संगती । चंद्रीं चंद्रिका निवविती ।
वायूसवें जैसी गती । सीता सती तेंवी रामी ॥५८॥
गुळासवें सुस्वादता । कर्पूरासवे सुगंधता ।
जळासवें शीतळता । तैसी सीता श्रीरामी ॥५९॥
ऐसा श्रीराम सीता सती । स्वप्नीं देखे मी सभाग्यस्थिती ।
देखिली रावणाची दुर्गती । तेही उपपत्ती अवधारा ॥६०॥

वरोहेण दशग्रीव : शिशुमारेण सत्कृत : ।
उष्ट्रेण च मया दृष्टो रक्तमाल्यानुलेपन : ॥१३॥
प्रयातो दक्षिणामाशां प्रविष्टो गोमयेर्हदे ।
कुंभकर्ण इंद्रजिच्च सर्वे राक्षसपुंगवा : ॥१४॥
पीत्वा तैलं प्रतताश्च क्रीडतो गोमयेर्हदे ॥१५॥

रावणादिकांची शोचनीय स्थिती :

स्वप्नी रावण देखिला दृष्टी । सर्वांगी शेंदुराची उटी ।
शेंदूर ओतिला लल्लाटीं । माळा कंठी आरक्त पुष्पांच्या ॥६१॥
दाहीं बोडकीं शिरा शिरी । मसीका टिळक लाविला नाकावरी ।
सुसरी रावणातें धरी । अधोद्वारीं न्यावया ॥६२॥
सवेंचि बैसोनि उष्ट्रावरी । दक्षिणदिशे गमन करी ।
सवेचि देखे सूकरा वरी । वैश्वानरीं क्रीडत ॥६३॥
गोमयाचे डोहाआंत । स्वेच्छा क्रीडे लंकानाथ ।
आणिक स्वप्नींचा वृत्तांत । अति अद्‌भुत तो ऐका ॥६४॥
इंद्रजित ससैन्य कुंभकर्ण । करोनिया तैलपान ।
गोमयर्हदीं क्रीडती नग्न । उन्मज्जनीं निमज्जनीं ॥६५॥
रावणनिद्रागृहावरी । वीज पडली एकसरी ।
ऐसे देखिले स्वप्नांतरी । रावणावरी दुश्चिन्ह ॥६६॥

सीतेचे दुःख :

यालागी सभाग्य सीता सती । तुम्ही वंदावें सत्ववृत्तीं ।
ऐकोनिं त्रिजटावदंती । गेल्या समस्ती ओसरोनि ॥६७॥
हनुमान म्हणे त्रिजटा भली । राक्षसी हे सात्विक देखिली ।
अति युक्त बोलिली बोली । साह्य झाली सीतेसी ॥६८॥
सीता सभाग्य अशोक । अशोकवनी बैसली देख ।
लौकिक रीती करी दुःख । ते कौतुक अवधारा ॥६९॥

राक्षसीवशगा याऽहं भर्त्स्यमाना सुदारुणम् ।
नाहं शक्ष्ये परित्यक्तं आत्मच्छेदेन जीवितम् ॥१६॥
मोघं चरित्वा च तपो व्रतं च
त्यक्ष्यामि चेज्जीवितमत्यनल्पम् ।
विषस्य दाता तु न मेस्ति किंचित्
शस्त्रस्य वा वेश्मनि रावणस्य ॥१७॥
इहस्थां मां न जानीते शंके लक्ष्मणपूर्वजः ।
हतेति का मां गत्वा च राघवात निवेदयेत् ॥१८॥

रावणाचे बंदींत मी येथ । राक्षसींअधीन वनांत ।
स्वये देवों न शके जीवित । रक्षण समस्त राक्षसी ॥७०॥
राक्षसी असता राखणी । जीव तो न देववे माझेनी ।
मज एथे विष देतें कोणी । रावणजाचणी चुकती माझी ॥७१॥
शस्त्र घालावें म्या पोटी । तंव शस्त्रदाता न दिसे दृष्टी ।
श्रीरामे सांडिली माझी गोष्टी । थोर संकटी मी पडिले ॥७२॥

श्रीराम शोधायला न येण्याचे कारण :

