॥ श्रीएकनाथमहाराजकृत
18.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय अठरावा ॥
रावणाच्या दाढी-मिशा मारूतीने जाळल्या
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
हनुमंतासी न चले घात । स्वये सांगे इंद्रजित ।
अवध्य वीर हा हनुमंत । साक्षेपे सांगत बिभीषण ॥१॥
इंद्रजित जो का ज्येष्ठ सुत । नानायुक्ती स्वये सांगत ।
शस्त्रास्त्री ब्रह्मपाशांत । न चले पात हनुमंता ॥२॥
शस्त्रशक्ती अस्त्रशक्ती । मंत्रशक्ती तंत्रशक्ती ।
कपटमायामोहनशक्ती । रणी मारूती न धरवे ॥३॥
कर्मपाश धर्मपाश । ब्रह्मयाचा ब्रह्मपाश ।
बांधों न शके वानरास । जन्मपाश मुख्यत्वें ॥४॥
बिभीषण प्रिय भ्राता । सांगतसे परम हिता ।
शरण रिघावे श्रीरघुनाथा । काय म्या आता करावे ॥५॥
सर्वथा अवध्य हा मारूती । इंद्रजिताची उपपत्ती ।
बिभीषणाची भिन्न युक्ती । लंकापति सचिंत ॥६॥
राग आला रावणासी । तरी मारवेना हनुमंतासी ।
अवध्यता देखोनि त्यासी । दशमुखासी अति चिंता ॥७॥
हनुमंतासी न वधितां । सकळ कुळाच्या करील घाता ।
हा न मरे मारू जाता । परम चिंता लंकेशा ॥८॥
रावण हनुमंतास त्याचे मरण कशात आहे ते विचारतो :
आण घालोनि श्रीरघुनाथा । मरण पुसे कपिनाथा ।
मरणानुक्रम आणूनि हाता । मग हनुमंता मारावे ॥९॥
ऐसे विचारोनि चित्ती । पुसावया मरणयुक्ती ।
स्तवूं आदारिला मारूती । लंकापतीनें निजमुखे ॥१०॥
ऐके वीरा हनुमंता । श्रीरामाच्या परम भक्ता ।
तुज मी पुसतसें आता । सत्य तत्वता सांगावे ॥११॥
असत्य वदों नये हरिभक्ता । शपथ घालितो रघुनाथा ।
मरण कैसेनि हनुमंत । यथार्थता सांगावे ॥१२॥
त्याला उत्तर :
ऐकोन श्रीरामाची आण । हनुमान घाली लोटांगण ।
मज सर्वथा नाही मरण । सत्य जाण लंकेशा ॥१३॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । गदगदा हांसे रावण ।
जन्मामागें अखंड मरण । मिथ्या भाषण अमरत्व ॥१४॥
रावणाचा अविश्वास व त्याची कारणे :
म्हणती अमर निर्जरा देवा । तेही पावती मरणार्णवा ।
तेथे तुझा कायसा केवा । मिथ्या हेवा अमरत्वें ॥१५॥
चौदा कल्पायुषी गरिमा । मार्कंडेयाचा मुख्य महिमा ।
तो जै जाय मरणग्रामा । तै झडे रामा रोमहर्षणासी ॥१६॥
युगानुयुगीं लोम झडे ज्यासी । ऐसा तो लोमहर्षण ऋषी ।
तोही मरे बकदाल्भ्याचें श्वासी । मरण बकदाल्भ्यासी हंसपक्षे ॥१७॥
हंसाचा पंख जेव्हा झडे । तंव बकदाल्भ्याचें आयुष्य उडे ।
त्या हंसासी मरण रोकडे । जै का नख खंडे भृशुंडीचें ॥१८॥
कूर्म हालवी निमख । तंव भृशुंडीस देख ।
मरण पावे आवश्यक । मरण अचूक सर्वांसी ॥१९॥
एवं मरणपरंपरा । कदा न सोडी थोरथोरां ।
तेथे तू पालेखाइरा । केंवी वानरा अमरत्व ॥२०॥
तपस्तेजें महाऋषीं । ते काळाची आंदणी दासी ।
श्रीरामनामी प्रेम ज्यासी । काळ त्यापासी कामारा ॥२१॥
जागृतिसुषुप्तिसहित स्वप्न । ज्यासी अखंड नामस्मरण ।
काळ त्याचे वंदी चरण । तेणे रावणा हे महिमा ॥२२॥
भक्तिभावार्थे भजन । स्वये जाणे श्रीभगवान ।
रावण विषयी अति दीन । त्यासी हे ज्ञान केंवी लाभे ॥२३॥
असो हे रावणाची स्थिती । मज श्रीरामाची भक्ती ।
माझ्या अमरत्वाची ख्याती । दावू प्रतीत रावणा ॥२४॥
हनुमंती श्रीरामभक्ति लाठी । तरी का बोले मिथ्या गोष्टी ।
मिथ्या वदलासी चावटी । कशासाठी मज सांगे ॥२५॥
आदरे पुसता रावणासीं । बुद्धि स्फुरलीं वानरासी ।
अपमानावया लंकेशासी । गुह्य त्यापासी अनुवादे ॥२६॥
त्यावर मारूतीची प्रतिक्रिया :
रावण अतिशयेसी कपटी । सत्य वदलों मी ज्या गोष्टी ।
सत्य वार्ता मानी खोटी । विकल्प पोटी रावणा ॥२७॥
सबाह्य असत्य सदोदित । त्यास न माने सत्यत्व ।
सत्यासीं सत्य भावार्थ । रावणांत तो नाही ॥२८॥
रावणाचा विकल्प झडे । माझे सत्यत्व दिसे रोकडे ।
ते साधावया धडफुडें । रावणापुढें गुह्य सांगे ॥२९॥
मरण पुससी विश्वासेंसी । तुवा मारिले जटायूसी ।
तैंसेंच मजही तू करिसी । तेणे धाकेंसीं वदे मिथ्या ॥३०॥
रावण म्हणे हनुमंतासी । मरणभय जयापासीं ।
श्रीरामभक्ति कैंची त्यासी । देहलोभ्यासी राम कैंचा ॥३१॥
हनुमान म्हणे लंकानाथा । परोपदेशी अति योग्यता ।
तुझी मी देखतो तत्वता । शेखी कपटता तुजपासी ॥३२॥
कपटें होवोनि संन्यासी । चोरोनि आणिले सीतेसी ।
सदाशिवें सोडविलासी । कपटें पावसीं कुळक्षय ॥३३॥
ऐसे हनुमंते सांगता । वर्म खोचले लंकानाथा ।
ऐक माझी मरणावस्था । तुज तत्वता सांगेन ॥३४॥
ऐकावया मारूतीचें वचन । सरसावला दशानन ।
कपि सांगे विंदान । सावधान अवधारा ॥३५॥
असत्य नाही तुजसी । मरण नाही माझ्या देहासी ।
मरण आहे पुच्छासी । ते मारिसी तै मी मरें ॥३६॥
लंकेतील घराघरातून वस्त्रे आणिली व सर्व कापड बाजार
रिता केला तरी पुच्छ संपूर्ण गुंडाळलेच जाईना :
ऐकोनि कपीचें वचन । ज्येष्ठ इंद्रजित श्रेष्ठ प्रधान ।
अवघे म्हणती सत्य भाषण । सेनानी सैन्यसमवेत ॥३७॥
वायूपरीस पुच्छ चपळ । याचे पुच्छासी प्रबळ बळ ।
पुच्छे निर्दळिलें सकळ । बळे गोळांगूळ ना मारवे ॥३८॥
पुच्छे मारिला रथसारथी । पुच्छे इंद्रजिता वाताहती ।
