करूनि विनवणी । माथा
2728.
करूनि विनवणी । माथा ठेवितो चरणी ॥१॥
होते तेचि असो द्यावे । रूप सौम्यचि बरवे ॥धृपद॥
भया भेणे तुमचा ठाव । तुमच्या कोपे कोठे जावे ॥२॥
तुका पाया लागे । दान समुदाय मागे ॥३॥
अर्थ :
देवा मी तुमच्या चरणावर माथा ठेवून तुम्हाला विनवणी करीत आहे. देवा ती विनवणी अशी आहे की तुमचे जे पूर्व रुप होते तेच असू दयावे परंतू तुमचे पूर्वीचे रुपच सुंदर आहे व तेच चांगले आहे. देवा तुम्ही जर उग्ररुप धारण केले तर आम्ही तुमच्याजवळ कसे यावे आणि तुम्ही जर उग्ररुप धारण करुन रागावलात तर आम्ही कोठे जावे ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमच्या पायाला लागून एवढे एकच दान मागत आहे की तुम्ही तुमचे पूर्वीचे रुप जे आहे तेच राहू दयावे कारण तुमचे सौम्य रूपच आम्हाला चांगले वाटते.