रावणे हिरोनि वेगेंसीं । मज आणिले लंकेसी ।
हे ना कळलें श्रीरामांसी । म्हणोनि लागेसीं न पवेचि ॥७३॥
मज राखिलें लंकेसी । ऐसे कोण सांगेल श्रीरामांसी ।
अमित पुण्य आहे त्यासी । संख्या पुण्यासी असेना ॥७४॥

शुद्धिदानाचे फल :

अन्नदान उदकदान । सामवेदाचें अध्ययन ।
द्विजदारबंधमोचन । शुद्धी समान न येती ॥७५॥
कोटि अर्बुदें राजसूययज्ञ । ग्रहणीं कोटिगोदान ।
सुवर्णपूर्ण धरादान । शुद्धी समान नव्हेती ॥७६॥
सीताशुद्धीचें उत्तर एक । श्रीरामासी परम सुख ।
ब्रह्मज्ञान त्यापुढे रंक । होय अल्पक निजमोक्ष ॥७७॥
श्रीराम पावे परम सुख । भ्रांतिगत मोक्ष न यो तुक ।
ब्रह्मज्ञान तैसेंचि देख । यज्ञदानादिक कोण पुसे ॥७८॥
माझे व्रत तप दान शीळ । मी पतिव्रता निर्मळ ।
माझी मजचि नव्हेति सफळ । झालीं निष्फळ रामेंवीण ॥७९॥
घाटा पडलिया हिरवा चणा । घाटा दिसे परी नाही दाणा ।
तैसे निष्फळ व्रत तप दान । रघुनंदनावांचोनी ॥८०॥
श्रीराम पुरूष प्रकृति सीता । जो करी नित्य यांची ऐक्यता ।
तो पुण्यपुरूष याहीपरता । नाही सर्वथा तिही लोकी ॥८१॥
त्याचेनि सुखी इहलोक । त्याचेनि सुखी परलोक ।
त्याचेनि पितरां मोक्षसुख । शिवादिक तेणे सुखी ॥८२॥

हनुमंताची मनःस्थिती :

सीतेसी श्रीरामाची गोष्टी । त्या मज होतील पुण्याच्या कोटी ।
हनुमान नाचे वृक्षसंपुटी । लाळघोंटी भेटावया ॥८३॥
धन्य धन्य सीता गोरटी । अनुवादली गोड गोष्टी ।
शब्दामृतें कर्ण घोटी । अर्थ चाटी अक्षरांचा ॥८४॥
श्रवणीं पडतांचि शब्द । अर्थ न घेता परम मंद ।
हनुमंत तदर्थी अति प्रबुद्ध । अर्थावबोध घुटकोनी ॥८५॥
बुद्धि स्फुरली हनुमंता । आता इची भेटी घेता ।
विकल्प मानील पै सीता । आला मागुता रावण ॥८६॥
तै होऊनि आला संन्यासी । आता आला वानरवेषीं ।
विकल्प रिघालिया सीतेसी । मग भेटींसी ठाव कैंचा ॥८७॥
भेटी न घेवोनि स्वये जाता । काय सांगूं श्रीरघुनाथा ।
दुरून देखिली म्या सीता । हेंही सांगता मूर्खत्व ॥८८॥
जो तो पुसेल हनुमंता । कैसी काय बोलली सीता ।
काय सांगावे समस्ता । वानरनाथा सुग्रीवा ॥८९॥
एकांती श्रीराम आपण । मज पुसे जे जे खूण ।
तेव्हा माझे काळे वदन । प्रतिवचन न देववे ॥९०॥
समुद्र लंघोनि हनुमंत । आला गेला अवघे वृथा ।
वानर टोले देतील माथा । फटमारता करतील ॥९१॥
सीतेची न घेता एकांतभेटी । हिच्या न पुसतां गुह्य गोष्टी ।
मज गेलिया परतटीं । राम जगजेठी क्षोभेल ॥९२॥

सीता संदेशरहितं मामितस्त्वरया गतम् ।
निर्दहेदपि काकुत्स्थ क्रोधनिर्दग्धचक्षुषा ॥१९॥
यद्यनाश्वास्य गच्छामि शोकेनाभिनिपीडितम् ।
सर्वथा नास्ति संदेहो देहं त्यक्ष्यति जानकी ॥२०॥
प्राप्तदोषो भविष्यामि देशस्याकथने महान् ।
यदि चेद्योजयिष्यामि भर्तारं रामकारणात् ॥२१॥
व्यर्थमागमनं तस्य ससैन्यस्य भविष्यति ॥२२॥