पुच्छे रणी लाविली ख्याती । वीरां घाती कपिपुच्छ ॥३९॥
इंद्रजित बोले देखोनि रण । पुच्छ अतिशयेंसी दारूण ।
पुच्छा मारू जाता आपण । रणकंदन करील ॥४०॥
पुच्छ खवळल्या अद्भुत । वीर मारील समस्त ।
लंका करील वाताहत । लंकानाथ केंवी वांचे ॥४१॥
इंद्रजित सेनानी प्रधान । अवघे कांपती पुच्छाभेण ।
ते देखोनि दशानन । स्वये आपण विचारी ॥४२॥
हनुमंतासी पुसे रावण । पुच्छ अतिशये दारूण ।
कैसेनि पावेल मरण । सत्य संपूर्ण सांगावे ॥४३॥
हनुमंत म्हणे दशशिरा । पुच्छाचे मरण अति दुस्तरा ।
तेलें तुपे भिजवोनि वस्त्रा । पुच्छा समग्रा गुंडाळावे ॥४४॥
हनुमान मारावया निर्धारी । अग्नि लावावा पुच्छाग्री ।
ज्वाला धडाडिलिया अंबरी । मरण वानरी तत्काळ ॥४५॥
उघडें राहिल्या तिळभरी । मरण नये पुच्छावरी ।
येईल राक्षसा महामारी । करील बोहरी लंकेची ॥४६॥
हनुमान न म्हणावा कपटी । मी सांगतो सत्य गोष्टी ।
ऐसी आंगवण असेल लाठी । तरी तू वेष्टी कपिपुच्छा ॥४७॥
ऐसी तुज असेल शक्ती । हे घे पुच्छ देतों हाती ।
शीघ्रतें वस्त्रप्रयुक्तीं । अति निगुतीं गुंडाळावे ॥४८॥
पुच्छ गुंडाळावया ओढाओढी । स्त्रीपुरूषें नागवीं उघडीं ।
लंका नागविली रोकडी । कडोविकडी पुच्छाची ॥४९॥
सभा नागविली म्या निशी । लंका नागविली दिवसीं ।
पुच्छे करोनि कासाविसी । राक्षसांसी उगाणु ॥५०॥
पुच्छ गुंडाळावयाचे मिसीं । राजद्वारी चोहट्यापासीं ।
लंका नागवी करीन दिवसीं । राक्षसांसी गर्जोनी ॥५१॥
पुच्छ गुंडाळावयाचे चाडा । सांठवणें कापड तडतडा ।
तेलासाठी लावूं झगडा । तेलिया राजदंडा करू ठावो ॥५२॥
आवडी हनुमंताचे पोटी । नगर नागवूं पुच्छासाठीं ।
अग्नि लावूं शंकात्रिकूटीं । राक्षसकोटी आजि भाजूं ॥५३॥
ऐसे विचारोनि चित्ती । पुच्छ दिधले रावणाहातीं ।
पुढे पुच्छाची व्युत्पत्ती । लाविली ख्याती ते ऐका ॥५४॥
रावण सांगे निजदासांसी । आगी लावा कपिपुच्छासी ।
भिजवोनि तैलघृतासीं । जीर्ण वस्त्रासी गुंडाळावे ॥५५॥
ऐकोनि रावणाचे वचन । वीर शूर क्रोधी पूर्ण ।
क्रूर कर्कश अति दारूण । पुच्छ संपूर्ण गुंडेना ॥५६॥
वस्त्रे सरलीं पै जीर्ण । नवीं गुंडाळावीं म्हणे रावण ।
नवीं सरलीं जाण । पुच्छ संपूर्ण गुंडेना ॥५७॥
घोंगडीं बारीक सकटें । सस्नेहें गुंडिली धुवटें ।
सखरे गुंडिलीं चोखटे । तरी न वेष्टे कपिपुच्छ ॥५८॥
घोंगडीं पांगडीं गुंडगीं खांडें । सखरे निखरें गुंडिलीं उदंडें ।
आणिली सगळीं दिंडे । तरी न गुंडे कपिपुच्छ ॥५९॥
चाटेवळी पडली ओस । तरी न पुरती पुच्छास ।
राजगृहींचीं असमसाहस । कपिपुच्छास न पुरती ॥६०॥
समस्त चाटियांचे वस्त्रभार । राजगृहींची वस्त्रे मात्र ।
पुच्छ न गुंडेचि चौतकर । अति दुर्धर वाढलें ॥६१॥
पुच्छ वाढलें दुर्धर । धाकिंनला दशशिर ।
इंद्रजितादि निशाचर । सहपरिवार धाकती ॥६२॥
कपीचें मरण पुच्छापासीं । निश्चये मानले आम्हांसी ।
पुच्छ गुंडाळावे साक्षेपेंसी । येरयेरांपासीं सांगत ॥६३॥
पडदे गुंडिती फाडफाडूं । बैठका गुंडिती उधडउधडूं ।
चांदवें गुंडिती सोडसोडूं । पुच्छ माकडु नाटोपे ॥६४॥
पुच्छ गुंडिलें बहुतेक । उरले असे भाग एक ।
ते गुंडाळावे आवश्यक । सकळ लोक सांगती ॥६५॥
पुच्छ गुंडाळावया लवडसवडीं । सभेची घेतलीं लुगडी ।
वानरे सभा केली उघडी । कडोविकडी नागविलीं ॥६६॥
सभा नागविली वीरे । आणिली रावणाची वस्त्रे ।
तरी पुच्छासी न पुरे । ओढा वानरे लाविला ॥६७॥
सेवका सांगे दशवक्त्र । नगरामाजी राहिली वस्त्रे ।
हिरोन आणा रे सत्वरें । पुच्छी वानर बांधावा ॥६८॥
जांवई आणिला दिवाळसणा । कोणाचा पाहुणा कोणाचा मेहुणा ।
दूत करिती वस्त्रहरणा । शंखस्फुरणा ते करिती ॥६९॥
नगरी नरनारी वागती । दूत त्यांची वस्त्रे हरिती ।
नागवीं पळती हळहळती । शंख करिती चहूंकडे ॥७०॥
नोवरी कुमारी गरोदरी । सौभाग्याच्या निजनगरीं ।
वाणे देती घरोघरी । साळंकारीं शोभती ॥७१॥
कपिपुच्छवेष्टनावारी । राजदूत वस्त्रे हरी ।
लाजा उघडिया पडती नारी । लंकापुरीं आकांत ॥७२॥
राजगृहीं ज्यांची चाली । नेसोनि धोत्रे वोली ।
भट्ट निघाले ते मंडळीं । वस्त्रे हरिलीं बुकलोनि ॥७३॥
भट्ट वस्त्रे न सोडिती । दूत निःशंक झोंबती ।
महाशंख नानायुक्ती । शंख करति व्युत्पन्न ॥७४॥
ओष्ठ मणगट जिव्हायुक्त । स्वर वर्ण अक्षरोक्त ।
शंख करति वेदोक्त । रावण जित की मेला ॥७५॥
अनुनासिक सानुनासिक । स्वरप्रयुक्त वेदपाठक ।
वेदव्युत्पत्ती करिती शंख । दशमुख निमाला ॥७६॥
दिवसा ढवळ्या नगराआंत । राजद्वारी वाट पाडित ।
राजा असता जीवे जित । पारिपत्य तो करीना ॥७७॥
बोंब करिता फुगलें पोट । हाका देता सुकले कंठ ।
राजा निमाला पै स्पष्ट । हा हा कटकट ब्राह्मणां ॥७८॥
हनुमान वीर जगजेठी । लंका नागविली पुच्छासांठी ।
शिणतां राक्षस कोट्यनुकोटी । पुच्छा शेवटी वेष्ठवेना ॥७९॥
अद्यापि पुच्छाचा अगरडा । बुजाला नाही दिसे उघडा ।
पुच्छवेष्टनीं लावोनि वेढा । केला बापुडा रावण ॥८०॥
पुच्छ वेष्टावयासाठीं । शिणतां राक्षसांच्या कोटी ।
