प्रेम नये सांगता बोल
2729.
प्रेम नये सांगता बोलता दाविता । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥१॥
कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाही भेटी अंगसंगे ॥धृपद॥
पोटामध्ये कोण सांगितले सर्पा । उपजत लपा म्हणऊनि ॥२॥
बोलो नेणे परी जाणे गोड क्षार । अंतरी विचार त्यासी ठावा ॥३॥
तुका म्हणे बरे विचारावे मनी । आणिक भल्यांनी पुसो नये ॥४॥
अर्थ :
हरीचे प्रेम कसे असते हे सांगता येत नाही बोलता येत नाही दाखविता येत नाही त्याचा केवळ चित्ताला अनुभव येतो आणि चित्तच त्याला जाणू शकते. कासवीचे बाळ तिच्या कृपादृष्टीनेच वाढते तिच्याजवळ जाऊन त्या पिल्लाला कधीही दुधाची भेट होत नाही. सर्पीणीच्या पोटात जाऊन तिच्या पिल्लांना कुणी असे सांगितले आहे काय की तुम्ही जन्मले की लगेच लपून बसा म्हणून ? एखादा मनुष्य मुका असला तर त्याने खाल्लेला पदार्थ गोड आहे की खारट आहे हे त्याला सांगता येत नाही परंतू त्याविषयी त्याच्या अंत:करणात त्याला समजत असते. तुकाराम महाराज म्हणतात, हरीप्रेम असे असते याविषयी अनुभव घेऊन त्याचा आपल्या मनाशीच विचार करावा भल्या माणसांनी ते कसे असते हे विचारु नये ?
