(गौळणींची अवस्था)
3800.
(गौळणींची अवस्था)
कोणी एकी भुलली नारी । विकिता गोरस घ्या म्हणे हरी ॥१॥
देखिला डोळा बैसला मनी । तोचि वदनी उच्चारी ॥धृपद॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुके ॥२॥
तुका म्हणे हासे जन । नाही कान ते ठायी ॥३॥
अर्थ :
कोणती तरी एक गवळण हरीच्या रुपावर इतकी भुलली की ती बाजारात गोरस विकण्यासाठी गेली गोरस घ्या असे म्हणायचे तर ती हरी घ्या असे म्हणू लागली. हरीला डोळयाने पाहिले लगेच तो मनात इतका ठसला की मनामध्येच विराजमान झाला आणि तोच मुखाद्वारे उच्चार रुपाने बाहेर येऊ लागला. आपल्या स्वत:लाही ती विसरुन गेली व गोविंदाच्या रुपाचे कौतुक ती गवळण करु लागली. तुकाराम महाराज म्हणतात, ती गवळण गोरस घ्या म्हणण्याऐवजी हरी घ्या म्हटली की सर्व लोक तिला हसत परंतू त्या गवळणीचे कान मात्र त्या लोकांच्या हसण्याकडे मुळीच लागलेले नव्हते.