पुच्छ वेष्टवेना वेष्टी । अग्र शेवटी उघडेंचि ॥८१॥
पुच्छ गुंडिता केवढें । अग्र अधिकाधिक वाढे ।
वेड लाविले माकडें । मरण रोकडे राक्षसा ॥८२॥
चाटे रडती राजद्वारी । कळकळती नरनारी ।
बोंब सुटली घरोघरी । लंकानगरीं आकांत ॥८३॥
दुर्गसंग्रहपरवडी । तेलातुपाची टांकीं गाढीं ।
अवघी पडली कोरडी । तिंबिता लुगडी पुच्छार्थ ॥८४॥
तेलतुपाचा दुष्काळ :
तेलातुपाचा पै तडा । नगरी पडलासे रोकडा ।
पुच्छ गुंडिता माकडा । लाविले वेडा लंकेशा ॥८५॥
तूप न मिळे खावया पुरतें । रावणा लागले रोकडे भाते ।
माखोनियां घ्यावया लेंकरातें । तूप कोणाते मिळेना ॥८६॥
टांकोटांक स्नेहासमाप्ती । घरोघरी मालवे वाती ।
गडद पडले लंकेप्रती । लाविली ख्याती कपिपुच्छे ॥८७॥
हनुमंताची कैसी युक्ती । ज्यांचें नगर त्याचे हाती ।
नागवितां नानाप्रयुक्ती । लाविली ख्याती कपिपुच्छे ॥८८॥
नाही झगडा ना भांडण । करिता कपिपुच्छाचें वेष्टन ।
तृणप्राय केला रावण । गाढी आंगवण हनुमंता ॥८९॥
अल्प उरले आहे अग्र । ऐसे सांगे दशशिर ।
यासी वेष्टोनि पीतांबर । मारू वानर पुच्छदाहे ॥९०॥
पीतांबरे श्वेतांबरे । पट्टकुळें मनोहरे ।
गुंडितांही क्षौमांबरें । पुच्छ नावरे कपीचे ॥९१॥
इंद्रजित धाके जीवाआंत । पुच्छे नाटोपे हनुमंत ।
अग्नि लाविलिया तेथ । करील अनर्थ लंकेसी ॥९२॥
तंव बोलिला विद्युन्माळी । वानरा आकळावया अति बळी ।
उघडी करा जनकबाळी । पुच्छ तत्काळी आकळेल ॥९३॥
रावणही धाके मानसी । पुच्छ न गुंडवे आम्हांसी ।
केंवी मारावें वानरासी । उपायो यासी दिसेना ॥९४॥
ऐसे ऐकता हनुमंते । आवरिलें निजपुच्छातें ।
दूत सांगती रावणातें । आम्ही पुच्छाते आकळिले ॥९५॥
पुच्छ पेट घेईना :
आम्ही सेवक आतुर्बळी । पुच्छ आकळिले समूळी ।
म्हणोनि पिटिली एक टाळी । केला सकळीं गडगर्ज ॥९६॥
रावण सांगे सेवकातें । अग्नि लावा रे पुच्छाते ।
पाचारोनि लोहकारांतें । लाविले भाते अग्नीसी ॥९७॥
तिये काळी हनुमंते । विनविले निजपितयातें ।
वायु सत्य सखा अग्नीतें । ज्वाळा तेथे होऊं नेदीं ॥९८॥
ज्वाळा होऊं न द्यावी येथे । ऐसे नमून वायूतें ।
गांजावया राक्षसांतें । हनुमांन पुच्छार्थे खवळला ॥९९॥
भाते फुंकितां चौपासी । अग्नि लागेना पुच्छासी ।
राक्षसें हाती कासाविसी । अग्नि पुच्छासी स्पर्शेना ॥१००॥
रावण म्हणे हनुमंतासी । अग्नि का न लागे पुच्छासी ।
हनुमंत म्हणे रावणासी । तू तंव आहेसी बहुमूर्ख ॥१०१॥
मारूतीच्या सांगण्यावरून रावण स्वतः फुंकू लागला :