एकांती न भेटतां सीता । तीतें गुह्यगोष्टीं न पुसतां ।
जरी मी भेटलों श्रीरघुनाथा । काळकृतांत तो क्षोभेल ॥९३॥
श्रीरामनेत्रींचा क्रोधाग्नीं । मज जाळील तत्क्षणीं ।
भेटी न घेता सीताजननी । जाता येथूनी प्रमाद ॥९४॥
राक्षसी गांजिली हे सीता । रामविरहें अति दुःखिता ।
तिसी आश्वासन न देता । प्राण तत्वता सांडील ॥९५॥
सीतेने सांडितां प्राण । अवघे खुंटले रामायण ।
हेंही अपेश मजचि जाण । श्रीराम पूर्ण क्षोभेल ॥९६॥
सीतेनें सांडितां प्राणांसीं । हेंही अपेश माझे शिरासीं ।
हे न सांगता श्रीरामापासीं । महादोषीं मी होईन ॥९७॥
शुभाशुभ यथार्थ वार्ता । सद्‌गुरुसी न सांगता ।
परम दोष शिष्याचें माथा । वंचकता गुरूद्रोही ॥९८॥
दुःख नव्हे रघुनाथा । सुख पाहे सती सीता ।
सुख उपजे श्रीरघुनाथा । युक्ति हनुमंता आठवली ॥९९॥
न कळतां राक्षसासी । स्कंधी वाहोनि सीतेसी ।
स्वये नेतां श्रीरामापांसी । सुख श्रीरामासी उपजेना ॥१००॥
घेवोनि वानरांचे सैन्य । करी सज्जोनि धनुष्यबाण ।
रामे वधावे रावण कुंभकर्ण । सपुत्र प्रधानसैन्येंसीं ॥१०१॥
सोडावी देवांची बांदवडी । तोडावी नवग्रहांची बेडी ।
उभवावी रामराज्याची गुढी । कीर्ति चोखडी श्रीरामाची ॥१०२॥
तेथे मज नेतां सीता सती । एवढी श्रीरामाची कीर्ती ।
माजेनि होऊ पाहे अपकीर्ती । हे तंव युक्ती न ये करू ॥१०३॥

सीतेला एकांतात भेटण्याचा मारूतीचा निश्चय :

एवं अवश्य भेटावी सीता । तेही भेटी अति गुप्ततां ।
रावणाराक्षसीं न देखता । अति एकांता भेटावे ॥१०४॥
मज भेटतां सीतेपासीं । विकल्प धरील मानसी ।
पूर्वी छळिले संन्यासवेषीं । वानरतेंसी छळो आला ॥१०५॥
विश्वासावया श्रीरामभद्रा । आधी टाकू श्रीराममुद्रा ।
भावार्थ देखोनि सीता सुंदरा । भेटी वानरा ते संधी ॥१०६॥
सीताश्रीरामचंद्रा भेटी । सीतामुद्रिकासंवादगोष्टी ।
अनुपम्य कथाकसवटी । गोड गोष्टी सीतेच्या ॥१०७॥
सीता मुद्रिकासंवादकथा । अति गोड त्या हनुमंता ।
यांपुंढे फिकेपण अमृता । सावधानता अवधारा ॥१०८॥
याचे नाम सुंदरकांड । अमृतापरीस गोड ।
पुरवी ब्रह्मज्ञानाचें कोड । करी निवाड श्रोतयां ॥१०९॥
एकाजनार्दना शरण । गोडिया गोड निरूपण ।
कथा नव्हे हे ब्रह्म परिपूर्ण । समाधान जीवशिवा ॥११०॥
करिता कथानिरूपण । जीवाचे उडे जीवपण ।
शिवाचे झडे शिवपण । ब्रह्म परिपूर्ण कोंदाटो ॥१११॥
इति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीतानुतापो नाम दशमोऽध्यायः ॥१०॥
॥ ओव्या १११ ॥ श्लोक २२ ॥ एवं संख्या १३३ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग