(काला व खेळया संबंधी
3678.
(काला व खेळया संबंधीचे अभंग)
यमुने पाबळी । गडिया बोले वनमाळी । आणा सिदोर्या सकळी । काला करू आजी ।
अवघे एके ठायी । करूनि स्वाद त्याचा पाही । मजपाशी आहे ते ही । तुम्हामाजी देतो ॥१॥
म्हणती बरवे गोपाळ । म्हणती बरवे गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पावे आनंदे ।
खडकी सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनिया वाटा । गडिया देतो हरी ॥धृपद॥
एकापुढे एक । घाली हात पसरी मुख । गोळा पावे तया सुख । अधिकचि वाटे ।
म्हणती गोड झाले । म्हणती गोड झाले । आणिक देई धाले । नाही पोट आमुचे ॥२॥
हात नेतो मुखापासी । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ।
देऊनिया मिठी । पळे लागतील पाठी । धरूनि काढितील ओठी । मुखामाजी खाती ॥३॥
म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घासा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठी तयाच्या ।
अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलो ॥४॥
एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरी । म्हणे पुरे आता ।
येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळो आता नीती । सांगो आदरिले ॥५॥
आनंदाचे फेरी । माजी घालुनिया हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगे पावे ।
वाकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढे । बहु भाविक ते ॥६॥
करी कवतुक । त्यांचे देखोनिया मुख । हरी वाटतसे सुख । खदखदा हासे ।
एक एकाचे उच्छिष्ट । खाता न मानिती वीट । केली लाजता ही धीट । आपुलिया संगे ॥७॥
नाही ज्याची गेली भुक । त्याचे पसरवितो मुख । अवघिया देतो सुख । सारिखे चि हरी ।
म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आता चाळविसी तरी । न वजो आणिका सवे ॥८॥
गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जाले यमुनेचे स्थिर । जळ वाहो ठेले ।
देव पाहाती सकळ । मुखे घोटूनिया लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग झालो आम्ही ॥९॥
म्हणती कैसे करावे । म्हणती कैसे करावे । यमुनाजळी व्हावे । मत्स्य शेष घ्यावया ।
सुरवरांचे थाट । भरले यमुनेचे तट । तव अधिक ची होट । मटमटा वाजती ॥१०॥
आनंदे सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेत हात । नका धुऊ कोणी ।
म्हणती जाणे जीवीचे । लाजे त्यास येथे कैचे । शेष या कृष्णाचे । लाभ थोरिवे ॥११॥
धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालो रे सकळ । तुझिया नि हाते ।
मानवले गडी । एक एकांचे आवडी । दही खादले परवडी । धणीवरी आजी ॥१२॥
तुझा संग बरवा । नित्य आम्हा द्यावा । ऐसे करूनि जीवा । नित्य देवा चालावे ।
तव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आता जाऊ खेळीमेळी । गाई चारावया ॥१३॥
आजि झाला आनंदु । न वर्णावे ब्रम्हानंदु । चाले परमानंदु । सवे आम्हासहित ।
तुका म्हणे प्रेमे धाली । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यासरी ॥१४॥
अर्थ :
यमुनातिरि उभे राहून श्रीकृष्ण सवंगड्यांना म्हणाले, तुम्ही सारेजन आपापल्या शिदोर्या घेऊन या. आज आपण काला करू. सर्व शिदोर्या एकत्र करून मी प्रथम त्याचा स्वाद घेतो. नंतर मझ्याकाडिल शिदोरि त्यात घालतो व तुम्हाला वाटतो. बरे झाले, बरे झाले, असे सारे सवंगडि म्हणतात, ते सारेजन आनंदाने मोहरी, पावे वाजउ लागले, सर्वाणि आनंदाने खडकावर आपली शिदोरि सोडली. सर्व एकत्र केली. त्याचा काला करून तो श्रीकृष्ण सर्वाना देऊ लागला. सरे जन एकापुढे एक, आपले तोड, हात पसरु लागले. काल्याचे कवळ मिळाले की सुखी झाले. काल्याचा तो गोळा अधिकाधिक मिळावा असे त्यांना वाटू लागले. 'खुप गोड लागते. गोड वाटते', असे श्रीकृष्णला म्हणत 'आमचे पोट भरले नाही', 'आणखी दे', असे म्हणू लागले. भगवंताने आपला हात मुखाजवळ नेला इतरांना आशा वाटू लागली व ते तोंड वासु लागले. तो स्वतः खाउ लागला. इतरांना वाकुल्या दाखउ लागला, त्यांनी त्याला धरले. अरे, कान्हा लबाड आहे. घासासाठी आपल्या रानात फिरतो. त्याच्या पाठीमागे जाऊन त्याला पकडिल तो शहाना. माझी माय असलेला कृष्ण सर्वांचे घास खातो. आकाशातील देवहि हाय हाय करू लागले व म्हणाले, आम्ही या सुखाला अंतरलो. गोपाळ एकमेकांच्या ढुंगनावर, पाठीवर, तोंडावर गोळे मारू लागले. ते हरीला सहन होईना. आता पुरे झाले. आपण आता चांगले खेळ खेळू, असे तो सांगू लागला. सर्वांनी मोठ्या आनंदाने हरीला मधे घेतले व फेर धरला. काहीजण स्वतःभवती फिरु लागले. काही शिंग, बासरी वाजउ लागल. वाकडे, बोबडे, मुके, लुळे, खुजे सवंगडि होते; परंतु ते अत्यंत भाविक होते. ते कान्होबाचे खुप आवडते होते. श्रीकृष्ण त्या सर्वच गोपजनांचे मनापासून कौतुक करत असे. त्यांचे मुख पाहुन हरीला खुप आनंद होत असे. निर्मल, प्रांजल भावनेने तो खदखदा हसत असे. एकमेकांचे उष्टे खान्यास त्यांना कधी कंटाळा येत नसे. जे कोणी लाजरे-बजरे होते. त्यांना हरिने आपल्या संगतीत धीट केले. ज्यांची भूक भागत नव्हती, त्यांचे तोड उघडून भरविले. सर्वाना सारखे सुख दिले. गोपाळ म्हणाले, 'हे हरी, भला रे भला. तुझी सांगती खरच खुप चांगली आहे रे! तू टोलवाटोलावि केलीस तरी आम्ही इतर कुनासोबत जाणार नाही. गाई वैरण खाणेच विसरून गेल्या. पक्षी, पशु यांची तीच गत झाली, यमुना नदि वाहान्याची थांबली. मुखात लाळ घोटवित देव हे सारे पाहत होते. गोपाळ धन्य आहे, आमचा धिक्कार असो !. आता कसे करावे, कसे करावे याचा विचार ते करू लागले. यमुनेतिल मासे होऊन त्यांचे उष्टे सेवन करण्यास जावे, देवांच्या समुदायाने यमुनेचे तट भरून गेले. गोपाल आपले पोट पटपट वाजउ लागले. गोपीनाथ आपल्या सावंगड्यांबरोबर क्रीडा करत होता. त्याने देवांना पाहिले. तो गोपाळांना म्हणाला, तुम्ही यमुना तिरि आपले हात धुवू नका, कान्होबा सगळयांच्या मनातले ओळखतो. कृष्णच्या उच्छिष्टाचि थोरवि जाणून, त्याचे हाव धरून ते येथे कशे प्राप्त होईल ?. गोपाल म्हणाले आजचा दिवस खरोखर धन्य आहे. आज भगवंत दिसला. आम्ही सर्व तुझ्या हातचा काला खाऊन तृप झालो. एकमेकांच्या प्रेमामुळे सर्व संतृष्ट झाले. त्याच्या पंगतित पोटभर दही खाल्ले. भगवंता, तुझी मैत्री चांगली आहे. आम्हाला ती नित्य लाभों. आमच्या जीवाला नेहमी असाच आनंद देत जावा. त्यावर कृष्ण म्हणाला. ''अरे, आता आपल्या काठ्या-कांबळी घ्या, हसत खेळत आपण गाई चारायला घेऊन जाउ. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व प्रेमाने समाधान पावले होते. कोणालाही पुढे चलवेना. हरिने गाई- गोपाळांना आपल्यासारखे केले. आजचा हा आनंद म्हणजे ब्रम्हानंद आहे. त्याचे वर्णन करता येत नाही. परमानंद आपमच्याबरोबर स्वतःच जातीने हजर आहे.