वेदविभाग केला व्युत्पत्ती । तो ही न सरे वेदव्यासोक्ती ।
संतासंत न कळे स्थिती । तू जंव मूर्ति गर्वाची ॥१०२॥
संतासंतविवेक अणुवी । समूळ नाही ज्याचे जीवी ।
त्यासी न साजे राजपदवी । वृथा गर्वी तू रावणा ॥१०३॥
भाते फुंकितां अचेतन । केंवी जाळवेल सचेतन ।
हे तुज नाही विवेकज्ञान । परम अज्ञान रावणा ॥१०४॥
वचन मानले रावणासी । पाचारोनि निजविश्वासी ।
फुंकोनि अग्नि लावा पुच्छासी । राक्षसांपासी सांगत ॥१०५॥
राक्षस फुंकिता चौपासी । पुच्छे दडपिलें अग्नीसी ।
खंवट घाण रिघे घ्राणासीं । कासाविसी राक्षसा ॥१०६॥
खंवट घाणी अति प्रबळ । डोळा आसुवें मुखीं लाळ ।
एक श्वासी खोकिती सबळ । हलकल्लोळ उठिला ॥१०७॥
रावण म्हणे गा हनुमंता । पुच्छ का न जळे फुंकितां ।
हनुमान म्हणे लंकानाथा । ऐक तत्वता सांगेन ॥१०८॥
गृहस्थे आमंत्रण नेदिता । भोजना न येववे अतीता ।
तेंवी तुवा न फुंकितां । अग्नि सर्वथा प्रज्वळेना ॥१०९॥
गृहस्थें न करिता ब्रह्मार्पण । आपोशन न घेती ब्राह्मण ।
अग्नि न फुंकितां रावण । हुताशन प्रज्वळेना ॥११०॥
एकमुखें हे फुंकिती । दहा मुखें तुज आहेती ।
तुवा फुंकिलिया लंकापती । पुच्छप्रदीप्ती हुताशने ॥१११॥
हनुमंताच्या निजयुक्ती । सत्य मानी लंकापती ।
पुच्छाग्नि फुंकावयाप्रती । केली आयती ते ऐका ॥११२॥
करोनिया शुद्धाचमन । प्रथम देवोनि घृतावदान ।
फुंकावया हुताशन । दशवदन बैसला ॥११३॥
रावणाचे पोटी कपट । कपि जाळावया पुच्छासगट ।
येणे आवेशें दशकंठ । फुंकूं हव्यवाट बैसला ॥११४॥
रावणाचे निजचित्तीं । माझेनि मुखें पुच्छप्रदीप्ती ।
सांग जळालिया मारूती । जगी मत्कीर्ति स्फुरेल ॥११५॥
रावण तोंड परतें करी । हनुमान पुच्छ उचली वरी ।
पडला अपमान राजशिरीं । केली बोहरी खांडमिशां ॥११६॥
त्याबरोबर भडका उडून रावणाच्या दाढी-मिशा जळाल्या :
ऐसा धरोनि अभिमान । रावणे फुंकिता हुताशन ।
भडका एकसरें उठोन । जाले दहन दाढीमिशां ॥११७॥
प्रथम प्रारंभीं अपमान । दाढ्यामिशांचें जाले दहन ।
सिंहासनी काळे वदन । लज्जायमान रावण ॥११८॥
कीर्तीची जाली अपकीर्ती । दुसरी लज्जा रावणाप्रती ।
पुढे काय करील मारूती । चिंतावर्ती रावण ॥११९॥
एकाजनार्दना शरण । हे प्रथम पुच्छप्रकरण ।
पुढे राक्षसा गांजणें । पुरदहन अवधारा ॥१२०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
रावणस्य खांडमिशादहनं नाम अष्टादशोऽध्यायः ॥१८॥
॥ ओव्या १२० ॥ श्लोक ५ ॥ एवं संख्या १२५ ॥
